Posts

Showing posts with the label रूपक-कथा

खलबत

चार चोरांनी सावकाराच्या घरावर दरोडा घालून बरंच मोठं घबाड मिळवलं. मुद्देमाल घेऊन चौघेजण वाटणी करण्सासाठी गावाबाहेरील स्मशानात गेले. एकाच्या मनात आलं, एका फटक्यात इतका सारा ऐवज मिळण्याची ही पहिलीच वेळ. हा प्रसंग साजरा केला पाहिजे. मालाला हात लावण्यापूर्वी देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला पाहिजे. तेव्हा चौघांपैकी दोघांनी सकाळ होताच पुढल्या गावात जाऊन मिठाई आणावी आणि तोवर अन्य दोघांनी झाडाखाली ऐवजाची राखण करत बसावं असं ठरलं. आतापावेतो चौघांचा एकमेकांवर विश्वास होता, पण तासागणिक प्रत्येकाच्या मनात लोभ वाढीस लागला.  दुसऱ्या दिवशी बाजारात गेल्यानंतर त्या दोघांनी आपापसात खलबत केलं. 'आपण इथेच पोटभर मिठाई खाऊ. मग आणखी मिठाई विकत घेऊन तीत विष कालवू, व ही मिठाई प्रसाद म्हणून त्या दोघांना खाऊ घालू. ते मरतील, आपला हिस्सा वाढेल!' मालाची राखण करत बसलेले काही कमी नव्हते. त्यांनीही खलबत केलं. 'ते दोघेजण झाडाखाली येताच त्यांची मुंडकी छाटून टाकू. तेवढेच दोन वाटेकरी कमी!' मिठाई घेऊन आलेल्यांची शिरं तत्काळ धडावेगळी करण्यात आली.  विषारी मिठाईवर ताव मारल्यानंतर अन्य दोघे गतप्राण ह...

बोधिधर्म आणि सम्राट वू

Image
  इसविसनाच्या सहाव्या शतकात बोधिधर्म नावाचा भिक्षु तीन वर्षं खडतर प्रवास करून चीन देशी पहोचला. त्याच्या आगमनाच्या शंभर-दोनशे वर्षांआधीपासून चीनमध्ये बौद्ध धर्म प्रस्थापित होत गेला होता. मात्र बुद्धाची शिकवण आचरणात आणण्याच्या नावाखाली चाललेले प्रकार पाहून बोधिधर्माला आत्यंतिक खेद वाटला. त्यानं ज्या तत्त्वांचा चीन देशात उच्चार केला त्यातून बौद्ध धर्माला नवी शाखा फुटली - चिनी भाषेतील 'चान', जपानीतील 'झेन', कोरिअनमधील 'सॉन' व व्हिएतनामी भाषेतील 'त्छ्यान' ही सारी 'ध्यान' या संस्कृत शब्दाची रूपं.     बोधिधर्माच्या आगमनाची वार्ता कळताच 'सम्राट वू'नं त्याला आपल्या भेटीस बोलावून घेण्याची खटपट चालवली.  दक्षिण चीनमधे ल्यांग घराण्याची सत्ता प्रस्थापित करणाऱ्या सम्राट वू ची त्याकाळी बौद्ध धर्माचा अनुयायी व आश्रयदाता म्हणून मोठी ख्याती होती. धर्माच्या शिकवणीनं प्रभावित झालेल्या वू नं राज्याच्या कायद्यांत अनेक बदल केले. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली गेली. सणासुदीला प्राण्यांचा बळी घालण्यावर बंदी घातली गेली. जागोजागी बौद्ध मंदिरं उभारण्यात आ...

