शब्द
शब्द ही एक जिवंत गोष्ट आहे. एक काया. लांबी, रुंदी, घनता, गती असणारा एक पदार्थ. अलगद बोट बुडवून पहा; तळव्यात खुळखुळून पहा; जिभेच्या टोकावर त्याला तोलून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कदाचित. आनाइस निन च्या ते लक्षात आलं जेव्हा तिनं आपली पुस्तकं स्वतः छापली - टाईपच्या खिळ्यांनी ओंजळ भरली, शाईने कोपरं माखून घेतली, शर्टांच्या पाठींना घाम फोडला... शब्दाचा साक्षात्कार झाला तिला! कुठल्याही जिवंत गोष्टीप्रमाणे शब्दांशीही आपलं दुतर्फी नातं असतं. शब्द उच्चारताना, समजावून घेताना, त्याची किंमत करताना नेहेमीच इतर शब्द, प्रतिमा, ध्वनि, अनुभव, अपेक्षा, आठवणी वगैरे जोडून पहातो आपण त्याच्याशी, तुलना करतो. कधी स्वतःला जोडतो का शब्दाशी थेट, कसल्याही मध्यस्थीशिवाय? शब्द आपलं वास्तव आहेत, आपण त्यांचं वास्तव आहोत. ते आपल्या छायेत जगतात, आपण त्यांच्या छायेत जगतो - मरतोदेखील. इतर कोणत्याही नात्याप्रमाणे या नात्यात आपलं खरंखुरं प्रतिबिंब उमटतं. अस्तित्वावर बंधनं आपण लादून घेतो, स्वतःभवती सीमा आपण रेखतो, नि म्हणतो शब्द सीमित आहेत, त्यांचा आवाका मर्यादित आहे, त्यांची धाव अपुरी!...