प्रेमाची झुळूक
प्रेमाचं नातं अतिशय तरल, नाजुक असतं - क्षणोक्षणी बदलणारं, अनिश्चित, अतर्क्य. उद्या काय घडेल, पुढल्या क्षणी काय घडेल कोणी सांगावं! मनात भय दाटतं. मग अनिश्चिततेच्या भीतीपोटी, अज्ञाताच्या भीतीपोटी प्रेमीजन आपल्या नात्याचा घात करतात. विवाहबंधनात अडकतात.
माणसं लग्न करतात. त्याद्वारे बदलांना लगाम घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रेमाचे बंध दृढ करायचे असतात. ‘प्रेम’...मोठी अजब चीज आहे. ज्याक्षणी तुम्ही त्याला दृढ करता, स्थैर्य देता तत्क्षणी ते असत नाही, उरत नाही; लुप्त होऊन जातं.
प्रेम म्हणजे वासंतिक झुळूक! ती येते; आपल्या मदानं, गंधानं सारा आसमंत दरवळून टाकते, नि आली तशी निघून जाते. येते तेव्हा वाटतं, ही चिरकाल अशीच वहात राहील. ही भावना इतकी प्रबळ असते, की तुम्हाला तीबद्दल कणाचाही संदेह वाटत नाही. तीव्र निःशंकतेच्या भरात हरतऱ्हेच्या आणाभाका घेऊन मोकळे! हा केवळ वसंतवारा आहे, याचं भान नसतं तुम्हाला, तुमच्या प्रेमिकाला. वाऱ्याची झुळूक यायची तेव्हा येणार, जायची तेव्हा जाणार. तिचं येणं-जाणं आपल्या हातात नसतं. तिला धरून ठेवता येत नाही. उघड्या तळव्याला तिचा मंद गारवा जाणवतो, सुखावतो; पण मूठ झाकली रे झाकली की गारवा गायब, गंध गायब.
प्रेम - करावं की करू नये? - सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. इतक्या पूर्णत्वाने, इतक्या सर्वांशाने तुमच्यावर अवलंबून असतं की धडकीच भरते. ‘माझं काही चुकलं तर..?’
प्रेमात पडताना तुम्ही भीषण डगमगता, चिंतातुर होता. ‘माझा निर्णय योग्य आहे ना? ही स्त्री / हा पुरुष मला अनुरूप आहे ना? मी त्याला/तिला साजेशी आहे ना? पटेल ना आमचं नक्की?...हा क्षणिक मोह तर नव्हे? निव्वळ आकर्षण तर नव्हे?’ ...सतराशे साठ प्रश्न! ओह्हो, तुम्ही प्रेमाला मोठीच समस्या बनवून टाकता. आणि सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कुठला असतो तुमच्यालेखी? - 'हे प्रेम टिकेल ना? कायम असंच राहिल ना?'
तेव्हा प्रेम उडनछू होण्यापूर्वी, तुमच्या तावडीतून निसटण्यापूर्वी तुम्ही कायद्याची मदत घेता, शासनव्यवस्थेची, धर्माची, समाजाची मदत घेता. प्रेम सुस्थिर, सुनिश्चित व्हावं; त्याला इतरांची मान्यता लाभावी यासाठी आवश्यक ते सोपस्कार करता.
तुमचा स्वतःवर विश्वास नसतो, आपल्या प्रेमिकावर विश्वास नसतो; विश्वाच्या गूढक्रीडेवर, वास्तव ज्याप्रकारे उलगडत जातं त्यावर विश्वास नसतो, अन् प्रेमावरदेखील विश्वास नसतो. सारंकाही प्रेमावर सोपवून निर्धास्त होत नाही तुम्ही. प्रेमाच्या चरणी स्वतःला पुरतं वाहून टाकत नाही तुम्ही.
सर्वच समाजांत प्रेम-प्रकरणांचा धिक्कार केला जातो, काही अंशी अद्यापही केला जातो. माणसाच्या पुष्कळ पिढ्यांना याची चांगलीच कल्पना आहे. शतकानुशतकांचा अनुभव त्यांच्या सामूहिक चेतनेत (collective consciousness) रुतून बसलाय. प्रेम काय करू शकतं, प्रेमामुळे काय-काय घडू शकतं हे त्यांनी पाहिलंय. ‘पालकांनी, नातेवाईकांनी मुला-मुलींकरता जोडीदार शोधावा हे उत्तम’, असं ते याच कारणाने म्हणू लागले असावेत. जगभरात ही प्रथा आता-आतापर्यंत प्रचलित होती - भारतात आजही सर्रास पाळली जाते. प्रेम चंचल असतं बाबा, त्याचा काय भरोसा! तेव्हा निसर्गयोजनेत विवाह नसला, तरी मानवी समाज तुमच्यावर विवाहबद्ध होण्यासाठी दबाव आणू शकतो; लग्नाचा करार करण्यास तुम्हाला भाग पाडू शकतो.