मनाची मिरवणूक

स्वामी शरणानंद रांचीत असताना एक वकील त्यांच्या भेटीस आले. याच सुमारास महात्मा गांधी त्या वकील महोदयांच्या घरी उतरले होते.   शरणानंदांसमोर जाताच वकील म्हणाले, "स्वामीजी, काही केल्या मन मरत नाही. ज्याच्या फटकाऱ्याने मन खलास होईल असा एखादा चाबूक उपाय सांगा." शरणानंद मिष्किलपणे म्हणाले, "काय वकीलसाहेब, गांधीजींचे यजमान असून आपण मरण्या-मारण्याची भाषा करता?  मनाला बळपूर्वक नाहीसं करण्याचा जितका प्रयत्न कराल तितकं ते प्रबळ होईल. आपल्याच संकल्पातून (will) सत्ता मिळवून मन आपल्यावर राज्य गाजवतं. असहकार, असहयोग हे गांधीजींचं अमोघ अस्त्र आहे ना? - मनासोबत असहयोग करा. मनाची मिरवणूक पाहत रहा, तिच्यात सामील होऊ नका. मजा येईल. ..त्याचं काय आहे, तुम्हाला हवी असते क्रांती, आणि तुम्ही करता आंदोलन."   "आंदोलनातूनच तर क्रांती घडते ना?" वकीलसाहेबांनी विचारलं.   शरणानंद म्हणाले, "नाही. आंदोलन म्हणजे आपल्या मागण्या बळपूर्वक इतरांकडून कबूल करवून घेणं. क्रांती म्हणजे हर्षपूर्वक तप करून स्वतःला बदलणं. दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्याबाबत आग्रही नसणं. तुम्ही करता आंदोलन, तुम्ह...

प्रगल्भता, चोर व गुरु

Image
  प्रगल्भतेची प्रचलित कल्पना, प्रचलित व्याख्या फारच बावळट आहे.  ‘प्रगल्भता’, ‘परिपक्वता’, ‘प्रौढत्व’ हे शब्द आपण समानार्थाने वापरतो. आपल्या मते परिपक्व, प्रौढ व्यक्ती भाबडी नसते. तिच्या अंगी निरागसता असते, पण चमचाभर - चवीपुरती. जीवनातील अनुभवांमुळे आलेली पक्वता या व्यक्तीच्या वर्तनात जाणवते. प्रौढ व्यक्ती चुणचुणीत असते, सहजासहजी स्वतःची फसवणूक होऊ देत नाही. ती सावध असते; सर्वचदृष्ट्या, खासकरून मानसिकदृष्ट्या स्वतःचं रक्षण करण्यास सज्ज असते, कारण जग चित्रविचित्र वृत्तींनी, अनपेक्षित घटनांनी भरलंय ना! कोण कधी आपला गैरफायदा घेईल, आपल्याला उल्लू बनवेल कुणास ठावूक! ...किती क्षुद्र, उथळ, हीणकस कल्पना!  वास्तविक प्रगल्भ व्यक्तीचे गुणधर्म आपल्याला भलतेच चक्रावून टाकतील. प्रथमतः ती ‘व्यक्ती’ नसतेच. प्रगल्भ व्यक्तीला अस्तित्व असतं, व्यक्तित्व नव्हे. तिचं असणं अगदी हलकं असतं. तिचा सहवास सूक्ष्म असतो - ‘हे माणूस नक्की आहे ना इथे?’ असा क्वचित प्रश्न पडावा इतका सूक्ष्म. प्रगल्भ व्यक्तीच्या व्यक्तित्वाला वजन नसतं. प्रगल्भ व्यक्ती अर्थातच बालकासारखी असते. किती सुंदर विरोधाभास ...

वास्तवात आपण कोणीही नसतो

एका शास्त्रज्ञानं म्हणे आपल्या आत्मवृत्तात पुढील प्रसंग वर्णिला आहे:   एके संध्याकाळी शास्त्रज्ञाच्या मित्रानं पार्टी आयोजित केली होती. परिचयातील कित्येक प्रथितयश व्यक्तींना - शास्त्रज्ञ, वास्तुरचनाकार, कवी, लेखक, शिक्षक, चित्रकार, संगीतकार, शिल्पकार वगैरे मंडळींना त्यानं पार्टीला बोलावलं होतं. पाहुणे जमल्यानंतर तो मित्र साऱ्यांच्या मधोमध उभा राहून म्हणाला: "मित्र हो! आजच्या या पार्टीत मी तुमचा एकमेकांशी परिचय करून देणार नाही, व तुम्हीदेखील एकमेकांची औपचारिक ओळख करून घेऊ नये अशी तुम्हाला विनंती करेन. नावांत, बिरुदांत, उपाध्यांत काय आहे! जमलं तर परस्परांना एक माणूस म्हणून भेटा. तुम्ही नावाजलेले डॉक्टर असाल, इंजिनीयर असाल - ते सगळं आज बाजूला सारू या. मी काही डॉक्टर्स, इंजिनीयर्स, वकिलांची सभा बोलावलेली नाही! मी तर केवळ मैत्रीच्या नात्यानं, माणसं म्हणून तुम्हाला आमंत्रण दिलंय." शास्त्रज्ञ आत्मवृत्तात लिहितो: 'मित्राच्या त्या आवाहनानं आम्हा सर्वांना बुचकळ्यात टाकलं. काय करावं? कसं भेटावं एकमेकाला? केवळ माणूस म्हणून एखाद्याला भेटणं म्हणजे काय? 'मी कोण आहे, मा...

