मौलिंगपुत्त - एक प्रकांड तत्त्ववेत्ता, गौतम बुद्धाचा समकालीन. तात्त्विक वादचर्चांमधे भाग घेऊन त्यानं मोठमोठ्या पंडितांना नमवलं होतं. गौतम बुद्धाबद्दल पुष्कळ ऐकून असल्यामुळे त्याच्याशी वाद करण्याची मौलिंगपुत्ताला फार इच्छा होती. समविचारी तत्त्वज्ञांचा गट घेऊन मौलिंगपुत्त बुद्धभेटीस आला. नम्र अभिवादन करून म्हणाला: “तुमच्याशी खुली वादचर्चा करण्याची मला इच्छा आहे. मात्र वादाची एक अट आहे, ती अशी: जर तुम्ही हरलात, तर आपल्याभवती जमलेल्या साऱ्या शिष्यगणांसह आपण माझं शिष्यत्व पत्करावं. जर मी हरलो, तर मी व माझे सहकारी आपलं शिष्यत्व पत्करू.”
गौतम बुद्ध म्हणाला, “हो, अवश्य. का नाही! माझीसुद्धा एक अट आहे. लगोलग चर्चेला सुरुवात करू या नको. तू आणि तुझे सहचर दोन वर्षं या इथे मौनात बसा. दोन वर्षं पुरी झाली की वाद घालू - हवंतर मी आठवण करून देईन. चालेल?”
मौलिंगपुत्त व त्याच्या सहकाऱ्यांनी आपापसात मसलत करून ही अट मंजूर केली. आपला निर्णय ते बुद्धाला सांगत होते तोच खदखदा हसण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. शेजारच्या वृक्षाखाली बुद्धाचा एक शिष्य बसला होता. न्यारी असामी होती बरं ही. क्वचितच बोलायचा हा माणूस. हसायचा मात्र पोटभर.
ते अनघड, अनामिक हास्य ऐकून मौलिंगपुत्त क्षणभर विचलित झाला.
“हा मनुष्य का हसला?” हसून हसून धाप लागलेल्या त्या शिष्याकडे रोखून पहात त्यानं बुद्धाला विचारलं.
“या मनुष्याचं नाव महाकाश्यप. तो का हसला, ते त्यालाच विचारा.” बुद्धाच्याही ओठांवर स्मित होतं.
“आपण का हसलात?” मौलिंगपुत्तानं महाकाश्यपाला विचारलं.
दम खात, स्वतःला सावरत, बुद्धाकडे बोट दाखवत महाकाश्यप म्हणाला, “ह्या सुंदर बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. घोळात घेतोय हा तुम्हाला. दोन वर्षांपूर्वी मीदेखील आलो होतो खूप सारे प्रश्न घेऊन. हा बाबा मिठ्ठास हसत काय म्हणाला? ‘दोन वर्षं माझ्यापाशी मौनात बस. काय घाई आहे?’ मीदेखील राजी झालो - ‘काय हरकत आहे!’ - बसलो मौनात. सुरुवातीला दिवस मोजायचो. पण जसजशी दोन वर्षं सरत गेली तसतसं सगळं सपाट झालं, सगळ्याचा विसर पडला...पाटी कोरी झाली.
बुद्धानं मला बोलावलं. म्हणाला, ‘महाकाश्यपा, दोन वर्षं संपली आज, ठावूक आहे ना? सांग आता, विचार तुला काय विचारायचं होतं ते.’
विचारणार काय कप्पाळ! विचारायला उरलं होतंच काय? मी म्हणालो, ‘दोन वर्षांपूर्वी मी जो कोणी होतो, जे काही होतो, त्याचा मागमूस आता उरला नाही. ते सारं मौनात पूर्णतः विसर्जित झालंय. मनातली अडगळ, ज्ञानाचा तो बोजा - सारं गायब झालंय. आता कसं हलकं हलकं वाटतंय. ...नाही बुवा, विचारण्यासारखं मजपाशी आता काही नाही.”
“मला वाटतं तुमचीदेखील तीच गत होणार”, महाकाश्यप पुन्हा हसू लागला. बुद्धदेखील खुदखुदला. “कशाला ती दोन वर्षांची अट स्वीकारता! मी म्हणतो जे विचारायचं ते आत्ताच विचारून टाका. तेवढीच सर्वांची करमणूक!”
पण मौलिंगपुत्तानं अगोदरच होकार भरला होता. महाकाश्यपाचं बोलणं, त्याचं हसणं एव्हाना मौलिंगपुत्ताला पुरतं उमगलं होतं, तरी त्यानं आपला शब्द मागे घेतला नाही. तो व त्याचे मित्रगण दोन वर्षं बुद्धापाशी मौनात बसले.
दोन वर्षांअखेरीस बुद्धानं त्यांना आठव दिली. “चला तर मग. चर्चेला सुरुवात करू या”.
हसण्याची पाळी मौलिंगपुत्ताची होती. “महाकाश्यपाचं म्हणणं शतशः खरं होतं,” तो म्हणाला. “बोलण्याजोगं, वाद घालण्याजोगं आता काsही उरलं नाही. सारं गळून पडलंय. अतिशय तरल, हलकं वाटतंय.”
इतकं बोलून मौलिंगपुत्तानं प्रथम महाकाश्यपाला व नंतर बुद्धाला चरणस्पर्श केला.
Comments
Post a Comment