तुम्हाला नात्यात रस आहे, की नातं टिकवण्यात रस आहे ?
तुम्हाला नात्यात रस आहे, की नातं टिकवण्यात रस आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कारण दोन्ही एकसाथ घडू शकत नाही. कुठल्याही नातेसंबंधात पुरतेे रममाण असतो, खरोखर त्या नात्याचा भाग असतो तेव्हा आपण ते नातं टिकवण्यासाठी धडपडत नाही - तशी गरजच नसतेे. नातं टिकवण्याची धडपड करतो तेव्हा आपण नात्याशी समरस नसतो, एकरूप नसतो. नात्यापासून निराळं होऊन, पृथक् होऊन आपला तो खटाटोप चालतो. ज्या क्षणी आपण वास्तवाकडे, जे आहे त्याकडे थेट पाहू इच्छित नसतो; ज्याक्षणी स्वतःचं वर्तमान सर्वांशानं पाहण्यात आपल्याला रस नसतो / तितकं धैर्य नसतं / सबुरी नसते / ऊर्जा नसते, त्याक्षणी 'आदर्शा'ची चर्चा सुरु होते. आपण जगाला 'आदर्श' व 'वास्तव' यांत विभागून टाकतो. सेकंदाच्याही एखाद्या तुकड्यात घडतं हेे - मनानं शोधलेली पळवाट असते ती; मनाचा थकवा / आळस / भ्रम असतो. प्रत्यक्षात असतं ते केवळ वास्तव, बाकी काही नाही. नि ते समजून घेता येतं फक्त पाहण्यानं. प्रश्न सुटतात फक्त समजून घेण्यानं. आपल्याला निश्चिती हवी असते, ही नातेसंबंधातली खरी (मी तर म्हणेन एकमेव ) समस्या आहे. आपल्याला सारंकाही हवं असतं....