नखचोखी मुंगी
मी नखं कापून एका जागी रचून ठेवली व काही मिनिटांकरता दुसऱ्या कामात गुंतले. नखं गोळा करू म्हटलं तेव्हा एक मुंगी नखावर चढून काहीतरी करताना (खाताना / चोखताना) दिसली. नखं मोजून पाहते तर दोन तीन कोरी गायब झालेल्या! थोड्या अंतरावर मुंग्यांची रांग भिंतीतल्या फटीत चालली होती. कदाचित त्यांनी नेली असावीत. ही मुंगी मात्र जरा अधीर असावी, किंवा गर्दी टाळत असावी, कुणास ठावूक! पण ती नक्की काय करत होती? कशासाठी? आपली नखं 'केराटिन' नावाच्या कठीण प्रथिनानं बनलेली असतात. मुंग्यांना हे पचण्यास फार जड. परंतु कापलेल्या नखांतले मृत त्वचेचे अंश, काही प्रकारची बुरशी, (आपण हाताने जेवत असू / स्वयंपाक करत असू तर) अन्नाचे सूक्ष्मांश वा तत्सम जैविक घटक मुंग्यांच्या दृष्टीने खाण्यालायक असतात. त्यामुळे मुंग्यांच्या खाद्य-बेगमीत आपल्या नखांचा समावेश असल्यास आश्चर्य वाटायला नको! पश्चिम गोलार्धात आढळणाऱ्या 'अटिना' उपकुळातील मुंग्या पेशानं शेतकरी, पोषणासाठी बुरशीची लागवड करणाऱ्या. ही बुरशी केराटिनचं विघटन करू शकते, त्यामुळे या मुंग्या 'बुरशीचा खाऊ' म्हणून मानवी नखं वापरत असाव्यात. भारतातील ...