We share a birthday

जो माझा जन्मदिवस तोच साहिरचा, आणि खानोलकरांचा. 
 
मुंबईच्या गल्ल्यांमधून तिघे भटकतोय. झपझप चालतोय आडव्या ओळीत - शेजारून येणा-जाणाऱ्या गाड्यांना, माणसांना काहीशी अडचण करत. बडबड करण्याचं काम नेहेमीप्रमाणे माझ्याकडे. ...आडव्या ओळीतच कुठल्याशा टपरीच्या आडोशाला थांबलोय. पागोळ्यांचा पडदा नाकालगत. बोलतोय फक्त पाऊस. 
 
..अशक्य. अशक्यच. केवढं अंतर आहे त्यांच्या-माझ्यात! पंख पसरले तरी छाटता यायचं नाही. 
 
त्या दोघांच्या काळी सरत गेलेल्या दिवस-रात्री-तास-महिन्यांचं...माझ्या काळी सरत चाललेल्या दिवस-रात्री-तास-महिन्यांचं अंतर... 
 
 
वाटतं त्याहून खूप सरळ आहे पण. साचा सौदा है |  
 
मी साहिरचा लहरीपणा, त्रागा खपवून घ्यायचा: ठरल्या वेळेनुसार घरी गेल्यावर त्यानं नशेत हाकलून लावणं, किंवा तो झोपी गेलेला असणं.. दिवाणखाना वासट धुक्यात नेणारी सिगरेटमागून सिगरेट...कधी अम्रिताने ठेवलेले अर्धेमुर्धे तुकडे. ‘तिची-माझी भेट घडव की’ अशी गळ घातली तर म्हणणार, “औरत नहीं है वो - औरत से कई ज़्यादा, पर मर्द सी ज़ाइद नहीं | ऐसा वजूद ...मिल पाएँगी आप?" एकदा म्हटलं, 'हो, म्हणूनच भेटायचंय तिला.' तर म्हणे "मिलिए फिर | पता लिख दूँ?"

'नाटक-कादंबरीवाला खानोलकर कंडम असेल, पण आरती प्रभूहून मोठा कवी मराठीत सध्या नाही' हे मी ध्यानात ठेवलंच पाहिजे - निदान त्यांना भेटतेवेळी. चाळीतल्या आवाजांची, किंवा उडप्याकडल्या वर्दळीची सोबत कायम. 
 
भेटल्या क्षणापासून दोघंही माझ्याकडे यथोचित लक्ष देणार. माझं लिखाण, निदान चार-दोन ओळी वाचून दाखवाव्या अशी आबदार विनंती करणार, जी मी नम्रपणे उडवून लावणार. त्यावर दोघांचं मौन. ‘हिच्याएवढे असताना आपणही अस्सेच वागायचो!' - दोघांना पुरतं ठावूक. तारुण्याच्या अस्वस्थ बुजरेपणाला, उर्मट नखऱ्याला टक्कर देऊ शकेल का कुणी! 


'खर्चाला पुरेसे पैसे आहेत ना?' असं साहिर केव्हा केव्हा मृदूपणे विचारणार. साहिरइतक्यांदा नव्हे, पण केव्हा केव्हा खानोलकर माझ्या पर्समधे गुपचूप एखाद्दोन नोटा खुपसणार - मुलांचे खेळ पहात मी बाहेर उभी असताना, किंवा त्यांच्या बायकोशी गप्पा करत असताना...फार गोड, सालस बाई.  

तर तो आगाऊपणा ध्यानात आल्यावर पुढल्या भेटीच्या वेळी मी फणकारणार; डोळ्यांनीच त्यांच्या औदार्याला निखारा लावणार. स्त्रीच्या फणकाऱ्यापुढे भलेभले बिथरतील; खानोलकर आणि साहिर त्यातले नव्हेत. मला उमगतंय हळूहळू... कवीला - त्यानं आयुष्यात कवितेची ओळ लिहिली असो वा नसो - कवीला कशाचीच भीती नसते, भीतीचीही भीती नसते. त्याच्या काळजात हास्य भरलेलं असतं देवानं: अतर्क्य, अशक्य, असह्य दैवी हास्य. अवघ्या सुखं-दुःखांना, सबंध अस्तित्वाला; मृत्यूलाही त्या हास्याचा लळा असतो. साऱ्याच दैवी गोष्टी - साऱ्याच गोष्टी दैवी असतात - त्या हास्याला जीव लावतात.

सर्वच माणसांच्या काळजात धडधडतं ते हास्य. कवी नसलेले लोक काय करतात माहित नाही, परंतु कधी भेदरला, मुळापासून हादरून गेला तरी समेवर आल्याप्रमाणं कवी त्या हास्यावर येतो. कवीला कसली म्हणता कसलीच भीती नसते. 
 