अलेक्झांडर व डायॉजिनिस

Image
सम्राट अलेक्झांडर विश्व पादाक्रांत करण्यासाठी निघाला. वाटेत त्याला डायॉजिनिस दिसला. हा ग्रीक तत्त्वज्ञ म्हणजे एक वल्लीच होती. अलेक्झांडरला त्याच्याविषयी कुतुहल वाटे. "आजचा दिवस विश्राम करा," तो सैन्याला उद्देशून म्हणाला, "आपण इथेच तळ ठोकतोय. मी डायॉजिनिसकडे जाणार आहे. अनेक वर्षांपासून त्याला पाहण्याची इच्छा होती, कदाचित आज पुरी होईल. येथपासून जवळच कुठेतरी तो मुक्कामाला आहे असं दिसतं. त्याची भेट घ्यायला फार आवडेल मला."   अलेक्झांडर डायॉजिनिसचा पत्ता शोधत निघाला. सकाळची वेळ होती. स्वारी नदीकिनारी ऊन खात पडली होती. फकीरवृत्तीचा डायॉजिनिस नग्नावस्थेत रहायचा म्हणतात. ...वाळूत पहुडलेल्या त्या नंग्या शरीराचं आगळंच तेज होतं. आगळंच रुपडं होतं ते. अखंड तृप्ती झळकत होती त्या देहावर. एक महान सम्राट 'वेडा' म्हणवल्या जाणाऱ्या एका भणंग इसमाचं जगावेगळं सौंदर्य न्याहाळू लागला.    अलेक्झांडर म्हणाला, "तुला पाहून मन प्रसन्न झालं. तुझ्यासाठी करण्याजोगं काही असेल, तुला देण्यायोग्य माझ्यापाशी काही असेल तर अगदी आनंदानं देईन मी."   "तू जे देशील त्याची मला...

मदहोशी

Image
    एके संध्याकाळी अकबर बादशहा जंगलात शिकारीसाठी गेला होता. नमाज़पठणाची वेळ झाल्याचं परतीच्या वाटेवर त्याच्या लक्षात आलं. घोड्यावरून खाली उतरून, पालापाचोळ्यात सतरंजी अंथरून तो नमाज़ अदा करू लागला. एकाएकी अकबराच्या अंगाला कसलासा धक्का लागला. बेसावध अकबर वज्रासनातून जवळपास कोलमडलाच. नीट पाहीपर्यंत वेगाने धावत जाणारी मानवी आकृती जंगलात गुडूप झाली होती. अकबराच्या मनात त्या अज्ञात व्यक्तीला शासन घडवण्याची इच्छा उफाळून आली. पण करता काय, नमाज़ पढत असता मध्येच उठून चालत नाही. नमाज़पठणानंतर अकबर तिथेच खोळंबून राहिला. ...कदाचित तो इसम गेल्या वाटेने परत येईल.  तो पहा आला! अल्लड युवती होती ती.   "ए मुली! थांब जरा," तिची वाट अडवत अकबर गुश्शात म्हणाला. "नमाज़ अदा करणाऱ्या माणसाला तुझा धक्का लागला, तरी तू तशीच पुढे पळून गेलीस. माफी मागणं सोडा, मागे वळून बघितलंदेखील नाहीस. अगं, तुला काही रीतभात? नमाज़पठण करणारी व्यक्ती खुद्द सम्राट अकबर आहेत, हेही तुझ्या लक्षात येऊ नये म्हणजे हद्द झाली! सोम्यागोम्यालाही प्रार्थनेचे वेळी त्रास देऊ नये, तू चक्क बादशहाला धक्का दिलास. लाज नाह...