प्रेम ही विलासिनी आहे! अत्यंत चैतन्यमयी घटना असते ती - निश्चल, स्थायी नव्हे.
शेवटी काय, लग्न करा, करू नका...वाट्टेल तो घोळ घाला, पण लग्न करण्या - न करण्याचा प्रेमाशी, सत्याशी, सुखाशी, शांतीशी, मांगल्याशी, मुक्तत्वाशी जराही संबंध नसतो इतकं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. निदान स्वतःला फसवू नका रे!
जवळजवळ सर्व नागर (civilized) समाजांनी लग्नसंस्थेची तळी उचलली. का बरं?
मला वाटतं व्यक्तीवरील भार हलका करण्याचा त्यांचा उद्देश असावा. ‘प्रेमाचा उन्माद; ती बचैनी, आर्तता झेपत नाही माणसाला. याबाबत काहीतरी केलं पाहिजे...’ शिवाय कौटुंबिक मालमत्तेचं रक्षण व्हावं, संततीचं हित जपलं जावं, संततीच्या भविष्याची तजवीज व्हावी इ. हेतू असतील. अंती 'नुसत्या प्रेमाने काम भागणार नाही' हा निष्कर्ष त्यांनी काढला असावा.
प्रेम कधी असं, कधी तसं असतं; त्याचे रागरंग बदलत रहातात. अखंड मौज सुरू असते... वा! किती अविरतपणे खेळकर असतं प्रेम! सकळ जीवनाचा अतिथी - आज मुक्कामाला आहे, कदाचित उद्या निरोप घेईल. जेव्हा येतं तेव्हा प्रेम ओसंडून वहातं. नि जातं खूणही मागे न ठेवता, पायरव न करता - जणू नव्हतंच कधी!
शहाणे असाल (फारच थोडी माणसं शहाणी असतात!) तर लाभलेल्या प्रत्येक क्षणाप्रती - चालूकाळातील असो वा भूतकाळातील असो - प्रत्येक सुंदर क्षणाप्रती तुम्ही कृतज्ञ व्हाल, धन्य व्हाल. तुम्ही स्वतःला भाग्यवान मानाल, कारण तसं पहाता हे क्षण तुमच्या पदरात पडण्याची काहीच ‘गरज’ नव्हती. अर्थाअर्थी काही संबंध नव्हता. अतोनात प्रेम बरसलं तुमच्यावर या क्षणांत - तुम्ही त्यालायक आहात का, तुमची ते पेलण्याची तयारी आहे का, तुम्हाला त्याची आवश्यकता आहे का, असलं काsही, काsही न विचारता! या ओंजळभर क्षणांत जगण्याची चव चाखलीत, मृत्यूची चव चाखलीत, शुद्ध भक्तीची चव चाखलीत तुम्ही.
शहाणे असाल तर तुम्ही आपल्या ऱ्हदयाच्या कुपीत हे क्षण जपून ठेवाल. प्रेम करण्याची, प्रेम देण्याची, घेण्याची तुमची क्षमता अधिक गहिरी, अधिक विशाल, अधिकाधिक उत्कट होत जाईल. पण मी मघा म्हटल्याप्रमाणे शहाणी माणसं फारच थोडकी आहेत या जगात. नव्व्याण्णव टक्के माणसं या क्षणांवर पश्चात्ताप करतात, 'कशाला प्रेमाच्या भानगडीत पडलो' म्हणून दुःख करतात. ती कडवट, दुर्मुखलेली होतात. आपल्याशी प्रतारणा झाली, आपण फसवले गेलो असं मानून त्रस्त होतात. प्रेम कधीच म्हटलं नव्हतं, 'मी सदानकदा तुमच्यात राहीन' म्हणून. ती तुमची धारणा होती, तुमच्या प्रेमिकाची धारणा होती. तुमच्या समजुतींशी, धारणांशी प्रेमाला काय देणं-घेणं? त्याच्या येण्यावर तुमचा अधिकार नव्हता, तुमचं नियंत्रण नव्हतं. त्याच्या जाण्यावर तुमचं नियंत्रण असेलच कसं? परंतु नव्व्याण्णव टक्के माणसं चक्क ठोकळे असतात, कमालीची मूर्ख असतात. गतप्रेमाचे क्षण आठवून त्यांना मनस्ताप होतो, चीड येते. भरीस भर म्हणून तुमचा प्रेमिकही त्या नव्व्याण्णव टक्क्यांमधला असेल, तर तोदेखील तसाच वागेल.
