मुलांविषयी तुम्हाला खरी तळमळ असेल, तर उद्याच्या उद्या जगात क्रांती घडून येईल

कशाला इतकी पोरं पैदा करता तुम्ही, त्यांचं संगोपन कसं करावं याची अक्कल नसताना? ...मुलांविषयी तुम्हाला खरी तळमळ असेल ना, लोक हो, तर उद्याच्या उद्या जगात क्रांती घडून येईल.
 
...आपल्या मुलांवर जर तुमचं प्रेम असेल; तुमच्यामते जर ती ‘गोंडस खेळणी’ नसतील - दोन घटका मन रमवणारी व नंतर वैताग आणणारी खेळणी नसतील - तर मुलं काय खातात, कुठे निजतात, दिवसभर काय करतात; त्यांना मार पडतोय का, त्यांची मनं कुस्करली जाताहेत का, त्यांचं व्यक्तित्व ठेचून टाकलं जातंय का, हे जाणून घ्यावंसं नाही वाटणार तुम्हाला?? पण ते जाणून घ्यायचं म्हणजे चिकित्सा केली पाहिजे; मूल आपलं असो वा शेजाऱ्याचं असो, आपल्याठायी इतरांविषयी आस्था हवी, कणव हवी. तुमच्या मनात काडीची आस्था नसते - अपत्याविषयी, जोडीदाराविषयी, कुणाचविषयी काही वाटत नाही तुम्हाला. 
...आपल्याला काही फिकीर नसते, म्हणूनच वेळही नसतो आपल्यापाशी या गोष्टींसाठी. पूजाअर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो; पैसे कमावणं, क्लबात जाणं, धांगडधिंगा, मौजमजा - साऱ्यासाठी वेळ असतो, पण मुलांबद्दल गांभीर्याने विचार करण्यासाठी, त्यांना वात्सल्य देण्यासाठी बिलकुल वेळ नसतो. मी उगाच भावपूर्ण, अलंकारिक वाक्यं फेकत नाहीय. तथ्य आहे हे, नि तुम्ही त्याला तोंड देऊ इच्छित नाही. कारण तथ्याला, वास्तवाला तोंड द्यायचं म्हणजे तुम्हाला तुमचे शौक, करमणूक इत्यादींवर पाणी सोडावं लागणार. - तुम्ही ते सोडून द्याल म्हणता? छे, केवळ असंभव! तुम्ही मुलांना शाळेत ‘टाकता.’ तिथला शिक्षकवृंद तुमच्याचसारखा उदासीन असतो, त्यांनाही मुलांबाबत आत्मीयता नसते - का बरं असावी? ते केवळ नोकरी करण्यासाठी, अर्थार्जनासाठी आलेले असतात तिथे. अशाप्रकारे सारं ‘जैसे थे’ रहातं, अन् मग एखाद्या संध्याकाळी शिक्षणक्षेत्रावर चर्चा करण्यासाठी आपण एकत्र जमतो! 
 
...सगळं तुमच्या हाती आहे, लोक हो - सरकार, व्यवस्था, यंत्रणांच्या हाती नव्हे. ...संततीवर तुमचं खरोखर प्रेम असेल, तर तुम्ही प्रचलित शिक्षणव्यवस्था मोडीत काढाल, सामाजिक परिवेष मोडीत काढाल. मुलाचा आहार कसा आहे, त्याला नीटनेटकं आयुष्य लाभतंय ना, त्याचं भवितव्य काय, दारुगोळ्याप्रमाणे त्याला निव्वळ वापरून घेतलं जाणारे का, अशा सर्वच गोष्टी तुम्ही ध्यानात घ्याल. इतरांची वचनं उगाळत न बसता, ठराविक कार्यपद्धतीला कवटाळून न बसता युद्धामागील, संघर्षामागील कारणांची तुम्ही कसून तपासणी कराल. मुलांवर जर तुमचं खरोखर प्रेम असेल, तर स्वायत्त सरकारं विसर्जित होतील, स्वतंत्र राष्ट्रीयता, स्वतंत्र धर्म नाहीसे होतील; सण-समारंभ, प्रस्थापित मतांधता गळून पडेल. मुलांबद्दल तुमच्या उरी खरोखर वात्सल्य असेल, तर ही अवघी परिस्थिती एका रात्रीत बदलेल. अंदाधुंदीकडे, विनाशाकडे नेणाऱ्या समस्त गोष्टींपासून तुम्ही चार हात लांब रहाल, कारण त्यांच्या नादी लागून शोक-विलापाखेरीज दुसरं काही पदरी पडत नाही, हे तुम्हाला उमगलेलं असेल. 
 
तुमचं आपल्या संततीवर अजिबात प्रेम नसतं, हेच खरं. त्याची काय स्थिती आहे, त्याच्या आयुष्यात काय घडतंय वगैरेंची तुम्हाला तिळमात्र पर्वा नसते. त्यांनी तुमचा वंश चालवला, मोठं होऊन कुटुंबाला हातभार लावला, तुमच्या वृद्धापकाळात तुमची काळजी घेतली म्हणजे झालं. एवढ्याशीच देणंघेणं असतं तुम्हाला - खुद्द मुलाशी, ‘पोटच्या गोळ्या’शी काही देणंघेणं नसतं. त्यांच्याविषयी खरोखर आत्मीयता असेल, तर त्यांच्या अंगी सुबुद्धता, योग्य ती सभ्यता विकसित होईल याची तजवीज करल. मुळात हा शिक्षणव्यवस्थेचा दोष नव्हे, हेच खरं शोचनीय वास्तव आहे, बाबांनो! आपली हृदयं इतकी रिकामी आहेत, इतकी मरगळलेली आहेत म्हणून सांगू! आपलंच वैगुण्य आहे ते. प्रेम करणं म्हणजे काय, हे ठावूकच नाही आपल्याला. “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असं आपण एखाद्याला म्हणतो तेव्हा त्याच्या मुळाशी सुखोपभोग असतो; एकतर प्रणयसुख किंवा मालकी हक्क, स्वामित्वाच्या दिमाखातून होणारी तुष्टी असते फक्त. सुखाची धुंदी, स्वामित्वाचा अभिमान म्हणजे प्रेम नक्कीच नव्हे, मात्र आपल्याला फक्त याच दोहोंमधे स्वारस्य असतं. अपत्यांविषयी पर्वा नसतेच आपल्याला; शेजाऱ्याची, सहचरांची बिलकुल पर्वा नसते. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला कोणी मदत करत नाही - तुमच्या खिजगणतीतही नसतो तो, मात्र अभागी दीनदुबळ्यांची सेवा करण्याविषयी तुम्ही तावातावाने बोलता. तुम्ही विविध गटांचे, संस्थांचे सदस्य होता; विविध यंत्रणांचा भाग बनता, पण गरजवंताची झोळी रिकामीच रहाते. ...प्राणांतिक तळमळ असेल ना, तर तुम्हाला गहिवरून येईल, तुम्ही संवेदना-संपन्न व्हाल, अन् कृती करण्यास सरसावाल. मग एका रात्रीत तुम्ही संपूर्ण व्यवस्था बदलू शकाल.
 
- जे. कृष्णमूर्ती 
 
 A still from Abbas Kiarostami's "Where Is the Friend's House?" (1987)

Comments