ए कुत्रे...
‘कुत्र्यावरून शिव्या घालायच्या नाहीत’; ‘कुत्र्याला नावाने हाक मारायची, ‘कुत्रा/कुत्री’ म्हणायचं नाही' - कुत्रं पाळणाऱ्यांचे आवडते नियम.
मी विचार करून शिव्या घालत नाही. कुत्र्यावरून शिवी देता-देता स्वतःला ब्रेक लावणं माझ्याने जमलं नाही बुवा. पण तू घरात आलीस, नि त्या शिवीत घुसलीस, तिचा प्रोटोटाइप झालीस! ‘ए कुत्र्या / ए कुत्रे’ म्हटलं, की तू आठवायचीस, हसू यायचं.
तुझे डोळे. …आम्ही बागेत फिरायला आलो होतो फक्त. इतर कुत्र्या-मांजरांपासून अंग चोरून उभी होतीस गाडीच्या एका कोपऱ्यात. पंजे शरीराच्या मानाने छोटे होते. मागचा उजवा पाय दुखरा होता, अधून-मधून हळूच झटकत होतीस. अॅक्सिडेंट झाला होता तुझा लहानपणी. ...ते टपोरे डोळे : हात फिरून फिरून गुळगुळीत झालेल्या दाट सागवानी रंगाचे. ‘मला कळतं सगळं’, आणि ‘मला काsही फरक पडत नाही’ या दोन गोष्टी एका दमात म्हणणारे डोळे.
प्रत्येक प्राण्याची, पक्ष्याची, झाडाची एखादी लकब असते, किंवा प्राणी पाळल्यानंतर असलं काहीतरी माणसाच्या लक्षात येतं - तू डोळा मारायचीस!
...खरंच कळायचं तुला सगळं. शेपटीच्या पांढऱ्या गोंड्याचे अगदी टोकाचे केस कापले मी एकदा, तू झोपलेली असताना - गोंड्याचा आकार थोsडा बदलावा म्हणून. तू खोडी काढू दिलीस, पण नंतर जी चिडलीस...! मला नाही कळल्या कितीतरी गोष्टी. तुझा भयंकर हट्टीपणा नाही कळला कधी.
‘दात घासून घेणार नाही, त्रास सहन करेन पण औषध घेणार नाही, फटके खाईन पण चुपचाप नखं काढून घेणार नाही!’ - दात विचकायचे, चावायचं, रुसून बसायचं. ...आम्हाला पाहून तुला होणारा भयंकर आनंद! जितका वेळ घराबाहेर असू तितकेपट उत्साहाने शेपूट हालवत यायचीस. धरून ठेवली तरी फडफडवत रहायचीस. लहानपणी नुसती शेपूट हालवून भागायचं नाही - चेहरेच चाटायचे असायचे तुला आमचे. माझ्याशिवाय इतर कुणी या खुळेपणाला तयार नसायचं.
तुझा मत्सर - किती स्वच्छ, निलाजरा, किती क्षणिक! दारापुढे मांजराशी खेळू लागलं की तू संताप व्हायचीस, गुरकावत अंगावर यायचीस, त्याला नाकाने ढोसायचीस. आम्ही दुसरीकडे खेळायचो. ते तुला समजायचं - रागवायचीस, काही मिनिटांत विसरून जायचीस!
दहा वर्षं. जमेल ते शिकले. खूप गोष्टी कळल्या नाहीत, कळल्याच नाहीत.
मधली एक-दोन वर्षं दूर गेले मी. आठवडेच्या-आठवडे गायब. मनात वाकडं नव्हतं आई-बापाशी. वैर धरणं मला आवडत नाही. परंतु त्यांना आपली लाज वाटते, हरेक बाबतीत आपण त्यांना निराश करतो, हे स्पष्ट लक्षात येताच वाटतं 'चला, निघावं इथून. लांब, लांब रहावं'. खरं म्हणजे स्वतःपासून लपावसं वाटतं. मग जातो माणूस, शरीराने परतला तरी गेलेला असतो. गंमत आहे. प्रत्येकन् प्रत्येक बाबतीत स्वतःकडे जसे आहोत तसं पाहता पाहता माणूस जगापासून गुपितं राखू लागतो. इतक्या शिताफीने... पाचोळ्याखाली जगण्यात इतका तरबेज होतो तो, बाप रे! - गर्व, शरम वाटण्यापलिकडे जातो विषय. ..एक काडी इकडची तिकडे नाही. क्वचित वावटळी येतात, उलथापालथ होते. आयुष्याशी खेळणं, आयुष्याला स्वतःशी खेळू देणं - कधीकधी तळव्यात अस्सं रुततं ते! लहानपणी तळव्यात शिसाचा तुकडा रुतला होता. विरघळला बहुतेक. ...कशाचीच भीती नाही. भीतीचीही भीती नाही, लाजेची लाज नाही.
स्वतःची, इतरांची गुपितं राखता राखता वेगळ्याच शांततेत जगू लागतो माणूस - समाजालागून, पण उठसूठ समाजाला आमंत्रणं न देता. फार विचित्र, खाजगी शांतता...नाही सांगता येणार. थोडं स्वतःला, थोडं जगाला जपू लागतो माणूस.
पण चुका होतात. तू निसटलीस गं. तुझ्याकडे दुर्लक्ष केलं मी. इतरांनी काळजी घेतली. पण माझं चुकलंच. एवढ्या काळात तुझं वजन वाढलं. आणखी वाढलं.
