बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू एकमेकांचे समकालीन. चीनमधील चहापानाच्या दुकानात एकदा तिघांची भेट झाली म्हणे. गप्पाटप्पा सुरु होत्या. दुकानमालकानं ओळखलं तिघांना. त्यांच्या बैठकीपाशी येऊन तो म्हणाला, "आपण आमचे खास पाहुणे. आपणा तिघांना इथं पाहून झालेल्या आनंदाप्रित्यर्थ मी एक खास पेय पेश करतो. ..'जीवनरस' म्हणतो आम्ही याला". हातांतली किटली त्यानं तिघांपुढे तिपाई मेजावर ठेवली. बुद्धानं सुहास्यवदनाने किटलीवरील कलाकुसर न्याहाळली, व दुकानदारास शांतपणे म्हणाला, "धन्यवाद. परंतु जीवन म्हणजे साक्षात् दुःख. दुःखमुक्ती हे माझ्या शिकवणीचं सार असताना मी हा रस कशाला चाखू!" कन्फ्यूशिअसनं त्या सुरेख किटलीचं झाकण अलगद उघडलं. तो म्हणाला, "एकही थेंब चाखून न पाहता अशी भेट नाकारणं बरोबर नव्हे." त्यानं अगदी थोडं पेय कपात ओतून घोट घेतला. पेय घशाखाली जाताच त्याचा चेहरा कसनुसा झाला. "बुद्धा, खरंय तुझं म्हणणं," कन्फ्यूशिअस म्हणाला, जीवनरस उग्र आहे, कटु आहे. पिऊन जाम हैराण होतो माणूस. यात काही अर्थ नाही". लाओ-त्सूची पाळी येता त्यानंही किटलीची कारागिरी नीट निर...