प्रगल्भता, चोर व गुरु
प्रगल्भतेची प्रचलित कल्पना, प्रचलित व्याख्या फारच बावळट आहे.
‘प्रगल्भता’, ‘परिपक्वता’, ‘प्रौढत्व’ हे शब्द आपण समानार्थाने वापरतो. आपल्या मते परिपक्व, प्रौढ व्यक्ती भाबडी नसते. तिच्या अंगी निरागसता असते, पण चमचाभर - चवीपुरती. जीवनातील अनुभवांमुळे आलेली पक्वता या व्यक्तीच्या वर्तनात जाणवते. प्रौढ व्यक्ती चुणचुणीत असते, सहजासहजी स्वतःची फसवणूक होऊ देत नाही. ती सावध असते; सर्वचदृष्ट्या, खासकरून मानसिकदृष्ट्या स्वतःचं रक्षण करण्यास सज्ज असते, कारण जग चित्रविचित्र वृत्तींनी, अनपेक्षित घटनांनी भरलंय ना! कोण कधी आपला गैरफायदा घेईल, आपल्याला उल्लू बनवेल कुणास ठावूक!
...किती क्षुद्र, उथळ, हीणकस कल्पना!
वास्तविक प्रगल्भ व्यक्तीचे गुणधर्म आपल्याला भलतेच चक्रावून टाकतील.
प्रथमतः ती ‘व्यक्ती’ नसतेच. प्रगल्भ व्यक्तीला अस्तित्व असतं, व्यक्तित्व नव्हे. तिचं असणं अगदी हलकं असतं. तिचा सहवास सूक्ष्म असतो, क्वचित ‘हे माणूस नक्की आहे ना इथे?’ असा प्रश्न पडावा इतका सूक्ष्म. प्रगल्भ व्यक्तीच्या व्यक्तित्वाला वजन नसतं.
प्रगल्भ व्यक्ती अर्थातच लहान मुलासारखी असते - किती सुंदर विरोधाभास - सहज, निर्भीड, निरागस, बेधडक. जगताना चारचौघंप्रमाणेच तिलाही बरेवाईट अनुभव येतात, परंतु त्या अनुभवांचं ओझं ती बाळगत नाही, भूत-भविष्याच्या दडपणाखाली जगत नाही. प्रगल्भ व्यक्तीदेखील चारचौघांप्रमाणे ज्ञान संपादन करते पण तिच्या देह-मनावर ज्ञानाचा पगडा नसतो. सहाजिकच तिच्या निरागसतेला, नैसर्गिकतेला, प्रामाणिकतेला सीमा नसते.
प्रगल्भतेचा संबंध खरंतर आतल्या प्रवासाशी आहे - स्वतःच्या आत जाणं. आदर्शांमागे न धावता, कसलीही जोरजबरदस्ती न करता स्वतःला जाणणं. जगाचं आणि स्वतःचं सखोल, प्रामाणिक निरीक्षण. अंतर्विश्व व बहिर्विश्वाच्या एकत्वाचं भान.
खऱ्या प्रगल्भतेनं माणसाठायी तेज येतं, सुबुद्धता येते. खऱ्या अर्थानं प्रगल्भ व्यक्ती प्रेमभावानं ओथंबलेली असते. खरी प्रगल्भता मन-बुद्धीला अभेद्य किल्ला बनवत नाही. उलट पूर्णतः भेद्य, संवेदनक्षम होऊन जातो आपण. नव्या डहाळीप्रमाणं कोवळे, लवचिक होतो; फुलाप्रमाणं नितळ, मृदू होतो.
चोर गुरुच्या घरात शिरला. रात्रीच्या अंधारात घराचा कानाकोपरा धुंडाळू लागला.
(हा कुठल्या पंथातील, पंरपरेतील गुरु होता? तो साधू-संन्यासी होता, की फक्त नावालाच ‘गुरु’ होता? ...काय फरक पडतो!)
च्यायला! चोरून नेण्याच्या लायकीची एकही वस्तू नाही इथं. अकस्मात् भिंतीवर दिव्याचा प्रकाश पडलेला पाहून चोरानं दचकून मागं पाहिलं. म्हातारा गुरु हातात दिवा घेऊन उभा होता. “नमस्कार पाहुणं”, तो म्हणाला. “काय रे, किती वेळ झाला असा अंधारात चाचपडतोयस? मला उठवायचंस तरी. पुढल्या दारीच झोपलो होतो मी, उजेड दिला असता तुला.”
