बोधिधर्म आणि सम्राट वू

इसविसनाच्या सहाव्या शतकात बोधिधर्म नावाचा भिक्षु तीन वर्षं खडतर प्रवास करून चीन देशी पहोचला. त्याच्या आगमनाच्या शंभर-दोनशे वर्षांआधीपासून चीनमध्ये बौद्ध धर्म प्रस्थापित होत गेला होता. मात्र बुद्धाची शिकवण आचरणात आणण्याच्या नावाखाली चाललेले प्रकार पाहून बोधिधर्माला आत्यंतिक खेद वाटला. त्यानं ज्या तत्त्वांचा चीन देशात उच्चार केला त्यातून बौद्ध धर्माला नवी शाखा फुटली - चिनी भाषेतील 'चान', जपानीतील 'झेन', कोरिअनमधील 'सॉन' व व्हिएतनामी भाषेतील 'त्छ्यान' ही सारी 'ध्यान' या संस्कृत शब्दाची रूपं.
 
 
बोधिधर्माच्या आगमनाची वार्ता कळताच 'सम्राट वू'नं त्याला आपल्या भेटीस बोलावून घेण्याची खटपट चालवली. 
दक्षिण चीनमधे ल्यांग घराण्याची सत्ता प्रस्थापित करणाऱ्या सम्राट वू ची त्याकाळी बौद्ध धर्माचा अनुयायी व आश्रयदाता म्हणून मोठी ख्याती होती. धर्माच्या शिकवणीनं प्रभावित झालेल्या वू नं राज्याच्या कायद्यांत अनेक बदल केले. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली गेली. सणासुदीला प्राण्यांचा बळी घालण्यावर बंदी घातली गेली. जागोजागी बौद्ध मंदिरं उभारण्यात आली. बौद्ध मठांना सम्राट सढळ हाताने मदत करत असे. इतकंच काय, धर्मावरची आपली कट्टर श्रद्धा दाखवून देण्याकरता त्यानं ताओ-पंथीय मंदिरं उध्वस्त केली, ताओ उपदेशकांना जबरदस्तीनं धर्मत्याग करायला लावला.

 
अशा या सम्राटानं बोधिधर्माला समारंभपूर्वक राजवाड्यात आणलं, त्याचा सत्कार केला. खास निमंत्रितांची, प्रतिष्ठित पाहुण्यांची, विद्वज्जनांची आज दरबारात गर्दी होती
 
सम्राट वू बोधिधर्माला म्हणाला: "मी धर्माचा सच्चा अनुयायी आहे. मी भिक्षुंना दीक्षा देववतो, मठ-मंदिरांना लागेल ते सहाय्य करतो. धम्मसूत्रांच्या हस्तलिखित प्रती करवून घेत असतो. बुद्धाची चित्रं, शिल्पं निर्माण करून घेतो. आजवर मी किती पुण्य कमावलं हे आपण सांगू शकाल का?"
"शून्य, महाराज" बोधिधर्मानं उत्तर दिलं. 
"...मी समजलो नाही."
"आपण हे सर्व उपक्रम पुण्य मिळवण्याच्या उद्देशाने करता, म्हणून आपण काहीच पुण्य कमावलेलं नाही".
"चार आर्यसत्यांचं सार काय ?" सम्राटानं तडक पुढचा प्रश्न विचारला.
"तसलं काही नाही. विशाल रिक्तता आहे. मोकळा अवकाश (space) आहे बस्स," बोधिधर्म म्हणाला.
"हो का!" सम्राट खवटपणे उद्गारला. बोधिधर्माच्या दिशेनं बोट रोखत त्यानं विचारलं, "माझ्या पुढ्यात हे कोण बसलंय?" 
"माहित नाही, महाराज." बोधिधर्म उत्तरला.
 
 

या प्रसंगानंतर सम्राटाला बोधिधर्माचं तोंड पाहण्याची इच्छा नव्हती. पुन्हा त्यानं बोधिधर्माशी संपर्क साधला नाही. 
...धर्मधुंद सम्राटाचं राजकीय घडामोडींकडे अधिकाधिक दुर्लक्ष होत राहिलं. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं. 
तुरुंगवासात उपासमारीनं मेला सम्राट वू.
 
 
मात्र त्याच्या व बोधिधर्माच्या भेटीची एक आख्यायिका नुकतीच माझ्या वाचनात आली:
 
सम्राट म्हणाला, “आजवर कित्येक भिक्षुंशी, पंडितांशी चर्चा केली मी - काही उपयोग झाला नाही. पुष्कळ सायास केले, पण छे! ...हा 'स्व', हा 'मी'पणा, 'अहंकार' - यापासून मुक्ती कशी मिळवावी? बुद्ध सांगून गेला, 'स्व'चा लोप होत नाही तोवर दुःखाला अंत नाही. पण ते व्हावं कसं?"