 
तर खानोलकर आणि साहिर - दोघांचं बारीक लक्ष. आणि ते सुरस, मोहक स्त्रीदाक्षिण्य - हा गुण, ही अदा गैरसमजांच्या वरवंट्याखाली पार ठेचली गेलीय माझ्या काळात. 
 
त्यांच्या आवडत्या दैनिकाच्या, मासिकाच्या एखाद्या कोपऱ्यात क्वचित छापून आलेलं माझं लिखाण दोघे मलाच मोठ्याने वाचून दाखवणार. 
 "नका हो वाचू. एक तरी अक्षर लिहीण्याची माझी लायकी आहे का खरंच?" माझ्या घशात आवंढा. 
 "- अद्याप माझं मला कळलेलं नाही ओ. तुम्हाला कसचं सांगणार मी?"
"- आप को लगता है इसे जानने का कोई वाजिब तरीका होगा? मिले तो ज़रा हमें भी बताना|" 
मी मान खाली घालून बसून रहाते. 
अकस्मात् त्यांचे शब्द कानी पडू लागतात. ..सौभाग्य म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही! 
 
साहिर क्षणभर ताठ बसून कोट / जाकिटाचे फ्लॅप्स मागे सारतो. घसा खाकरतो. अ‍ॅश-ट्रेत जळत असलेली एखादी सिगरेट बोटांच्या बेचकीत उचलतो न् वाचायला सुरुवात करतो. वाचन पूर्ण होईपर्यंत सिगरेट बोटांतच जळत रहाते; सूक्ष्म निश्वास सोडते; ऐकत रहाते. वाचन पूर्ण झाल्यावर साहिर सोफ्याच्या खांद्यावर मान टाकतो, हातातले कागद बाजूला ठेवतो. सिगरेटच्या टोकावर जमलेली राख अ‍ॅश-ट्रेच्या जवळपास झटकून धूर काढू लागतो. ...माझ्यादेखत ‘पीत’ नाही साहिर. नशेत चूर असताना पाहिलंय त्याला मी. '- वो ठीक, मगर आपके सामने पीने नहीं बैठूंगा, कभी नहीं |' 
 
 खानोलकर आन्हिकं, पूजाअर्चा करून घरातल्या शुभ्र बैठकीवर बसलेले; किंवा इराण्याच्या, उडप्याच्या हॉटेलातील एखाद्या कळकट खुर्चीवर. शक्यतो खिडकीजवळ, (खिडक्या असतील तर!) नाहीतर दाराजवळ. आपल्या 'त्या' आवाजात ओळीमागून ओळ वाचू लागतात - काचेच्या, पितळेच्या, चिनी मातीच्याही आवाजाशी मेळ साधणारा आवाज. 
 
एक विसरले: वाचन सुरू करण्यापूर्वी ते क्षणभर डोळे मिटतात. मग चष्म्याची कड बोटांत धरून चष्मा किंचित खाली घेतात. चष्म्यावरून आपल्याकडं पाहतात. अखेर चष्मा डोळ्यांवर सारून वाचू लागतात. चष्म्याशी चाळा हाच आता ते वाचू लागणार असल्याचा संकेत असतो. एरव्ही ते हातातल्या कागदाकडे शून्य नजरेने पहात अनंत वेळ बसून रहातील - डोसा खात, चहाचे भुरुक्-सुरुक् घोट घेत.
अंधार पडू लागतो. मला सहाची गाडी चुकवून चालणार नसतं. घरी पहोचायला उशिर झाला तर वडील न बोलता धुमसतील. आई तोंडाला येईल ते बोलल्याशिवाय राहणार नाही. एकूण एकच (विसाव्या शतकात आहोत आपण). 
 
 
काळ कुठला का असे ना. मुंबई काय, वेंगुर्ले काय, नि लुधियाना काय. पूर्व काय नि पश्चिम काय. माणसाची हीच तऱ्हा. सोयीनुसार हसत-खेळत बालकांचे आत्मे पिरगाळणं, सोयीकरता जग नाशणं, सोयिस्कर नात्यांच्या तुरुंगांत एकमेकांना डांबणं - बेड्या फुलांच्या की लोखंडाच्या; शॉक ट्रीटमेंट प्रेमाने देता की निष्ठुरपणे - काय फरक पडतो? ...'माझ्यासारखा तूही कैदी आहेस ना? झालं तर मग. We are equals, we can deal with each other.' बहुतेकजण खूष! 
 
