बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू चहाला भेटले...

बुद्ध, कन्फ्यूशिअस व लाओ-त्सू एकमेकांचे समकालीन. चीनमधील चहापानाच्या दुकानात एकदा तिघांची भेट झाली म्हणे. गप्पाटप्पा सुरु होत्या. दुकानमालकानं ओळखलं तिघांना. त्यांच्या बैठकीपाशी येऊन तो म्हणाला, "आपण आमचे खास पाहुणे. आपणा तिघांना इथं पाहून झालेल्या आनंदाप्रित्यर्थ मी एक खास पेय पेश करतो. ..'जीवनरस' म्हणतो आम्ही याला". हातांतली किटली त्यानं तिघांपुढे तिपाई मेजावर ठेवली. 
 
बुद्धानं सुहास्यवदनाने किटलीवरील कलाकुसर न्याहाळली, व दुकानदारास शांतपणे म्हणाला, "धन्यवाद. परंतु जीवन म्हणजे साक्षात् दुःख. दुःखमुक्ती हे माझ्या शिकवणीचं सार असताना मी हा रस कशाला चाखू!"

कन्फ्यूशिअसनं त्या सुरेख किटलीचं झाकण अलगद उघडलं. तो म्हणाला, "एकही थेंब चाखून न पाहता अशी भेट नाकारणं बरोबर नव्हे." त्यानं अगदी थोडं पेय कपात ओतून घोट घेतला. पेय घशाखाली जाताच त्याचा चेहरा कसनुसा झाला. "बुद्धा, खरंय तुझं म्हणणं," कन्फ्यूशिअस म्हणाला, जीवनरस उग्र आहे, कटु आहे. पिऊन जाम हैराण होतो माणूस. यात काही अर्थ नाही". 
 
लाओ-त्सूची पाळी येता त्यानंही किटलीची कारागिरी नीट निरखली; सुबक मातीकामाला नजरेनंच दाद दिली. मग थेट किटली तोंडाला लावून त्यानं सारं पेय एका दमात संपवलं. तो आसनावरून उठला, नाचू लागला. कितीतरी वेळ लाओ-त्सू बेहोषपणे नाचला; काहीसाही आरडत-ओरडत राहिला.
कैफ सरल्यानंतर तो आपल्या जागी येऊन शांत बसला. बुद्ध व कन्फ्यूशिअस यांना कोण उत्कंठा! 
"काय रे..?" इतकंच म्हणाले दोघे. 
 
"काय सांगू! जीवनरसाची पुरती चव चाखल्याशिवाय त्याबाबत काही बोलणं व्यर्थ आहे, नि एकदा ती चाखली, एकदा सगळा रस गटकवला, की बोलण्यासारखं काही उरत नाही. 
 
बुद्धा, तू पेय न पिताच शेरा मारून मोकळा झालास. कन्फ्यूशिअस, तू अत्यंत सावधपणे घोट घेऊन फैसला करून टाकलास. तत्त्वज्ञानावर आधारलेले तुमचे निर्णय योग्य असतीलही कदाचित, पण त्यापायी तुम्ही चक्क जीवनानुभव नाकारलात. थेट प्रत्ययाहून, जिवंत जाणिवेहून श्रेष्ठ काही असतं का? 'जिवंत असणं म्हणजे काय' हे जाणायचं तर जीवनरस चाखलाच पाहिजे, त्याचा साकल्यानं आस्वाद घेतला पाहिजे. 
 
मध्यम-मार्गाच्या तुमच्या शिकवणीत तथ्य असेलही, पण मध्य गाठण्याकरता धडपडणं, जीवनाला नियम-तत्त्वांचे बांध घालणं मूर्खपणाचं आहे. सराव, साधना, जोपासना, कष्टानं साध्य होणारी ती गोष्टच नव्हे. समतोल येतो, मुद्दाम साधला जाऊ शकत नाही. शहाणपण येतं, प्राप्त केलं जाऊ शकत नाही. सहजता येते, साधावी लागत नाही. साधावी लागत असेल तर त्या सहजतेला काय अर्थ! 
 
जीवन विशाल आहे, गतिमान आहे, अनित्य आहे. जीवनलीलेचा शब्दातीत नैसर्गिक अनुभव घेऊनच आपण धन्य पावतो, त्यावर सिद्धांत वा कल्पना लादून नव्हे."

 

Comments