एकेकाळी ज्यांचं एकमेकांवर प्रेम होतं त्यांनी एकमेकांचा द्वेष करणं, वैर धरणं...छ्या!
मला वाटतं ह्या सर्व भानगडींना फाटा देण्याच्या हेतूने आधुनिक होत गेलेल्या प्रत्येक समाजाने काहीएक बंदोबस्त केला असावा, ज्यायोगे प्रेमाच्या तुफानात घुसण्याऐवजी लोक विवाहाचा आसरा घेतील. पण 'विवाह', 'लग्न' म्हणजे नेमकं काय? - एकतऱ्हेची भागीदारी, इतकंच. दोन किंवा अधिक व्यक्ती एका छताखाली रहातात, एकमेकांशेजारी निजतात, प्रणय करतात; अपत्यांना जन्म देतात, त्यांचं संगोपन करतात; भल्या-बुऱ्या प्रसंगी एकमेकांना आधार देतात, स्वास्थ्य-अस्वास्थ्याच्या काळात एकमेकांची देखभाल करतात. ही सहकारिता आहे - सहवास, साहचर्य म्हणता येईल. छान असतं हे. प्रेमाचं हे एक अंग असू शकेल, एक अंश असू शकेल, परंतु लाखो लोक या भागीदारीलाच ‘प्रेम’ समजतात.
‘प्रेम चिरंतन असतं; कायमस्वरूपी टिकतं तेच प्रेम; खऱ्या प्रेमाला मरण नसतं...’ कोट्यावधी लोकांची अशी समजूत असते - मी म्हणतो बकवास आहे!! खरं प्रेम कदाचित अकाली कोमेजून जाईल. ते मरेल, क्वचित पुनर्जीवित होईल; मरगळेल, पुन्हा उभारी घेईल... काsही सांगता येत नाही. कसलीच शाश्वती नाही. खोटं प्रेम खुश्शाल अबाधित राहिल. वाटेल तेवढी लांबड लावा, वाटेल तितकं खेचा, काय फरक पडतो! ...प्लास्टिकची फुलं मरतीलच कशी?
विवाहसंस्था हा माणसानं स्वतःवर ओढवून घेतलेला अनर्थ आहे, त्यानं निर्माण केलेली एक नंबरची गचाळ व्यवस्था आहे. ह्म्म...काळजीपोटी, सदिच्छेनं निर्माण केली त्यानं ती. मला पूर्वजांच्या सद्भावनेबाबत तिळमात्र शंका नाही, मात्र त्यांच्यात तिळभर तरी शहाणपण होतं अथवा नाही याबद्दल भयंकर संशय आहे! ते हितैषी असतील भले, पण त्यांची शहाणीव फारच भंपक, सुमार निघाली हो! सद्भावनेबरोबरच त्यांच्यात तसूभर जरी शहाणपण असतं, तर त्यांनी प्रत्येक मुला-मुलीला बालपणापासून प्रेमविलासाची, प्रेमविधांची माहिती होईल याची व्यवस्था केली असती. निकोप, दिलखुलास समाजातील प्रौढांनी आपल्या प्रेमजीवनातील अनुभव, समस्या, सुखदुःखं प्रांजळपणे तरुणांपुढे विशद केली असती. असं घडतं, तसंही घडतं हे त्यांनी मुलांना उमजू दिलं असतं. प्रेम होतं, प्रेम येतं. यथावकाश तुमच्याही जीवनात ते प्रवेश करेल - एकदा, अनेकदा. हे सारं अत्यंत नैसर्गिक आहे, त्यात घाबरण्याजोगं काही नाही याची स्वच्छ कल्पना मुलांना दिली गेली असती.