प्रेमाचा नाच, भक्तीचं गूढ

Image
ज्यांना आपण ‘गूढवादी’ (mystic) म्हणतो अशा व्यक्तींची चरित्रं पाहाल, तर त्यांत पुरेपूर वैविध्य, वैचित्र्य आढळेल. कोणी नजरेसमोर आले तरी पत्ताच लागू नये इतके सर्वसामान्य दिसतात, कळकट-मळकट रहातात. तर कोणी इतके तेजःपुंज, की वाटेवरल्या आंधळ्याचाही आत्मा क्षणिक उजळून जावा!  अंतर्बाह्य शहाण्या व्यक्तींच्या जगण्या-वागण्याचा कोणताही ठराविक ढंग नसतो, निश्चित चाकोरी नसते. कुणीही इतरांचं अनुकरण करत नाही; आदर्शांचा कित्ता गिरवत नाही.   ‘गूढवादी’ म्हणून ओळखली जाणारी मंडळी ईश्वराचं रूप दोन प्रकारे कल्पतात: सूफीपंथीय ईश्वराला प्रेयसी मानतात. त्यांच्यालेखी ती स्त्री असते. जगात ही एकमेव स्त्री असते, व सारीच माणसं ‘ति’चे ‘तो’ असतात. भारतातील गूढवाद्यांत ईश्वर हा प्रियकर असतो. जगात हा एकमेव पुरुष असतो, व बाकी सारे ‘त्या’च्या ‘ती’ असतात.  ... मीरा बावरी नाचत-गात मथुरेस पहोचली - कृष्णाच्या भव्य, प्रासादतुल्य मंदिरापाशी. त्याकाळी या कृष्णमंदिरात स्त्रियांना प्रवेश नव्हता! …कृष्णाच्या मंदिरात स्त्रियांना बंदी?? किती हा मूर्खपणा! पण आपल्यापैकी बहुतेकजण निरर्थक रुढींचं, फडतूस नीतिनि...

देवाची हाडं

एके रात्री कडाक्याच्या थंडीत एक साधू एका मंदिरात मुक्कामास आला. ऊबेसाठी त्यानं चक्क देवाची लाकडी मूर्ती पेटवली! तडतड आवाजानं पुजारी जागा झाला. बघतो तर काय, देवाची मूर्ती जळतेय!    ते दृष्य पाहून पुजारी स्तंभित झाला. मनात क्रोधाचा आगडोंब उसळला, पण तोंडून शब्द फुटेना. त्याचवेळी त्याला दिसलं, की साधू मूर्तीची राख चाचपडतोय.  अखेर त्यानं घुश्शात विचारलं, "देवाची मूर्ती जाळलीस, आता हे काय चालवलंयस?"  "देवाची हाडं शोधतोय," साधू उत्तरला.   "मूर्खा, लाकडात हाडं कुठून येणार?"  "असं का? मग कृपा करून आणखी एक मूर्ती आणा. भलताच गारठा आहे, शिवाय रात्रही पुष्कळ बाकी आहे." साधू म्हणाला.

'स्वानंदाद्वारे मी परमानंद जाणतो'

Image
च्वांग त्झू  आणि हुइ शी हाओ नदीच्या काठाने चालले होते.    च्वांग त्झू  म्हणाला, "मासोळ्या बघ पाण्यात कशा खेळतायत, सूर मारतायत. यातच त्यांना आनंद आहे."   "तुम्ही स्वतः मासा नाही, मग माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक?" - हुइ शी चा प्रश्न. "तू म्हणजे मी नाहीस, मग माशांचा आनंद मला ठावूक नाही, हे तुला रे कसं ठावूक?" - च्वांग त्झू. "बरोब्बर! मी म्हणजे तुम्ही नसल्यामुळे तुम्हाला ते ठावूक आहे की नाही हे जसं मला कळू शकत नाही, तस्संच तुम्ही म्हणजे ती मासोळी नसल्यामुळे तिच्या भावनासुद्धा तुम्हाला कळू शकत नाहीत - मुद्दा स्पष्ट आहे!" - हुइ शी. "आं, जरा थांब," च्वांग त्झू म्हणाला, "आपण तुझ्या मूळ प्रश्नाकडे परत फिरू. तू विचारलंस, 'माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक?' म्हणजे मासे आनंदात असल्याचं मला ठावूक आहे, इतकं तुला समजलं होतं. 'कसं काय?' हा खरा प्रश्न होता. नदीतल्या मासोळ्यांचा आनंद मी जाणतो, कारण त्याच नदीकाठाने चालत असता स्वतःला होणारा आनंद मी जाणतो. स्वानंदाद्वारे मी परमानंद जाणतो."       

बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू चहाला भेटतात...

