पवित्र सावली
सूफी कथा आहे: कोण्या एके काळी एक अत्यंत सदाचारी व्यक्ती होती. आपण तिला 'साधू' म्हणू. हा साधू इतका निर्मळ होता, की एखादा मानव इतका नितळ, इतका सच्चा कसा असू शकतो, यावर आश्चर्य करीत आकाशातील देवदूतसुद्धा त्याला कौतुकाने न्याहाळत. ताऱ्यांचा प्रकाश सांडावा, फुलांचा गंध पसरावा तितक्या स्वाभाविकपणे साधूच्या दैनंदिन जगण्यातून सदाचार पाझरत असे. त्याला याची किंचितही जाणीव नव्हती. त्याच्या रोजच्या व्यवहाराचं वर्णन दोनच शब्दांत करता येईल - दया व क्षमा. पण त्याच्या तोंडून या शब्दांचा उच्चारदेखील झाला नसेल. त्याच्या सहज हास्यातून, करुणामय, सहनशील, उदार वर्तनातूनच ते शब्द प्रतीत होत असत. देवदूतांनी देवाला गळ घातली, "देवा, या माणसाला चमत्काराचं वरदान द्या ना." देव हसून म्हणाला, "असं कसं! त्याला काय पाहिजे, ते आधी त्याला विचारायला नको?" देवदूत साधूच्या स्वप्नात प्रकटले. "आपण फार फार सज्जन आहात. केवळ स्पर्शाने रोगी-आजारी मंडळींच्या व्याधी दूर करण्याची किमया आपल्याला साधली, तर आपणास ते आवडेल का?" "कशाला? ते देवाच्या हातांत आहे. ती त्याची कृपा आहे." ...