त्र्यूफोची नजर पाहताना... ०३

 *कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*
 
 



एका कवितेकरता - नव्हे, दोन कवितांकरता - चाली सुचू लागल्या. शाळेनंतर कित्तीतरी वर्षांनी. प्रत्येक पद्य जवळपास अर्धं संगीतबद्ध करून होत नाही तोच माझी सांगीतिक मती कुंठलीय, जागच्या जागी घोटाळतेय. लाटांनी नाव किनाऱ्याकडे ढकलावी, मिठी सोडवून त्याने कूस बदलावी तसंच हेही येऊ घातलेलं असेल, अगदी स्वाभाविक असेल पण मन उगाच हळहळतं. आपण  पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. आपण दुरावल्यावर तो व्याकूळ होणार, समुद्र गर्जत हाका घालणार, नि आपण जवळ आलो की हे असं!

'ज्यूल ए जिम' (English: Jules and Jim) च्या संगीतावर काही लिहावं असं बराच काळ मनात होतं. चित्रपटातील अन्य कुणाहीबद्दल, कशाहीबद्दल बोलू नये, फक्त त्या संगीताबद्दल बोलावं.... तसं व्हायचं नाही परंतु.
जिमच्या आठवणीने कोवळं हसू न फुलणं, नजरेचा काटा कातरिन् कडे  न झुकणं कसं शक्य आहे? आणि ज्यूलचा उल्लेख केला नाही, त्याला विचारात घेतलं नाही तरी तो असतोच, असणार.
कोंफेस्याँ ओ क्लेर दं ल्यून  - कातरिन्  बरंच काही सांगतेय. चांदण्याच्या मंद तरंगांप्रमाणं तिचं ते भवताल भारून टाकणारं बोलणं जिमनं ऐकूनही ऐकलेलं नाही. तो लक्षपूर्वक ऐकतोय, प्रतिसाद देतोय, पण तिच्या शब्दांना नव्हे - तिला, तिच्या असण्याला, तिच्या आवाजाला.
आपण पडद्यावर जे संगीत ऐकतो आहोत ते तिथं अदृश्यपणे निर्माण होतंय, छेडलं जातंय. जिम त्या संगीताचा वेध घेतो आहे - तिच्या कबुलीजबाबातल्या त्याच्याबद्दलच्या उल्लेखांचं, तिच्या झुळझुळ  कपड्यांचं, गवतावर वाजणाऱ्या पावलांचं संगीत.

असाच पुरुष भेटला एकदा -  प्रेमळ, कातरीन् च्या पोशाखाइतक्या शुभ्र मनाचा. त्यालासुद्धा त्या संगीताचा ठाव घ्यायचा होता. माझं बोलणं, माझा सहवास ही जणू त्याला तिथवर नेणारी वाट होती. पण कातरिन् सारखी मी त्याला बुडवून मारण्यापूर्वीच (-पुरुषाचा वा स्वतःचा जीव घेतला म्हणजेच बुडवाबुडवी होते असं नव्हे) आम्ही वेगळे झालो, माझ्या आग्रहाखातर. त्यावेळी माझं बोलणं ऐकताना तो भलत्या स्थळी भलत्या वेळी झोपेतून जागा झाल्यासारखा बावचळून गेला होता. जणू माझं बोलणं पहिल्यांदाच त्याच्या कानांत शिरत असावं - खरंच की!

त्र्यूफोनं चित्रपटातील आनंदी, उल्लासी संगीताला वाकाँस  (सुटी) आणि उद्वेगी, आर्त संगीताला ब्रुइ्यार  (धुकं) अशी नावं दिली होती. संगीतकार जॉर्ज दंलंऱ्यूनं म्हटल्याप्रमाणे 'ज्यूल ए जिम 'चं संगीत या त्यातील पात्रांच्या छाया / बिंबं नसून त्या पात्रांभवतीचं वातावरण आहे; त्यांच्या आत नव्हे तर त्यांच्या बरोबरीनं अस्तित्वात असणारं विश्व आहे.  त्या घरातील एखादा कोपरा...मागलं अंगण, पुस्तकांचं कपाट, स्वयंपाकघराची मांडणी, हौसेनं जमवलेल्या चीजवस्तू.. बैठकव्यवस्था कौशल्यपूर्ण आहे की वावरताना तिचा अडथळा होतो?.. भिंतीवरचे फोटो, पाहुण्यांची खोली उघडताच कशाचा वास  येतो?....
बसल्याबसल्या या साऱ्याचं निरीक्षण करताना घरात राहणाऱ्या माणसांबद्दल काहीबाही समजतं - समजतंय असं निदान आपल्याला वाटतं. मुद्दाम संभाषणात सामावून घेण्याइतकं त्यांचं महत्त्वं नसेलही. किंवा शब्दांत मावण्यापलीकडे  असेल त्यांचा अर्थ, त्यांचं सौंदर्य, आणि त्यांच्यावर साचलेली धूळ, त्यांना गेलेले बारीक तडे, न दिसेलसा गंज - त्यांची झालेली हेळसांड.

कधीकधी केवळ त्यांच्या असण्यानं माणसांचं असणं खरं वाटतं.




Comments