एक तेे चार
|| १ || काही प्रवास विसरता येण्याजोगे नसतात लहानशा मनातही लंबूटांग आठवणी मावतात. लाल बस हेलकावणारी काळपट हिरव्या रस्त्याने पिवळ्या झोतात चमकणारी झाडांची हाडे-पाने चंद्र वाटोळा हासत होता, सारंकाही ठावूक असल्यासारखा. मांजरपिलागत पेंगुळलेली सीटच्या मी कोपऱ्यात उगवले कुठूनसे निळसर काळे दोन हात जड कडवट श्वासांची, दहा बोटांची रात्र सळसळली अंगावरून चंद्र गाऊ लागला एका पायावर, पुलाच्या कठड्यावरून भुऱ्या आकाशात एकही ढग नव्हता. बालिश आढेवेढे सैलावत गेले विसरले नियम आईनं खालच्या आवाजात सुनावलेले - खेळता खेळता एकटीला बाजूस ओढून काहीबाही तिनं बडबडलेलं, मला मुळी नव्हतंच आवडलेलं. मी शेजारच्या दिशेनंं डोळा उघडला ती शालीखाली घोरत होती. थांबून थांबून गायला तो राकट पंजेदार आवाज आणि गाडीचा खडखडाट. झोपेस्तो ऐकलेल्या त्या गाण्यानं चोरून झोपेत शिरणं शब्द न-कळलेले तरी चाल मनात भिनणं का बरं आवडत नाही पुष्कळांना सारंकाही ठावूक असल्यागत हसणं? || २ || - पण 'तिनं' ते पुरतं हेरलं होतं कॉलेजच्या लहानशा गच्चीत तिला फुलपाखरू सापडलं होतं थेंबभर प्राणांस...