'आज़ादी के लिए मरने-मारने का मतलब मैं नहीं समझता | फ़ितरत है हमारी, आज़ाद जी क्यों नही सकतें हम?'
 
साहिर आणि खानोलकर पहातात सारं, सारं. 
 
घड्याळाबाबत गाफील असलेले दोघेही माझ्या निघण्याच्या वेळेबाबत कमालीचे दक्ष असतात.
 
“विदा लेना ख़ूबसूरत होता है, मोहतरमा - अरसे बाद मिलने की ही तरह l एक सी लज़्ज़त होती है दोनों में, ग़ौर किया है आप ने?”
“अंहं. सांगा तरी आम्हाला कशी असते ती?”
“- रोते रोते अपने आँसू चखें हैं कभी?”
...
 
खानोलकर इतकंही बोलण्याची तसदी घेत नाहीत. "चला. तुमची गाडी चुकू नये." 
हे वाक्य उच्चारताना ते मुद्दाम आवाज करतील...खुर्ची दरदरा ढकलत उठतील, तांब्यावर उगाच खण्णदिशी भांडं ठेवतील जेणेकरून आपण आतल्याआत शांत असलो, निरोप घेण्यास राजी असलो तरच आपल्या कानी ते वाक्य पडावं. 
 
 
साहिर आणि खानोलकर - कुणीही आपली गीतं स्वतः वाजवत नाही. साहिर म्हणतो, 'वो काम मैनें अपने दोस्त और होस्ट्स पर छोड़ रखा है|' खानोलकरांकडे रेकॉर्ड प्लेअर नाहीच.
 
साहिरला प्रसिद्धीचं अजिबात वावडं नाही. खानोलकरांना प्रसिद्धीची गंभीर अ‍ॅलर्जी. दोघांपैकी कुणीही कधीच पुस्तक-प्रकाशन, पार्ट्या, संमेलनं, रेकॉर्डिंग्ज, अवॉर्ड्स असले विषय काढत नाही - डोक्यात तिडीक जाते दोघांच्या. "काम की क्या बातें करना? - देखना हो तो देखो जा के | उड़ तो गया पंछी, क्यूँ ख़ाली पिंजड़े को झकझोरते हो, भई? ...आँखें हो कर जो अंधें हैं, कान हो कर जो बहरें हैं; उछलती-मचलती ज़िंदगी जिन के दिल को नहीं छूती; भीतर के शोर-ओ-सन्नाटे से जिन्हें शर्म आती है वहीं लोग ऐसी गयी-गुज़री प्रोफेशनल बातों से वक़्त काटते हैं |"
 
"उंबरठ्यातच बोलून होणाऱ्या गोष्टी आहेत हो या. उंबरठा कशाला, खाली चौकात उभं राहिलेल्याला माडीवरून ओरडून सांगितलं तरी भागतं. त्यासाठी बसायची, वेळ द्यायची, बसवून घ्यायची गरज काय?"
 
माझ्यासारख्या झिपऱ्या पोरीला ते वेळ का देतात, मला ठावूक नाही. आम्ही तिघे एकत्र भेटल्याचे प्रसंग दुर्मिळ म्हणावे एवढेच, पण अशा भेटीत साहिर व खानोलकर दोघे एकमेकांशी कुठल्याच भाषेत अवाक्षर बोलत नाहीत. बेफाम बडबडत सुटले, तर मला गप्पदेखील करत नाहीत.
 
मला आठवतंय... हो, तिघांची पहिली एकत्र भेट होती ती - उत्साहात येऊन मी जाहीर केलं "We share a birthday - could you imagine that?!" त्यावर दोघे जे हसले! - साहिर डोकं मागे टाकून, तोंड उघडून, नाकपुड्या फेंदारून; आणि खानोलकर पाताळात मुंडी घालून, कोरीव मिशा पसरून, मान उजवी-डावीकडे हलवत. 
 
 
अगदी साधंसरळ आहे.
 
आम्ही तीन समुद्र आपापलं गूढ, अथांग एकमेकांना वाहतो. कुणी आपली चव बदलण्यासाठी धडपडत नाही; गोष्टी अधिकाधिक सोप्या वा अवघड करू जात नाही.
आम्ही डोलतो, गरजतो, फेसाळतो, ढवळून निघतो, स्थिरावतो, निजेला येतो - तीन समुद्र. ...चांदण्याला स्पर्श करतो, ढगांना भारतो, अतिदूरच्या वाऱ्यांना शीळ घालतो.

...जेमतेम शतकभराचं अंतर. त्यात काय, सहज गळून पडतं ते! 
 
 

 
रेखांकन: मुग्धा असनीकर

Comments

Post a Comment