बोधिधर्माने शांतपणे वू च्या नजरेला नजर दिली. “डोंगराच्या पायथ्याशी, मंदिरात माझा मुक्काम आहे. अहंकार संपवण्याची खरोखर इच्छा असेल तर उद्या पहाटे चार वाजता माझ्याकडे या. तुमच्या त्या 'स्व'ला, 'मीपणा'ला आपण कायमचं खलास करू. पण लक्षात ठेवा: तुम्ही निःशस्त्र असायला हवं, नि एकट्यानं यायला हवं - लवाजम्यासह नव्हे.”
 
वू काही बोलला नाही. चक्रावला होता तो. 'अहंकारापासून मुक्त होण्यास एक सकाळ पुरे?? लोक वर्षानुवर्षं साधना करतात त्यासाठी.....कसं शक्य आहे!' 
त्या रात्री सम्राटाला झोप लागली नाही. जावं की जाऊ नये?
 
पहाटे चार वाजता त्यानं मंदिराचं दार ठोठावलं.
बोधिधर्मानं दार उघडलं. "या महाराज. इथे मांडी घालून बसा. डोळे मिटा. मी तुमच्यासमोर बसून राहणार आहे. ज्याक्षणी तुम्हाला तुमचा तो 'स्व', 'मी', 'अहं' दिसेल त्याक्षणी त्याला धरा. झडप घाला त्याच्यावर, पकडून ठेवा त्याला, नि डोळे उघडून मला इशारा करा म्हणजे मी त्याला संपवेन."

वातावरण निःस्तब्ध होतं. एक तास झाला, दोन तास झाले, तीन तास... कोवळी सूर्यकिरणं आत येऊ लागली.
या दोन-तीन तासांच्या अवधीत सम्राट वू डोळे गच्च मिटून स्वतःचं अंतःकरण पिंजत होता. चेहऱ्यावर तणाव, रेषा ठळक झालेल्या. अधूनमधून मान हलतेय. आतल्या अंधारात वाट पहात होता तो, दबा धरून बसला होता. 
डोक्यात विचारांची गर्दी, सततची पुटपुट.. त्वचेवर पहाटगारवा... कुठेतरी खुट्ट होईल, नेहेमीपेक्षा काही वेगळं जाणवेल या आपेक्षेनं सावध बसला होता तो. 
वेळ सरत गेला तसतशी त्या चेहऱ्यावर स्वस्थता आली. मिटलेल्या डोळ्यांवरचा ताण सैलावला. विचारांची पुटपुट कुठल्याही प्रयत्नाखेरीज विरत चालली. ..आली, पुन्हा गेली. तिच्या जाण्यायेण्याचा त्रास होईना.
 ...कुुठे काय? - काहीच नाही.

बोधिधर्म गंमत पहात बसला होता. सम्राटानं नकळत, अलगद डोळे उघडले. 
"सापडला का गुन्हेगार?" जरावेळानं बोधिधर्माने हसत विचारलं,  "तुमचा तो 'स्व', 'मी', अहंकार?"
"- नेहेमीपेक्षा वेगळं काहीच दिसलं नाही, जाणवलं नाही," सम्राटाच्या चर्येवर गोंधळ होता.
"नसेलच तर दिसणार कसं? आपण ज्याला 'मी', 'स्व', 'अहं' म्हणतो ती गोष्ट मुळी अस्तित्वातच नसते.
'माझा मुकुट, माझी प्रजा, माझं राज्य' - माझं म्हणजे कुणाचं? - या शरीराचं? मनाचं? नावाचं? - बरं.
'माझं शरीर, माझं मन' - म्हणजे नक्की कुणाचं? 
वस्तु आहे, अस्तित्व आहे म्हणजे त्याचा कोणीतरी स्वामी असला पाहिजे, कर्ताधर्ता असला पाहिजे अशी आपली समजूत असते. केवळ शब्द आहेत ते.
आपण स्वतःत डोकावून बघत नाही तोपर्यंत अहंकाराचा भ्रम टिकून रहातो. स्वतःचा, इतरांचा अहंकार सुखावण्यासाठी आपण नाना लटपटी करतो, अहंकार दुखावला की क्षुब्ध होतो, चवताळतो - 'अहंकार दुखावतो' म्हणजे  नेमकं काय दुखावतं? विचारलंत कधी स्वतःला?
अहंकाराचा भ्रम असेल तोवर क्लेश (suffering) होतात. मग वाटतं अहंकारापासून मुक्ती मिळवली पाहिजे. कोण मिळवणार मुक्ती? भ्रमिष्ट मन स्वतःला भ्रममुक्त करणार? - अजब कसरत आहे बुवा!"

Comments