शुनऱ्यू सुझुकी रोशींच्या बोलण्यातून...
व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ अशा विभागणीपलिकडे गेल्यावर सर्वच गोष्टींच्या एकत्वाचा (oneness) आपल्याला बोध होतो - व्यक्तिनिष्ठता व वस्तुनिष्ठता यांचं एकत्व. बाह्य व आंतरिक विश्वाचं एकत्व. उदाहरणार्थ, ध्वनि म्हणजे काय? ध्वनि व कोलाहल यांमधे फरक करतो आपण. ध्वनि किंवा स्वर अधिक खरा वाटतो, जवळचा वाटतो. साधनेतून, म्हणजेच आत्म-भानातून येतो तो ध्वनि, स्वर. कोलाहल, गोंगाट हा वस्तुनिष्ठ वाटतो, बाहेरून येतोय असं वाटतं. त्याचा त्रास होतो, त्यामुळे आपण विचलित होतो. परंतु ध्वनि, शब्द, आवाज हा वस्तुनिष्ठ असतो व आत्मनिष्ठदेखील असतो. बौद्ध आकलनानुसार गोंगाट, कोलाहल वा कर्कशता हासुद्धा आपण निर्माण केलेला ध्वनि असतो. "तिथे झाडावर पक्षी गातोय" असं भले आपण म्हणू, मात्र त्याचा स्वर कानी पडल्याक्षणी, त्याच्या अस्तित्वाची जाणीव होताक्षणी आपणच पक्षी होऊन गेलेलो असतो. पक्षी 'इथे', मनात अवतरलेला असतो; मन पक्षी होऊन गात असतं, चिवचिवत असतं. वाचत बसलेले असताना 'ब्लू जे' पक्ष्याचा आवाज ऐकू येतो. आपण म्हणतो, "हा 'ब्लू जे'चा आवाज...आज जरा विचित्र ओरडतोय नै..." विचार चालू ह...