“ए थेरड्या! भंकस पुरे! चल, काय असेल तो माल काढ!” प्रसंगाचा ताबा घेत, कमरेला बांधलेल्या धारदार पात्यावरून बोटं फिरवत चोर म्हणाला.
“असशील तू चोर, त्यात काय एवढं!” गुरु हसून म्हणाला. “आणि माल काढण्याचं म्हणशील तर तुला विनोद सांगतो. गेली तीस वर्षं मी या घरात रहातोय. खुद्द मलादेखील इथं मौल्यवान चीजवस्तू सापडलेली नाही. आज तू इतक्या आशेनं आलाच आहेस तर आपण दोघे मिळून शोधू! हा हा हा!”
चोर पुरता बुचकळ्यात पडला. भर थंडीत त्याच्या हातापायांना घाम फुटू लागला. हा म्हातारा पक्का खुळा वाटतोय. असली कसली असामी आहे ही? जाऊ दे, इथून निघून जावं हेच उत्तम.
उसन्या संतापाच्या भरात चोराच्या घशातून तिरस्कारदर्शक हुंकार निघाला. तो म्हाताऱ्यासमोर जमिनीवर थुंकला व चपळाईनं परसदाराकडे गेला.
“थांब जरा. या आडबाजूला माणसं फिरकत नाहीत फारशी. विरळा पाहुणा असा रिकाम्या हाती परत गेलेलं रुचत नाही बघ. मजजवळ देण्याजोगी ही एकच गोष्ट आहे. घे तू ती. बाहेर कडाक्याची थंडी आहे. घरात उबारा आहे, आजची रात्र भागेल माझं. पुढली सोय उद्या बघू.”
स्वतःभवती लपेटलेलं कांबळं गुरुने चोराच्या खांद्यांवर पांघरलं.
चोर सटपटलाच! “मी चोर आहे. मनात आलं तर तुला इजा करू शकतो. भीती नाही वाटत?”
गुरु म्हणाला, “तुझ्या चोर असण्याचा मला कसला घोर? जगात प्रत्येकाला पोटापाण्यासाठी कामधंदा करावा लागतो. तुझ्याकडे चोरीमारीचं काम आलं, किंवा काही कारणाने तूच ते निवडलं असशील. शेवटी काम ते काम. पण निगुतीनं केलं तरच कामात मजा आहे! काम कुठलंही असो, लक्षपूर्वक, जीव ओतून करावं असं मला वाटतं.”
“वेडा आहेस तू, ठार वेडा!” असं ओरडत चोरानं मागल्या खिडकीतून बाहेर उडी टाकली.
“ए चोरा! मागं फिर!”
तो वृद्ध, स्पष्ट आवाज खंजिरागत चोराच्या काळजात शिरला. मागं फिरणं हा मूर्खपणा ठरू शकतो, त्यात धोका असू शकतो हे ठावूक असूनदेखील पाऊल पुढे पडेना. चोर फिरून गुरुच्या मागल्या खिडकीजवळ आला. गुरुसुद्धा खिडकीजवळ येऊन थांबला होता.
“काय रे बहाद्दरा, तुला काही रीतभात आहे की नाही? मी तुला कांबळं दिलं आणि तू आभारसुद्धा न मानता चालता झालास! जरा ‘धन्यवाद’ वगैरे म्हणायला शिक, खूप उपयोगी पडेल ही सवय. दुसरी गोष्ट: खिडकीतून उडी मारलीस, नि खिडकी उघडीच टाकून चाललास की! शाब्बास! गारठा घरात शिरतोय, मी कुडकुडू लागलोय त्याचं काय?”
चोर खजील झाला. धन्यवाद न म्हणून सांगता कुणाला! आणि जाताना खिडकी व्यवस्थित बंद केली त्यानं बाहेरून.
चोर आपल्या घरी आला. नुकतंच जे काही घडलं होतं त्यावर त्याचा मुळी विश्वास बसत नव्हता. रात्रभर तो अस्वस्थपणे कूस बदलत राहिला. विचित्र म्हाताऱ्याशी झालेल्या भेटीबद्दल मनातल्या मनात विस्मय करत राहिला.
काही महिन्यांनंतर चोर पकडला गेला.
“तुझ्या वतीनं साक्ष देऊ शकेल असं कुणी या भागात आहे?” मॅजिस्ट्रेटनं विचारलं.
