दहा निघाले की एखादा पहोचतो!
काही शतकांपूर्वीची गोष्ट. तिबेटमधील एका मोठ्या बौद्ध आश्रमानं सीमावर्ती भागातील एका छोट्या आश्रमाच्या उभारणीस हातभार लावला. बांधकाम पूर्ण झालं. आता तेथील प्रमुखपद सांभाळण्याकरता योग्य भिक्षु पाठवणं तेवढं बाकी होतं. मोठ्या आश्रमाच्या प्रमुखानं दहा भिक्षुंची निवड केली, त्यांना नव्या आश्रमाच्या दिशेनं पाठवलं. सर्वांना प्रश्न पडला: 'गुरुपद ग्रहण करण्यासाठी एकाच व्यक्तीची गरज असताना दहाजणांना का बरं धाडण्यात आलं? तिकडूनही प्रश्न आला: 'एकाचीच गरज असताना दहाजण कशाला? त्यांतील योग्य कोण ते आम्ही कसं ओळखावं?' "जरा धीर धरा. पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल," इकडचे गुरु म्हणाले. दोन्ही आश्रमांमध्ये पुष्कळ अंतर होतं. मार्ग खडतर, पहाडी होता - पायी प्रवास. साधारण तीन आठवड्यानंतर तिकडून निरोप आला: 'तुम्ही जे दहा भिक्षु पाठवले होते त्यातील एकच सुखरूप पहोचला आहे.' तेव्हा गुरु म्हणाले, "पाहिलंत? दहा पाठवले की एखादा पहोचतो !" मागाहून सर्वांना पूर्ण कथा समजली: दहा भिक्षुंच्या गटाला प्रवासात पहिलं गाव लागलं तेव्हा गावच्या वेशीपाशीच एका गावकऱ्यानं सर्वांत पुढे चालणाऱ्य