एक चिनी शेतकरी...

कोण्या एके काळी चीन देशात एक शेतकरी होता. एके दिवशी त्याचा घोडा तबेल्यातून पळाला. ही बातमी ऐकून त्या संध्याकाळी गावकीतली मंडळी शेतकऱ्याच्या घरी जमली. "च्च च्च च्च... तुझा घोडा पळाला ना.. फार वाईट झालं."
शेतकरी म्हणाला, "ह्म... कदाचित".
 
दुसरे दिवशी घोडा परत आला. त्यानं आपल्याबरोबर आपले सात रानटी भाईबंद आणले. 
तिन्हीसांजेला गावकरी मंडळी नेहेमीप्रमाणे शेतकऱ्याच्या ओसरीवर जमली. "काय शिकंदर नशीब आहे! सात घोडे आयते घावले की तुला! झ्याक झालं."
शेतकरी म्हणाला, "हो - कदाचित."
 
तिसरा दिवस उजाडताच शेतकऱ्याच्या मुलाने रानटी घोड्यांना माणसाळवण्याचं काम हाती घेतलं. पैकी एका घोड्यावर स्वार होऊन रपेट करू लागला. घोड्यानं मुलाला आपल्या पाठीवरून उडवून लावलं. मुलाचा पाय मोडला. 
शिळोप्याच्या गप्पा करताना मंडळी हळहळली. "बाप रे! नसती पीडा झाली च्यामायला त्या घोड्यांपायी, काय हो?"
"हो ना - कदाचित," शेतकरी म्हणाला.
 
दरम्यान त्या प्रदेशातील राजकीय परिस्थिती पालटत होती. पुढल्या दिवशी रंगरूट (recruitment) अधिकारी गावात दाखल झाले. सर्व धडधाडकट पुरुषांना सक्तीने सैन्यात दाखल करून घेण्याचा आदेश होता. जखमी असल्याकारणाने शेतकऱ्याच्या मुलाची निवड झाली नाही. 
त्या रात्री उशिरापर्यंत रेंगाळलेले गप्पेकरी म्हणाले, "मोडक्या पायानं वाचवलंन् तुमच्या पोराला. हे बेस झालं."
शेतकऱ्याचं उत्तर तेच: "ह्म्म. कदाचित."
 

फार सोपं आहे - सृष्टीची लीला, तिचा कारभार अत्यंत जटिल, गहन असतो. 
जे घडलं ते 'चांगल्यासाठी की वाईटासाठी' या प्रश्नाला मग अर्थच उरत नाही. 
तथाकथित दुर्दैवातून काय जन्माला येईल, पुढे त्याची परिणती कशात होईल कुणास ठावूक! 
तथाकथित सुदैवातून काय जन्माला येईल, पुढे त्याची परिणती कशात होईल कुणास ठावूक!
 
 

Comments