“हो. तुमच्या भागात एक माणूस ओळखतो मला.” असं म्हणून चोरानं गुरुचं वर्णन केलं. नाव कुठं माहित होतं त्याला म्हाताऱ्याचं!
“अच्छा, गुरुंशी ओळख आहे तर तुझी,” मॅजिस्ट्रेट म्हणाला - त्याला आश्चर्य वाटलं नाही. “गुरुंना बोलावून आणा रे,” त्यानं आज्ञा केली. चोराला उद्देशून मॅजिस्ट्रेट पुढे म्हणाला, “या गृहस्थांच्या शब्दाला इथे मान आहे. ते तुझ्याबद्दल जे काही सांगतील त्यावर गांभिर्यानं विचार केला जाईल.”
गुरुला बोलावण्यात आलं. “आपण या माणसाला ओळखता का?” मॅजिस्ट्रेटनं अदबीनं विचारलं.
गुरु म्हणाला “म्हणजे काय! मित्र आहे तो माझा. हिवाळ्यात भररात्री माझ्या घरी आला होता. ते कांबळं दिसतंय ना त्यानं स्वतःभवती गुंडाळलेलं -?”
“तुमचं ते सर्वपरिचित कांबळं. हो! मला पाहताक्षणी वाटलंच तसं. ...तुम्ही या इसमाला ओळखता, म्हणजे तो अट्टल चोर आहे हेदेखील तुम्हाला ठावूक असेल?” मॅजिस्ट्रेटनं प्रश्न केला.
गुरु म्हणाला, “चोर!? नाही बुवा. मला नाही वाटत हा माणूस चोरी करू शकेलसं. मला आठवतंय, त्या रात्री मी कांबळं दिल्यावर त्यानं माझे आभार मानले. सभ्य माणूस वाटतो हा.”
मॅजिस्ट्रेट विचारात पडला. “ठीक. तुमच्या म्हणण्यावर आम्हा सर्वांचा किती विश्वास आहे, ते तुम्ही जाणता. त्यामुळे या खेपेस मी या माणसाला चोरीच्या आरोपांतून मुक्त करतो. सोडून द्या रे याला.”
सत्र संपलं.
गुरु आपल्या घराकडे निघाला.
चोर वाट पहात उभा होता. तो गुरुमागून चालू लागला.
गुरु एकाएकी थबकला व गर्रकन वळून म्हणाला, “काय रे? माझ्यामागून का चाललास? घरी जायचं नाही तुला?”
चोर म्हणाला, “नाही. आता मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. दुनिया चोर म्हणून मला धिक्कारते. तुम्ही शुद्ध एक व्यक्ती म्हणून वागवलंत मला - आपुलकीनं, साधेपणानं. ही नीडरता, हा प्रेमळपणा, साधेपणा तुमच्यात कुठून आला? काहीतरी विलक्षण आहे यात! मला तुमच्याकडून हे शिकायला आवडेल.”
चोराच्या खांद्यावर हात ठेवून गुरु म्हणाला, “त्यादिवशी तू गेल्यावर मला किती वाईट वाटलं म्हणून सांगू! इतक्या थंडीचा तशा आडजागी आला होतास तू, आणि तुला द्यायला एक जुनं कांबळं सोडता काहीच नव्हतं माझ्यापाशी. तुम्ही चोर लोक पण ना! अचानक येऊन टपकता. जरा आगाऊ सूचना देत जा, म्हणजे माझ्यासारख्यांच्या घरातून तुम्हाला रिक्तहस्ते जावं लागणार नाही. आम्ही काहीतरी व्यवस्था करू. ..असो. तुला माझ्याबरोबर यायचंय ना? चल. माझ्यापाशी देण्याजोगं फार काही नाही, तुला माहितीय. जे असेल ते आपण वाटून घेऊ.”
चोराच्या गालांत हसू फुललं. मान नकारार्थी हालवत तो म्हणाला, “खोटं नका बोलू. बक्कळ माल आहे तुमच्यापाशी. हा माल अदृष्य आहे; हाताने स्पर्श करता येण्याजोगा, जिभेने चाखता येण्याजोगा नाही इतकंच. तुमच्या डोळ्यांत त्या श्रीमंतीची चमक आहे, तुमच्या सान्निध्यात तिची ऊब आहे. तुमच्याचकडे मला ती मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. त्या रात्रीच माझा या अद्भुत श्रीमंतीवर जीव जडला होता.”
रेखांकन: मुग्धा असनीकर
Comments
Post a Comment