एक ते चार
|| १ ||
काही प्रवास विसरता येण्याजोगे नसतात
लहानशा मनातही लंबूटांग आठवणी मावतात.
लाल बस हेलकावणारी काळपट हिरव्या रस्त्याने
पिवळ्या झोतात चमकणारी झाडांची उन्हाळी हाडे-पाने
पांढरा चंद्र वाटोळा हासत होता, सारंकाही ठावूक असल्यासारखा...
मांजरपिलागत पेंगुळलेली सीटच्या मी कोपऱ्यात
उगवले कुठूनसे निळसर काळे दोन हात
जड कडवट श्वासांची, दहा बोटांची रात्र सळसळली अंगावरून
चंद्र गाऊ लागला एका पायावर पुलाच्या कठड्यावरून...
भुऱ्या आकाशात एकही ढग नाही.
बालिश आढेवेढे सैलावत गेले
विसरले नियम आईनं खालच्या आवाजात सुनावलेले
- खेळता खेळता एकटीला बाजूस ओढून
काहीबाही तिनं बडबडलेलं, मला
मुळी नव्हतंच आवडलेलं.
मी शेजारच्या दिशेनंं डोळा उघडला
ती शालीखाली घोरत होती.
थांबून थांबून गायला तो राकट पंजेदार आवाज
आणि गाडीचा खडखडाट.
...झोपेस्तो ऐकलेल्या त्या गाण्यानं चोरून झोपेत शिरणं
शब्द न-कळलेले तरी चाल मनात भिनणं
का बरं आवडत नाही पुष्कळांना
सारंकाही ठावूक असल्यागत हसणं?
|| २ ||
- पण 'तिनं' ते पुरतं हेरलं होतं
कॉलेजच्या लहानशा गच्चीत तिला फुलपाखरू सापडलं होतं
प्राणांसाठी त्याच्या तिनं हासण्याला साकडं घातलं होतं
दुपारी टेकडीवर माझी वंशी वाजते इतकंच ते म्हटलं होतं
...तिच्या काळ्या रेशमावर गोरटी जर भरणं
तिनं तळवे झाकून घेणं, मग तारांची वेडीवाकडी वळणं
माझ्या रानातले चित्कार
तिचे संतप्त फुत्कार,
तिच्या माळेतून मोती ओघळता
थेट 'त्याच्या' चोचीत पडणं...
|| ३ ||
त्याच्या पंखांत रंगीत पिसं फार होती
केव्हा, कोणतं, कुणाला द्यावं त्याचं त्यालाच सुधरत नसे
नि तो अवघा पिसाराच उपटून फेकत असे
- मला काळ्या ठिपक्यांचं शुभ्र पीस आवडलं असतं
विचारलं असतं त्यानं तर मी सांगितलं असतं;
मागल्या अंगणातले वेल उंचच उंच चढू लागले,
चंद्रावर सुगंधाचे डाग पडू लागले.
दुसऱ्या मजल्यावर नवी खोली...
हलवाहलवी झाली होती प्रेमाची,
तोडफोड व्हायची होती - मला कुठं माहित होतं?
ही खोली दुसऱ्या मजल्यावरली
आम्ही जांभळी रंगवून घेतली
तरी रंग उरणार आहे, माझ्याच अंगावर उडणार आहे - मला कुठं माहित होतं?
चंद्र इथं सहज उतरू शकत होता,
रात्रीची ओहोटी स्वस्थपणं बघू शकत होता.
चोचीचे घाव वाढत चाललेले - मधूनच खोल चावा
- तो घर करण्यासाठी जागा शोधत असावा.
काचांवर थापा मारून पावसानं जाग आणली
एकटीनंच मी जंगलाची वाट धरली,
पण जंगलं सारीच खाक होत चाललेली!
माझ्यातच म्हणून मग दशकांचे जंगल माजते
मात्र निबिडतेवर आता काळी टाप वाजते! -
|| ४ ||
काळ्या वाऱ्यावर गारठलेल्या झग्याची फडफड
म्यानात फुरफुरणाऱ्या बिजलीची धडपड
अजब भासते आता चांद्रसंगीत
अजबच असते मन्तव्य स्वारांचे -
सातासमुद्रापारहून राणीकरता अद्भुत रत्न आणायचे,
मायावी दैत्याच्या प्राणांचे गुपित सात दिवसांत जाणायचे...
पण होते संध्याकाळ, जंगल आडवे येते
सावल्यांचे जाळे पडते, तहान आठवते, मन उस्कटल्यागत होते.
स्वार सावकाश पाचोळा तुडवत चालतो
आपल्याही नकळत मूक, अनामिक, आर्त हाक घालतो
'त्याच्या माथ्यावर जखमेनं गाव वसवलं होतं' म्हणतात
ओठांना तरीही 'दंतकथां'चे दात हवेसे वाटतात.

Comments
Post a Comment