प्रेमात नित्यता नसते. प्रेम एक खेळ आहे - काय भन्नाट खेळ आहे राव! प्रेम कुठवर टिकेल कुणी सांगावं, पण उफ्फ! किती अद्भुत असतात ते क्षण! शतजन्म मोजून पदरात घ्यावे असे क्षण! नित्यतेला (permanence) इतकं महत्त्व का देतो आपण? जगणं म्हटलं की बदल आलाच. जीवन प्रवाही आहे. केवळ मृत्यूचा क्षण निश्चित असतो. खात्री फक्त मृत्यूची असते.
आपलं प्रेम एकाच व्यक्तीपुरतं मर्यादित ठेवण्याची काही जरूर नाही. एकाच प्रेयसीशी, प्रियकराशी का म्हणून जखडून घ्यावं तुम्ही स्वतःला? ते निसर्गयोजनेत बसत नाही, सृष्टीचा तसा हेतूच नाही. वाटेल तितक्या लोकांवर तुम्ही जिवापाड प्रेम करावं, भरभरून प्रेम द्यावं-घ्यावं अशी निसर्गाची रचना आहे. ‘अ’ स्त्रीकडून / पुरुषाकडून तुम्हाला जे मिळेल त्याहून कितीतरी निराळी देवघेव तुम्ही ‘ब’ स्त्री / पुरुषाशी करू शकाल. प्रत्येक प्रेमसंबंधाचा अनुभव सर्वथा भिन्न असेल, कारण हरेक व्यक्ती भिन्न आहे. हरेक व्यक्तीच्या सान्निध्यात असताना तुम्हीही भिन्न असता. अपार वैविध्य हेच तर सृष्टीचं सौंदर्य आहे. प्रत्येक प्रेमसंबंध तुमच्या अस्तित्वाच्या भिन्न मितीला स्पर्श करतो. प्रत्येक प्रेम आपापल्या खास रितीनं तुम्हाला तृप्त करतं. व्यक्ती-व्यक्तीमधे तुलना होऊच शकत नाही. आपल्या प्रियकर / प्रेयसीच्या अन्य प्रेमींबद्दल मत्सर वाटून घेण्याला मुळी अर्थच नाही. माणसाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जीवांमधे असल्या तुलनेला, ईर्ष्येला थारा नाही.
त्यामुळे प्रेमातील साऱ्या उपद्व्यापांना, अडीअडचणी, व्याकुळता, चिंता, निराशेला; सुखांना, गंमती-जंमतींना माझा पूर्ण पाठिंबा आहे. होऊ देत जे जे व्हायचं ते. मी फक्त एवढंच म्हणेन, की शहाणपणाने प्रेम करा. तुम्हाला दुःख होतं ते प्रेम आटून गेलं, नातेसंबंध तुटला म्हणून नव्हे. तुमच्या यातनांना जबाबदार असता तुम्हीच - तुमचा मूर्खपणा, अडमुठेपणा. त्यामुळे एखादं नातं फिस्कटलं तर प्रेम करणं थांबवू नका, प्रेमात पडण्यापासून स्वतःला रोखू नका, त्याची अजिबात गरज नाही. गरज आहे सजग होण्याची, मूर्खपणा थांबवण्याची. निर्बुद्धपणे प्रेम करू नका.
मानवजातीला काही एक सुचवण्याची जर मला मुभा असेल, तर मी तिला हे सुचवू इच्छितो: परस्परांना प्रेमाचे नाना ढंग, नाना रूपं अनुभवू द्या. प्रेममंथनात घुसळून निघू द्या, प्रेमाच्या चक्रीवादळात सापडू द्या. स्वतः शोधा, शिका, उकल करा, इतरांनाही करू द्या. भीतीपोटी, काळजीपोटी एकमेकांना चार भिंतींत डांबून ठेवू नका. तसं केल्यास चार भिंतींच्या आत तुम्ही सुरक्षित रहालही कदाचित, पण तुमचं अस्तित्व खुंटेल. तुमचं अंतःकरण, तुमचं मर्म बहरणार नाही; ते कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत निमूट मरून जाईल. कबरीच्या आत कसला आलाय धोका! थडगं फारच प्रशस्त, आरामदायी असतं. संगमरवरी चौथरा, त्यावर लफ्फेदार सोनेरी अक्षरांत तुमचं नाव कोरलेलं... पण आत मुडदे असता तुम्ही. मरून गेलेले असता.
- ज्याला मी ‘ईश्वरत्व’ (godliness) म्हणतो, ते जगण्याची, अनुभवण्याची ही रीत नव्हे.
- ओशो (रजनीश)
Related posts: प्रेम म्हणजे स्वातंत्र्य
Comments
Post a Comment