कूसा-हिबारी

कूसा-हिबारी लेखक: लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो मराठी संपादन व भाषांतर: मुक्ता 'असरार' 'पाश्चात्त्य जगाला जपानची ओळख करून देणारा कथाकार' असा लेखक -पत्रकार लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो (१८५०-१९०४ ) यांचा मुख्य लौकिक म्हणता येईल. सन १८९० पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते जपानमधे राहिले, जपानी भाषा, संस्कृती आत्मसात केली, विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधून जपानी लोकसाहित्याचा संग्रह व इंग्रजीत भाषांतर / पुनर्लेखन केलं, जपानी स्त्रीशी विवाह केला, जपानी नागरिकत्व स्वीकारलं. यामागे व्यावहारिक कारणं असतीलही परंतु गूढ श्रद्धांनी, वैचित्र्यपूर्ण चालीरितींनी नटलेल्या, निसर्गाशी नातं सांगणाऱ्या तत्कालीन जपानी जीवनशैलीबद्दल त्यांना जिव्हाळा होता, हे तितकंच खरं. आधुनिक पाश्चात्त्य औद्योगिकतेच्या प्रभावाखाली ही संस्कृती नष्ट होणार याची त्यांना खंत वाटे. कोणताही धूर्त राजकीय, धार्मिक वा व्यापारी हेतू न बाळगणारा; साम्राज्यवादाचा, वंशभेदाचा तिटकारा असलेला 'गोरा' म्हणून जपान्यांनीही त्यांच्यावर माया केली. जपानमधे हौसेखातर लोक नानातऱ्हेचे कीटक पाळ...