टाकून दे
एक होता राजा. बुद्धाला भेटण्याची त्याची इच्छा होती.
बालपणापासून मनावर ठसवण्यात आलेल्या, दरबारात पाळल्या जाणाऱ्या शिष्टाचारांचा परिपाक म्हणून बुद्धाच्या भेटीस जाताना काहीतरी घेऊन जावं - एखादा उपहार, नजराणा - (रित्या हाती जाणं बरं नव्हे) असं त्याला वाटत होतं.
आपली पत्नी बुद्धाला अनेकदा भेटली आहे, हे राजाला ठावूक होतं.
त्या रात्री शयनगृहात बुद्धभेटीचा विषय निघाला. "...मला वाटतं आपल्या संग्रहातील ते अत्यंत दुर्लभ, तेजस्वी रत्न - जे मला प्राणप्रिय आहे; जे डोळा भरून पाहण्याची संधी आजवर फार थोड्या लोकांना लाभलीय - ते रत्न बुद्धाला पेश करावं. यापूर्वीही सम्राटांनी, राजे-रजवाड्यांनी, धनिकांनी बुद्धाला तऱ्हतऱ्हेच्या मौल्यवान वस्तूू भेट म्हणून दिल्या असतील. पण हे रत्न म्हणजे... अवघ्या जगात याच्या तोडीस तोड नसेल. हा नजराणा पाहून बुद्ध प्रसन्न व्हावा, आणि आमची भेट बुद्धाच्या सदैव स्मरणात रहावी अशी माझी इच्छा आहे. तुमचं काय मत?"
राजाची ही राणी स्पष्टवक्त्या, मिष्किल स्वभावाची होती - बुद्धासंबंधी चाललेलं राजेशाही थाटातलं बोलणं ऐकून खुदुखुदु हसत होती. शेवटचं वाक्य ऐकून तर ती मोठ्याने हसली.
"हसतेस का?" राजानं विचारलं.
"आपल्याला रत्न न्यावंसं वाटतं, तर जरूर न्या. पण मला वाटतं बुद्धाला रत्नांचं काsही कौतुक नाही. हे बहुमोल खडे त्याच्या दृष्टीनं वाटेवरल्या दगडगोट्यांसारखे".
"मग?"
"टवटवीत कमलपुष्प पाहून बुद्ध खूष होईल असं मला वाटतं".
"अच्छा? ते का बरं?"
"कमळ हे अत्यंत सगर्भ प्रतीक आहे - उत्थानाचं, माङ्गल्याचं. ...आपल्या उद्यानातील तळ्यात पुष्कळ सुरेख कमळं आहेत. हवं तर पहाटेच्या माळ्याला त्यातलं एक खुडून आणायला सांगते."
'हं.. कमळ? त्यात काय विशेष? आजवर कितीतरी लोकांनी बुद्धाला कमळं अर्पण केली असतील. पण हरकत नाही, तिच्याही मताचा मान राखू या...' असा विचार करत राजा झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी बुद्धाकडे जाताना राजानं दोन्ही गोष्टी सोबत घेतल्या. बुद्धासमोर येताच नतमस्तक होऊन प्रथम त्यानं आपलं लाडकं रत्न सादर केलं.
बुद्ध म्हणाला, "टाकून दे".
राजानं आवंढा गिळला. 'काय?! हे अतिसुंदर रत्न टाकून द्यायचं? धुळीत फेकायचं?' त्यानं संदेही मुद्रेनं बुद्धाकडे पाहिलं. बुद्ध काही न बोलता त्याच्याकडे पहात राहिला. राजाच्या तळव्यांना घाम फुटला. बुद्धाचे शिष्य, जमलेले सारे लोक त्याच्याकडे पहात होते.
नाखुषी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत राजानं ते रत्न ओंजळीतून सोडून दिलं.
आता त्यानं प्रफुल्लित कमलपुष्प बुद्धापुढे धरलं. मनात चलबिचल होती. 'या भेटीचा स्वीकार झाल्यास आपण हरलो नि राणी जिंकली असं होईल...'
बुद्धाचं तेच उत्तर: "टाकून दे".
कमळाचा देठ सोडताना राजाला क्लेश झाले नाहीत. आतल्या आत छद्मी हसला तो. 'म्हणजे तीही चुकली तर...' कावऱ्याबावऱ्या अवस्थेत उभा असताना पुन्हा ते शब्द त्याच्या कानी पडले: "टाकून दे".
चपापून राजानं पुनश्च बुद्धाच्या डोळ्यांत पाहिलं. 'आपण ऐकलं ते खरंच. ...अरे, काय चाललंय काय! आता टाकून द्यायला हाती आहेच काय? वेडाबिडा आहे की काय हा मनुष्य?' आपलं मनोगत ऐकून राजा वरमला.
बुद्धाचा शिष्य 'आनंद' जवळच उभा होता. सबंध प्रकार पाहून तो हसू लागला. खालच्या आवाजात राजा म्हणाला "आपण का हसता? मला तर काही समजेनासं झालंय..."
आनंद म्हणाला, "कमाल करता राजेसाहेब! 'रत्न टाकून दे', 'कमळ टाकून दे' असं कुठे म्हणाला बुद्ध? 'टाकून दे' इतकंच म्हणाला तो. 'मी राजा आहे, मी तुझ्या भेटीस आलोय, मी तुझ्याकरता नजराणे आणलेत, माझ्यातर्फे तुला अमूल्य रत्न...' हा जो 'मी' आहे, जो 'मी'पणाचा भ्रम आहे, कल्पना आहे ती टाकून देता आली, सोडून देता आली तर पहा. कारण माझ्या आठवणीत बुद्धानं आजवर अन्य कुठलाही नजराणा स्वीकारलेला नाही."
Comments
Post a Comment