नेरूदाची एक कविता

भाषांतराची गोष्ट:
चिले देशातील स्नेहल डोळ्यांचा गब्बू पाब्लो नेरूदा यानं लिहिलेल्या ‘A callarse’ (आ काय्यार्से) या स्पॅनिश कवितेचं मी केलेलं हे मराठी भाषांतर. 
'हाकारा' या द्विभाषक मासिकानं हे भाषांतर छापताना त्यात मला न कळवता परस्पर काही बदल केले. या बदलांना आक्षेप घेतल्यामुळे 'मौन ०.१' या त्यांच्या २१व्या अंकात प्रसिद्ध केलेली ही कविता त्यांनी काढून टाकली, व अखेर स्वतःच्या ब्लॉगवर ती हवी तशी प्रसिद्ध करण्यास मी मोकळी झाले!
अ‍ॅलास्टर रीडकृत इंग्रजी भाषांतर केंद्रस्थानी ठेवून मी हे भाषांतर केलं. याखेरीज इंटरनेटवर आणखी माहिती वाचली. 
स्पॅनिश भाषेच्या शिक्षिका व भाषांतरकार सौ. नीना गोडबोले यांनी मूळ भाषेतून ही कविता मला ऐकवली, तीवर चर्चा केली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 
मूळ स्पॅनिश कविता आणि संदर्भादाखल वापरलेली तिची निवडक इंग्रजी भाषांतरं खालील वेबसाइट्सवर पहावी:
 
 
 
 

 
स्वस्थ बसण्याविषयी: 
 
पाब्लो नेरूदा 
 
मराठी भाषांतर: मुक्ता ‘असरार’ 

 
आता सारे मिळून बारापर्यंत आकडे मोजू या, नि शांत होऊ या. 
जरा स्वस्थ बसू या. 
 
या पृथ्वीतलावर निदान एकदा तरी कुठल्याच भाषेत संवादू या नको... 
क्षणैक थांबू या... 
इतके हातवारे करू या नको... 
मग दरवळेल अनोखा क्षण - घाई नाही, इंजिनांची धडधड नाही...
एकाएकी, एकसाथ या अपूर्वाईत सापडू आपण, काहीसे चुळबुळत: 
थंड समुद्रात धीवर व्हेल माशांना इजा करणार नाहीत, 
मिठागरातील मिठकरी आपले खरचटलेले हात न्याहाळतील,
कुजट, हिरवट युद्धं घडवून आणणारी माणसं - 
धूर फेकणारी, आग ओकणारी युद्धं...
प्रेतांनी प्रेतांवर मिळवलेले विजय...
- ही माणसं कधी नव्हे ते स्वच्छ कपडे करतील, 
जिवलगांबरोबर सावल्यांतून निवांत हिंडतील. 
 
मी जे सुचवतोय, त्याला शुद्ध निष्क्रीयता समजू नका. 
जगणं म्हटल्यावर त्यात जे असायचं ते असणारच. 
फक्त न् फक्त जगण्याविषयी बोलतोय मी.
मुर्दाडपणाशी माझा काडीचा संबंध नाही. 
 
जीवनांचे गाडे सतत रेटत राहण्याचा अट्टहास जर आपण थांबवला; 
काही न करता एकदाचे स्वस्थ बसू शकलो 
तर कदाचित एक विशाल स्तब्धता या दुःखाला छेद देईल: 
आपलाच ठाव आपल्याला कधी लागत नसल्याचं दुःख,
स्वतःला मृत्यूच्या धाकात ठेवण्यातील दुःख...
सारंकाही मृत भासलं तरी 
हळूहळू साऱ्यात चैतन्य झिरपावं तशी 
पृथ्वी शिकवेल आपल्याला कदाचित.
 
आता मी बारापर्यंत मोजेन. 
तुम्ही स्वस्थ बसा, 
अन् मी जाईन.

Comments

Post a Comment