स्वतःशी असलेलं भांडण संपेपर्यंत घर असणार नव्हतं माझ्यासाठी कुठेच. तरी जेव्हा जेव्हा यायचे, तेव्हा खुणेइतक्या सहज घर सापडायचं तुझ्या डोळयांत.
...कुणीतरी प्रवासाला जातं, त्यामागे कुणी रिकामी वास्तू सांभाळतं. जमेल तशी झाडलोट करतं; काचा पुसतं; फर्निचरवरल्या खोळी, शेल्फावरली पुस्तकं झटकतं; असंख्य वस्तूंवरून नजर फिरवतं; बेसिनच्या सिरॅमिकवरले धुळीचे भ्रम तपासतं. कशासाठी? कुणासाठी - प्रवाशासाठी? - माहित नाही.
असं अहेतुक घरपण जाणवायचं तुझ्या डोळ्यांत. 'मला कळतं सगळं. मला फरक पडत नाही. आलीस ना? आता तू आहेस नि मी आहे.'
आपल्यात गुपितं नव्हती. तू कधीच काही विचारलं नाहीस. मला काहीच सांगावं लागलं नाही. सांगावं लागलं नाही म्हणून लपवावं लागलं नाही. माणसानंही शक्यतो न विचारता समजून घ्यावं : डोळ्यानं, कानानं, आत्म्यानं, कल्पनेनं. आणि प्रश्न विचारलाच, तर पडेल ते उत्तर झेलावं हलक्या हातानं. आधी झेलावं नीट, मग वाटेल ते करावं.
खूपसं समजत नाही, कळतच नाही - बरं चाललं होतं आता. काय झालं? काय होतं तुझ्या डोक्यात? पावसाळ्यात नेहेमी कंटाळायचीस तू. या वेळी चालणं सोडलंस, खाणं सोडलंस, काय होतंय डॉक्टरलाही नीट सांगितलं नाहीस. कुठे जायचं होतं, कुत्रे? मला नाही सांगितलंस? - की तू सांगितलं होतंस? मला कळलं होतं?
शेवटी औषधांचा मारा बंद करावा; पुसापुशी, धुवाधुवी, हलवाहलवी थांबवावी; आहेस त्या अवस्थेत तुला शांत पडू द्यावं अशी इच्छा आठवडाभर होत होती. पण इच्छेचा अर्थ दिसला, की थरकाप उडायचा. मृत्यूच्या तीन-चार ओळी चमकून जातात, मजा येते. अख्खी कविता अंगावर कोसळू लागली की...
नाही ऐकलं माझं कुणी - मीसुद्धा नाही ऐकलं.
तुझं डोकं आईच्या मांडीवर होतं, अंग कोणत्याही क्षणी डोक्यापासून वेगळं होईल असं थडाडत होतं. रक्त, पुन्हा रक्त. जीभ गारठून बाहेर पडलेली. मरणाची थंडी होती रात्री. आवाज नाहीच, फक्त भयानक घरघर. वाऱ्याची, तुझ्या श्वासांची.
दोन कुत्री वाड्यात येऊन गेली. अगदी नळचौकीपर्यंत.
तू मेलीस. माझ्या अंगणात पहिल्यांदा पश्चात्तापाचं फूल फुललं. पाच फिक्या पाकळ्यांचा, आत आत गडद होत गेलेला पश्चात्ताप.
का कळलं, का जाणवलं मला ते? कळूनसुद्धा प्रयत्न केले नाहीत मी...? मरू दिलं तुला? की जागतं ठेवून तुझा त्रास वाढवला? की नेहेमीप्रमाणे आपला हट्ट चालवलास तू? ...प्रश्न मरणाहून वाईट. बाईंनी समजावलं, मैत्रिणीने कुत्र्यां-मांजरांच्या, बकऱ्यांच्या गोष्टी सांगितल्या. इराण्याने गुडघाभर उंच कोंबड्यांच्या गोष्टी सांगितल्या. नको-नको म्हणत असता खाऊ दिला.
शब्द डोक्यात शिरत होते, पण काही गोष्टी वेड्यावाकड्याच रहातात, सरळ येऊ शकत नाहीत, तत्काळ उलगडत नाहीत हे पार विसरून गेले होते मी. खूप जड होतं ते, मी पार दमले होते, वाकले होते. लहानपणी नावडत्या पाहुण्यांना ओळख द्यायचे नाही, तशी मृत्यूला ओळख देत नव्हते.
एके सकाळी बांध फुटला, ओझं वाहून गेलं. म्हटलं, ये बाबा. तो येऊन गेलाच होता. आमचं आपलं स्वतःशी बोलणं, स्वतःलाच सांगणं.
गावच्या नदीत पोहायचं होतं तुला. टेकडीवरून खाली उतरायचंच नसायचं तुला.
नारळ सोलायचीस!
लाडात आलीस की तंगड्या वर करून लोळायचीस. अचानक येऊन तुझ्या अंगावर झेप घेतली, की गुरगुरायचीस.
कानांत तेल घालताना मी कुजबुजत रहायचे, पुन्हापुन्हा - ‘माझं प्रेम आहे तुझ्यावर’! तू डोळे मिटून घ्यायचीस.
Comments
Post a Comment