‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’: बाजारात उभं राहून दिला त्यांनी बाजार पेटवून!


‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ :
 
बाजारात उभं राहून दिला त्यांनी बाजार पेटवून!
 
मुक्ता 'असरार'
 
सगळीकडे बाजार भरू लागलाय, सगळे बाजारात भरती होताहेत. तनाच्या, मनाच्या, धनाच्या, धर्माच्या, विधिनिषेधांच्या, सभ्य-असभ्यतेच्या...मिळेल त्या रंध्रांत घुसून बाजार पिसाटतोय. एकमेकांच्या काना-डोळ्या-नसांत बाजार ओतून फसफसवतो आम्हीच आम्हाला, नि जिवात जीव आणतो पुन्हा बाजारचं प्रतिविष पाजून. बाजारू नख्यांनी आमची आम्हीच बोचकारून काढली नसतील अशी गात्रं उरली नाहीत, नि ज्यांत बाजार-जंतू वळवळत नसतील अशा जखमाही उरल्या नाहीत. कपाळमोक्ष करून घ्यावा म्हटलं तर बाजाराची उशी आडवी येते, नैराश्यावर इलाज करायला सांगते.
 
आकाश-पाताळ बाजार होताहेत, आत्मे चोंदताहेत, एकमेकाच्या मेंदूचे वडे तळून खाण्यात कुणालाच आता संकोच वाटत नाही. पण यावर तिळाएवढा जरी आक्षेप असेल आपल्याला, तर? - प्रयोग करून बघावा लागतो. वीजेच्या उरात वीज खुपसावी लागते, पूर गिळून टाकणारा महापूर आणावा लागतो - बाजारात उभं राहूनच बाजार पेटवून द्यावा लागतो! 
 
‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ हे नामदेव ढसाळांच्या मोजक्या कविता गात, आळवत, स्फुंदत, आक्रोशत, केकाटत घडणारं नृत्यकंदन आहे. कष्टकऱ्यांच्या जिंदगीपासून शब्दालंकार घडवून आपलं काव्य सजवल्याबद्दल कवी कधीतरी स्वतःला टोला हाणतो खरा, पण म्हणून तो शब्दांना लाजत नाही, शब्दांवर चिडत नाही, स्वतःचा पिंड सोडत नाही. शब्दांचेच सुरुंग पेरत रहातो. त्या सुरुंगांवर बहुधा जाणते-अजाणतपणे पाय पडून ही मंडळी प्रेरित होतात, अन् दुरंगी दरवाजा दोन्हीकडून बडवत मानव-व्यवहाराचं भयंकर सादर करतात. बाजाराने गाडलेल्या संदर्भांचे सांगाडे जागवतात; प्रतिनिधित्वाच्या शोकेसमधे 'सेटल' झालेल्या लिंगीय, जातीय, वर्गीय व्यथांच्या कापड-बाहुल्या फाडून पिंजून काढतात; रांगड्या सुरांनी मौन टाचतात; खितपत मेलेल्या चित्रकारांची बाजाराने रक्कमबंद केलेली पेंटिंग्ज शरीरांच्या रांगोळ्यांतून जणू क्षणैक मुक्त करतात. गुरुंचे कावे दाखवून गुरुदत्त विद्या सार्थ करतात. तिकिटाच्या चौकोनावर बाजाराचाच बाजार मांडतात.  
 
ढसाळांच्या कवितेनं वस्तवाच्या अस्तराखालचा जो उकिरडा दाखवला, तो या मुला-मुलींनी बेडर होऊन पाहिला असणार; आपल्या संस्कारशेंबड्या जाणिवांना दैन्याची, वेदनेची जालिम धुरी दिली असणार. परिणामी मानवाच्या अंतहीन अरिष्टाचा लोळ मंचावर उठला, व मी प्रेक्षक पोळून निघालो.
कविता याचसाठी तर असते! कधी वेल्हाळपणे, कधी कनवाळपणे, कधी श्रुंगारिक भूल घालून, कधी कथांचे सुरस पाजून, तर कधी थपडावून, खपल्या काढून, शिरोघात करून साहित्य, कला, सर्जन, सृष्टी नेमे एकच विचारत असते: ‘आतातरी मडकं पक्कं झालं का रे तुझं, माणसा?’


सटरफटर:
  • मंचावर कविता उद्गारणाऱ्या नट/नर्तकींचा आवाज बऱ्याच ठिकाणी फिका पडला, अथवा तालवाद्यांखाली दबला गेला. अन्य काही जागी वाक्यांचे शेवट गिळले गेले.
  •  गोंधळसदृश रचनांना कोरस देताना मुलींनी वरच्या सप्तकात falsetto लावणं अधिक चांगलं वाटेल.
  •  प्रयोगानंतर प्रेक्षागृहाला आरसा दाखवताना दिग्दर्शकाने तो आपल्या गुडघ्यांच्या उंचीवर धरण्याऐवजी खांद्यांच्या उंचीवर धरणं अधिक चांगलं वाटेल.
  •  हिजड्यांची कविता बायकी वठतेय. नर्तकींनी थेट हिजडेपणाकडे न जाता आधी आपलं अंतस्थ पुरुषत्व शोधावं, मग पुरुष होऊन स्त्रीत्वाकडे वळावं - वाटेत त्यांना हिजडा नक्की भेटेल.
  •  ‘हालचालींची पुनरावृत्ती’ या तंत्राचा वापर किंचित कमी करता आला तर...? सतत वापरून त्यातली मजा जाते की काय असं वाटतं, काहीवेळा त्यात फक्त तंत्रच जाणवतं. 
© मुक्ता असनीकर
   
हा नृत्यप्रयोग मी २६ सप्टेंबर २०२५ रोजी 'द बॉक्स,' पुणे इथे पाहिला.

Comments