प्रगल्भता, चोर व गुरु
प्रगल्भतेची प्रचलित कल्पना, प्रचलित व्याख्या फारच बावळट आहे. ‘प्रगल्भता’, ‘परिपक्वता’, ‘प्रौढत्व’ हे शब्द आपण समानार्थाने वापरतो. आपल्या मते परिपक्व, प्रौढ व्यक्ती भाबडी नसते. तिच्या अंगी निरागसता असते, पण चमचाभर - चवीपुरती. जीवनातील अनुभवांमुळे आलेली पक्वता या व्यक्तीच्या वर्तनात जाणवते. प्रौढ व्यक्ती चुणचुणीत असते, सहजासहजी स्वतःची फसवणूक होऊ देत नाही. ती सावध असते; सर्वचदृष्ट्या, खासकरून मानसिकदृष्ट्या स्वतःचं रक्षण करण्यास सज्ज असते, कारण जग चित्रविचित्र वृत्तींनी, अनपेक्षित घटनांनी भरलंय ना! कोण कधी आपला गैरफायदा घेईल, आपल्याला उल्लू बनवेल कुणास ठावूक! ...किती क्षुद्र, उथळ, हीणकस कल्पना! वास्तविक प्रगल्भ व्यक्तीचे गुणधर्म आपल्याला भलतेच चक्रावून टाकतील. प्रथमतः ती ‘व्यक्ती’ नसतेच. प्रगल्भ व्यक्तीला अस्तित्व असतं, व्यक्तित्व नव्हे. तिचं असणं अगदी हलकं असतं. तिचा सहवास सूक्ष्म असतो, क्वचित ‘हे माणूस नक्की आहे ना इथे?’ असा प्रश्न पडावा इतका सूक्ष्म. प्रगल्भ व्यक्तीच्या व्यक्तित्वाला वजन नसतं. प्रगल्भ व्यक्ती अर्थातच लहान मुलासारखी असते - किती सुंदर विरोधाभास - सहज, न...