उगाच आख्यान
संसारी माझ्या येउनि का ऐसा
केला घात पुरा, का असा रे घननीळा..
भारी गंमत आहे.
'का? का आलास तू?' भक्त / भक्तीण विचारतेय.
देवाला, प्रेमाला, सत्याला वारंवार केला जाणारा प्रश्न: 'का?'
एकूणेक उत्तरं या प्रश्नाच्या मापाची असतात, या प्रश्नात मावतात असं वाटतं की काय आपल्याला?
हा घात आहे, विनाश नाही. विध्वंस नाही. कुणा माथेफिरूनं केलेली तोडफोड नाही, इतकं समजतंय.
घननीळानं केलेला घात - असं भक्तिणीला वाटतंय बरं का. 'घात झाला. हे काय घडू दिलं मी?! आता कसं होणार माझं, काय होणार? ...का केलंस तू हे??!' शंकित झालीय ती. मनात खळबळ उडालीय.
इथे कृष्णाचा विचार करत नाही आपण. कसा घडत असेल, मोडत असेल तो क्षणोक्षणी? कसा प्रकटत असेल, लोपत असेल? कृष्ण-कृष्ण म्हणजे तरी कोण?
आणि घात झालाच असेल तर नेमका कशाचा? - संसाराचा? नात्यागोत्यांचा? दैनंदिन कामाधामाचा? की असत्याचा? काय ढळतंय नेमकं? - मानमर्यादाच ना, रूढ कल्पनाच ना?
पण का??
'का' काही संपत नाही!
मीच का? माझ्याच संसारात का? माझ्याच आयुष्यात का? आत्ताच का? याच रूपात का? नक्की उद्देश काय आहे याचा? ...छे, मला नकोय हे! मी कधी मागितलं हे? काहीतरी चूक झालीय, मोठा घोटाळा झालाय. चाललंय ते बरं चाललंय माझं, उत्तम चाललंय! काय कमी आहे मला?
चूक-बरोबर, कमी-जास्त हा मुद्दा नसतोच मुळी. पण मग का? कशाला?? - या 'का'ला उत्तर आहे का तरी?
कुणा म्हणू रे मम स्वामी, नकळे मी ...
आणखी एक वेडा प्रश्न. काय फरक पडतो? कुणालाही स्वामी म्हणा, कितीहीदा म्हणा, कुठच्याही प्रकारे म्हणा! एकदा असत्याचं, भ्रमाचं निवारण झालं; मुखवटे गळून पडले; स्वतःभवती उभारलेले भीतीचे, कुतर्काचे, अविश्वासाचे तट ढासळले की उरतं केवळ सत्य. झळझळीत, रेशीमकाठी सत्य - 'त्या'ची झलक.
कृष्ण 'कोण' आहे? - अंहं.
कृष्ण 'काय' आहे? - कृष्ण हे प्रत्येक माणसाला पडलेलं सर्वांगसुंदर स्वप्न आहे, कारण प्रत्येक ऱ्हदयात तोच भाव दडला आहे.
Comments
Post a Comment