Image
बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू एकमेकांचे समकालीन. चीनमधील चहापानाच्या दुकानात एकदा तिघांची भेट झाली म्हणे. गप्पाटप्पा सुरु होत्या. दुकानमालकानं ओळखलं तिघांना. त्यांच्या बैठकीपाशी येऊन तो म्हणाला, "आपण आमचे खास पाहुणे. आपणा तिघांना इथं पाहून झालेल्या आनंदाप्रित्यर्थ मी एक खास पेय पेश करतो. ..'जीवनरस' म्हणतो आम्ही याला". हातांतली किटली त्यानं तिघांपुढे तिपाई मेजावर ठेवली.    बुद्धानं सुहास्यवदनाने किटलीवरील कलाकुसर न्याहाळली, व दुकानदारास शांतपणे म्हणाला, "धन्यवाद. परंतु जीवन म्हणजे साक्षात् दुःख. दुःखमुक्ती हे माझ्या शिकवणीचं सार असताना मी हा रस कशाला चाखू!" कन्फ्यूशिअसनं त्या सुरेख किटलीचं झाकण अलगद उघडलं. तो म्हणाला, "एकही थेंब चाखून न पाहता अशी भेट नाकारणं बरोबर नव्हे." त्यानं अगदी थोडं पेय कपात ओतून घोट घेतला. पेय घशाखाली जाताच त्याचा चेहरा कसनुसा झाला. "बुद्धा, खरंय तुझं म्हणणं," कन्फ्यूशिअस म्हणाला, जीवनरस उग्र आहे, कटु आहे. पिऊन जाम हैराण होतो माणूस. यात काही अर्थ नाही".    लाओ-त्सूची पाळी येता त्यानंही किटलीची क...

"अस्सं"

Image
  हाकुइन एकाकु - सतराव्या शतकातील झेन गुरु. जपानी झेन बौद्ध परंपरेतील अतिशय प्रभावशाली व्यक्तिंमध्ये त्यांची गणना होते. हाकुइनच्या घराजवळ वाण्याचं दुकान होतं. वाण्याची मुलगी अतिशय रूपवान. एके दिवशी तिच्या पालकांना आपली ही अविवाहित कन्यका गरोदर असल्याचं समजलं. घरात कोण हाहाकार माजला! 'कुणी केलं हे? कुणाबरोबर शेण खाल्लंस? नाव सांग त्या हरामखोराचं!' पण पोरगी काही केल्या तोंड उघडेना. अखेर घरच्यांचा छळ असह्य होऊन तिनं हाकुइनचं नाव घेतलं.   संतापदग्ध वाणी व त्याची बायको हाकुइनच्या घरी गेले. त्याला घडल्या प्रकाराचा जाब विचारला. हाकुइननं त्यांची आरडाओरड शांतपणे पाहिली, ऐकून घेतली. "अस्सं?" इतकाच उद्गार बाहेर पडला त्याच्या तोंडून. 'काय निर्लज्ज, नीच माणूस आहे! हा कसला डोंबलाचा गुरु!'    मूल जन्माला आल्यानंतर वाण्याने ते हाकुइनकडे सोडून दिलं. दरम्यानच्या काळात या प्रकरणामुळे हाकुइनची पुष्कळ छी-थू झाली होती - जवळपास सर्व शिष्य सोडून गेलेले, धर्मसंस्थेनं आर्थिक सहाय्य थांबवलेलं. मात्र हाकुइनला या गोष्टींचं शल्य नव्हतं. तो बाळाचा प्रेमाने सांभाळ करू लागला. भिक्षा...

मौलिंगपुत्त बुद्धाशी वाद करण्यास येतो...

Image
मौलिंगपुत्त - एक प्रकांड तत्त्ववेत्ता, गौतम बुद्धाचा समकालीन. तात्त्विक वादचर्चांमधे भाग घेऊन त्यानं मोठमोठ्या पंडितांना नमवलं होतं. गौतम बुद्धाबद्दल पुष्कळ ऐकून असल्यामुळे त्याच्याशी वाद करण्याची मौलिंगपुत्ताला फार इच्छा होती. समविचारी तत्त्वज्ञांचा गट घेऊन मौलिंगपुत्त बुद्धभेटीस आला. नम्र अभिवादन करून म्हणाला: “तुमच्याशी खुली वादचर्चा करण्याची मला इच्छा आहे. मात्र वादाची एक अट आहे, ती अशी: जर तुम्ही हरलात, तर आपल्याभवती जमलेल्या साऱ्या शिष्यगणांसह आपण माझं शिष्यत्व पत्करावं. जर मी हरलो, तर मी व माझे सहकारी आपलं शिष्यत्व पत्करू.”   गौतम बुद्ध म्हणाला, “हो, अवश्य. का नाही! माझीसुद्धा एक अट आहे. लगोलग चर्चेला सुरुवात करू या नको. तू आणि तुझे सहचर दोन वर्षं या इथे मौनात बसा. दोन वर्षं पुरी झाली की वाद घालू - हवंतर मी आठवण करून देईन. चालेल?”  मौलिंगपुत्त व त्याच्या सहकाऱ्यांनी आपापसात मसलत करून ही अट मंजूर केली. आपला निर्णय ते बुद्धाला सांगत होते तोच खदखदा हसण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. शेजारच्या वृक्षाखाली बुद्धाचा एक शिष्य बसला होता. न्यारी असामी होती बरं ही....

