न संपणाऱ्या रात्रीवर निघताना

शाई, कागद, पेनाच्या
ठरीव जागांची आठवण

एक चेहरा नव्याकोऱ्या मैत्रिणीचा
आणखी एक धूतवस्त्रात गुंडाळून ठेवलेला

तासांच्या गळ्यातील घोगऱ्या घंटा
पुस्तकांवरली धूळ
माळ्यातली वळवळ,
परसातल्या फुलांचा दरवळ
नि ती आपण फुलवल्याचा बोटभर अहंकार

बुडवूनही न मरणारी, स्वप्नांवर तरणारी वासना
आणि 'शाल' म्हणा, वा 'खाल' म्हणा साफ एकटेपणाची

न संपणाऱ्या रात्रीवर निघताना
सोबत घेता येतं जेमतेम एवढंच.

Comments