सोनसळ
जपानच्या राजानं एका झेन गुरुंकडून बागकामाचे धडे घेतले. तीन वर्षं
उलटल्यावर झेन गुरु म्हणाले, "शिकवायचं ते सारं शिकवून झालं आहे. केव्हातरी
मी तुझ्या बागेला आकस्मिक भेट देईन. तुझ्या विद्येचंं, कौशल्याचं परीक्षण
करेन." त्यांनी राजाचा निरोप घेतला.
राजा आपल्या शाही बागेची अधिकच
निगुतीनं काळजी घेऊ लागला. कोणता दिवस परीक्षेचा ठरेल कुणी सांगावं! बगिचा
नेहेमी साफसूफ, नीटनेटका ठेवला जात असे. अनेक माळ्यांना हाताखाली घेऊन राजा
बागेवर मेहनत घेत राहिला, त्या दिवसाची वाट पहात राहिला. अखेर एके दिवशी
झेन गुरु राजाची बाग पाहण्याकरता आले. राजाला फार आनंद झाला. गुुरु शांतपणे
बागेतून फेरफटका मारू लागले. राजा मूक उत्कंठेनं त्यांच्या मागे चालत
राहिला. गुरुंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता नाहीशी होतेय असं त्याला वाटू
लागलं. 'आपल्या हातून काही चूक घडली की काय? कुठे बरं कमी पडलो आपण?'
न
रहावून राजानं मौनभंग केला: "काय झालं? आपल्या शिष्यानं बागेवर प्रचंड
कष्ट घेतल्याचं पाहून आपल्याला आनंद झाल्याचं दिसत नाही. काही चुकलं का
आमचं?"
"बाकी सर्व छान आहे, पण सोनसळी पानं कुठायत? त्यांचा सोनेरी नाच, सोनेरी गाणं कुठाय? युनमेन्*चा सोनवारा कुठाय? त्याविना बाग अगदी खेळण्यातली, कृत्रिम वाटतेय."
राजानं
बागेतील एकूणेक पाचोळा, सुकलेली पानं, अगदी झाडांवरची पिकली पानंंदेखील
कचरा म्हणून गोळा करवली होती, केराच्या टोपल्या बागेच्या मागच्या भिंतीलगत
रचून ठेवल्या होत्या. गुरुंनी तिथं जाऊन काही टोपल्या आत आणल्या,व मुठी
भरभरून पिवळी, वाळकी, मातकट सोनेरी पानं बागेत उधळली. वारा वाहू लागला तशी
पाचोळ्याची सळसळ, सोनेरी नाचगाणं सुरु झालं, त्यांच्या स्पर्शानं वाराच
जणू सोनेरी झाला.
मृत्यू हा जीवनाचा शत्रू नव्हे, सहचर आहे. जीवन-मृत्यू ही एकात्म लय आहे.
एका भिक्षुनं प्रश्न केला: "पानगळीमुळं झाडांची रया जाईल. मग काय होईल?"
युनमेन उत्तरले: "सोनवारा!"

Comments
Post a Comment