'टाकून दे'

Image
  एक होता राजा. बुद्धाला भेटण्याची त्याची इच्छा होती.  बालपणापासून मनावर ठसवण्यात आलेल्या, दरबारात पाळल्या जाणाऱ्या शिष्टाचारांचा परिपाक म्हणून बुद्धाच्या भेटीस जाताना काहीतरी घेऊन जावं - एखादा उपहार, नजराणा...रित्या हाती जाणं बरं नव्हे - असं त्याला वाटत होतं.    आपली पत्नी बुद्धाला अनेकदा भेटली आहे, हे राजाला ठावूक होतं.  त्या रात्री शयनगृहात बुद्धभेटीचा विषय निघाला. "...आपल्या संग्रहातील मला प्राणप्रिय असलेलं ते अत्यंत दुर्लभ, तेजस्वी रत्न, जे डोळा भरून पाहण्याची संधी आजवर फार थोड्या लोकांना लाभलीय - ते रत्न बुद्धाला पेश करावं असं मला वाटतं. यापूर्वीही सम्राटांनी, राजे-रजवाड्यांनी, धनिकांनी बुद्धाला तऱ्हतऱ्हेच्या मौल्यवान वस्तूू भेट म्हणून दिल्या असतील. पण हे रत्न म्हणजे... अवघ्या जगात याच्या तोडीस तोड नसेल. हा नजराणा पाहून बुद्ध प्रसन्न व्हावा, आणि आमची भेट बुद्धाच्या सदैव स्मरणात रहावी अशी माझी इच्छा आहे. तुमचं काय मत?"    राजाची ही राणी स्पष्टवक्त्या, मिष्किल स्वभावाची होती - बुद्धासंबंधी चाललेलं राजेशाही थाटातलं बोलणं ऐकून खुदुखुदु ह...

चमत्कार न दाखवण्याचा चमत्कार

Image
 * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     एका झेन गुरुचा शिष्य दुसऱ्या झेन गुरुच्या भेटीस आला. मोठ्या अभिमानाने तो या गुरुला आपल्या गुरुची महती सांगू लागला: “आमच्या गुरुंना पुष्कळ सिद्धी अवगत आहेत. हरतऱ्हेचे चमत्कार दाखवतात ते! एकदा मला नदीतीरावर उभं रहायला सांगून आमचे गुरु पैलतीरी गेले. त्यांनी मजजवळ कोरा कागद देऊन ठेवला होता. पलिकडल्या तीरावर उभे राहून ते लेखणी चालवत असल्याप्रमाणे हवेत हात फिरवू लागले, नि अहो आश्चर्यम्! इकडे माझ्या हातातील कोऱ्या कागदावर अक्षरं उमटू लागली!! ...तुमच्यालेखी यात काय नवल म्हणा. तुम्हीदेखील सिद्धपुरुष आहात." दुसरा झेन गुरु हसत हसत म्हणाला, "चमत्कार न दाखवण्याचा चमत्कार जर तुझा गुरु करू शकत नसेल, तर त्याच्या डोक्यात पुरता प्रकाश पडलाय असं म्हणता येणार नाही. कारण चमत्कार घडवता येत असूनही चमत्कार घडवल्याविना राहू शकणं हा परमविलक्षण चमत्कार असतो, नाही का?"     ...सिद्धींच्या, शक्तींच्या मोहजालात न गुंतणं अतिकठीण. त्यांमुळे तुमचा अहंकार अस्सा फुलारतो, इतका खूष होतो....नशा चढते त्याला. बहुसंख्यांच्या ...