मॅडम ब्लावात्च्का व प्रेमाच्या बीया

प्रेम देणं, प्रेम करणं हा खरोखर सुंदर अनुभव असतो. तिथे तुम्ही महाराजा, महाधिपती असता. तुमच्यापाशी अमर्याद  खजिना असतो. तुम्ही तो मनसोक्त वाटू शकता. 'केव्हातरी हा खजिना रिता झाला तर!' अशी चिंता मुळीच करू नका. तसं होत नाही. प्रेम हे परिमाण नव्हे, तो भाव आहे, गुण आहे. प्रेमाच्या खजिन्याची अद्भुतता अशी की तो दिल्याने वाढतो, आणि कंजूषपणे स्वतःजवळ राखून ठेवल्याने कुजतो, निकामी होतो. तेव्हा प्रेमाबाबत काटकसर करू नका, उधळखोर व्हा! आपण प्रेमाचा वर्षाव कोणावर करताहोत याची फिकीर करू नका - 'मी विशिष्ट लोकांवरच प्रेम करेन' हा विचार कोत्या मनाचं लक्षण असतं. 'कुणी मागितलं तर मी देईन' म्हणून खोळंबून राहू नका - प्रेम द्या! देत रहा!

थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम ब्लावात्च्का  (इंग्रजी उच्चारानुसार हेलेना ब्लावस्की)  जगभर प्रवास करत असत. त्यांना एक सवय होती. रेल्वे प्रवासात त्या बीयांच्या पिशव्या बाळगत, खिडकीजवळ बसून पिशवीतून बीया बाहेर फेकत. लोक विचारत, "हे काय करताहात?"

"मी फुलझाडांच्या बीया विखुरतेय. यातील काही बीया नक्की रुजतील, त्यांची रोपं होतील, त्यांवर रंगीबेरंगी, वासाची, बिनवासाची फुलं फुलतील. या वाटेने मी पुन्हा जाईन की नाही कुणास ठावूक, पण इथून जाणाऱ्या अन्य कितीतरी प्रवाशांना, जीवांना ते दृष्य, तो गंध आनंद देईल."

"पण तुम्हाला तो आनंद मिळणार नाही त्याचं काय?"

"तसं झालं तरी इतरांना तो मिळेल यात मला आनंद आहे."

चक्क कोणावरही, अनोळखी, परक्यावरही प्रेम करा. सजीवच कशाला, दगडावर, खुर्चीवरसुद्धा तुम्ही प्रेमाने हात फिरवू शकता, वस्तू प्रेमाने हाताळू शकता. ते वस्तूवर अवलंबून नसून तुमच्यावर अवलंबून असतं.

प्रेम करतो म्हणजे इतरांना महागड्या भेटी द्यायला हव्या, चैन करायला हवी असं नाही. चोवीस तासांत आपण जे काही करतो ते प्रेमभरे करावं.

आपलं ऱ्हदय प्रेमानं काठोकाठ भरलं आहे मात्र आपण कद्रु आहेत, कंजूष आहोत - ही खरी अडचण आहे. मग ऱ्हदयाला त्या प्रेमाचं ओझं होतं, तो आवेग साहवत नाही. त्यामुळे क्वचित कधी प्रेमाचा क्षण आलाच तर ते नाहीसं होतयं, निसटून जातंय असं आपल्याला वाटतं.

ही अक्षरक्षः dis-ease आहे, अ-स्वस्थता आहे - हा sickness नव्हे, आजार नव्हे. यात वैद्यकीय उपचारांची  मदत होणार नाही. तुमचं ऱ्हदय, तुमचं अंतःकरण प्रेम देण्याकरता तळमळतंय, त्याला आणखी, आणखी देत रहायचं आहे. कदाचित तुमच्या मनात इतरांप्रती अलोट प्रेम आहे, माया आहे; कदाचित तुम्ही फार भाग्यवान आहात परंतु या 'माये'ची साठेबाजी करून जीव दुःखात घालत आहात. प्रेमाचं भरतं येऊ दे, पाट वाहू देत. तेव्हाच तुम्हाला अतीव स्वस्थता, मनःशांती लाभेल.