एक फ्रेंच व्यक्तिचित्र
नव्या प्रदेशाचा शोध न घेता नव्या दृष्टीचा ध्यास घेणं, ही आविष्कारांच्या सागरातील खरी सफर ठरते.
....या इथे, चालू क्षणातच सारी जादू असते. - मार्सेल प्रूस्त
....या इथे, चालू क्षणातच सारी जादू असते. - मार्सेल प्रूस्त
हे प्रश्न आणि त्यांच्या उत्तराचा शोधच एकोणिसाव्या शतकातील सुविख्यात फ्रेंच लेखक मार्सेल प्रूस्त (Marcel Proust) याच्या लेखनाचा गाभा आहे असं मला वाटतं. 'रिमेम्ब्रन्स ऑफ थिंग्ज पास्ट' ("आ ला रशेर्श द्यु ताँ पेर्द्यू" चा इंग्रजी अनुवाद) या आपल्या सातखंडी कादंबरीत प्रूस्तने जगण्याच्या विविध टप्प्यांवरील निरीक्षणं, आठवणी खोदून काढून काल्पनिक पात्रं-प्रसंगांद्वारे अतिशय सुंदर, मिश्किल तरलतेने पुनर्जीवित केल्या आहेत. सर्वसाधारण 'भासणाऱ्या' वस्तूंचं, व्यक्तींचं, त्यांच्या अलक्षित, विस्मृत कंगोऱ्यांचं अनन्य दर्शन घडवण्याची त्याची हातोटी थक्क करणारी आहे. पहिल्या खंडात बालपणीचा काळ आठवताना प्रूस्तने केलेल्या एका व्यक्तिवर्णनातील हे संपादित अंश. मी फ्रेंच शिकत नव्हते तेव्हा इंग्रजी भाषांतरावरून केलेलं हे भाषांतर आहे :
लेओनीकाकू माझ्या आजोबांच्या चुलतबहिणीची मुलगी. ह्या काकूने तिचा नवरा (आमचे ओक्ताव्ह काका) वारल्यानंतर प्रथम आमच्या 'काँब्रे' गावातून बाहेर पडणं बंद केलं, मग राहत्या घराबाहेर पडणं बंद केलं; कालांतराने तिच्या बेडरूममधून व अखेरीस साधं बिछान्यातून बाहेर पडणंदेखील बंद केलं. आता ती कधीच 'खाली उतरून' येत नसे. त्याऐवजी कधी दुःख उगाळत, कधी शारीरिकदृष्ट्या शिणलेल्या / आजारी अवस्थेत, कधी उगाच कसलंसं खूळ डोक्यात घेऊन तर कधी धार्मिक विधी पार पाडत सदोदित बिछान्यात पडून असे. तिच्या उदासवाण्या बेडरूमच्या खिडकीतून दूरवर, 'ग्राँ प्रे'पर्यंत जाऊन थांबलेला साँ ज्याक् रस्ता दिसत असे. काकूच्या बिछान्याच्या दुसऱ्या बाजूला लिंबाच्या लाकडाचं, पुष्कळ ड्रॉवर्सवालं टेबलवजा कपाट होतं. या कपाटाचा उपासनेची वेदी व औषधखाना म्हणून दुहेरी वापर होत असे. कपाटाच्या डोक्यावर जिथे व्हर्जिन मेरीचा पुतळा होता त्याजवळच 'वीची-सेलेस्तां'च्या बाटल्याही असत. काकूच्या प्रार्थनापुस्तिका व औषधांच्या चिठ्ठ्या त्याच कपाटात ठेवल्या जात. थोडक्यात सांगायचं, तर अंथरुणात बसून शरीर व आत्म्याची आद्य कर्तव्यं पूर्ण करण्यासाठी लेओनीकाकूला आवश्यक ते सारंकाही तिथे हजर असायचं.
काकूचं आयुष्य तिच्या घरातल्या दोन लगतच्या खोल्यांपुरतंच सीमित झालं होतं. शुद्ध ग्रामीण धाटणीच्या खोल्या होत्या त्या - ज्यांच्या अनोख्या गुणलक्षणांतून, शहाणपणातून, शैलीतून, गूढ जैवरचनेतून प्रकटणारे असंख्य वास मानवी गंधजाणीवेला मोहून टाकत. आपला नैसर्गिक बाज सांभाळत माणसाळलेले घरगुती वास; गावातल्या मोठ्ठ्या घड्याळासारखे आळसावलेले किंवा शिस्तशीर वास; मनसोक्त उनाडणारे वास; मङ्गलमय, पवित्र वास... हंगामातील एकूणेक फळांच्या मिश्रणातून तयार झालेली सुघड, चविष्ट, मऊ-पारदर्शी जेलीच जणू! या खोल्यांतील वातावरणाला पौष्टिक, रसरशीत अशा शांततेचा इतका अप्रतिम घमघमाट सुटलेला असे, की आत शिरण्यापूर्वीच माझं मन हावरट आनंदाने उसळी मारू लागे. प्रार्थनेचं डेस्क व नेहेमी जाळीदार आच्छादनाने झाकलेल्या मखमली आरामखुर्च्यां-मधल्या जागेत मागेपुढे फिरत मी वेळ घालवायचो.
खोलीतल्या हवेत गच्च दाटलेले आकर्षक वास शेकोटीच्या उष्णतेने जणू शिजणाऱ्या पाय१प्रमाणे खमंग होऊन जात.
लेओनीकाकू - कल्पनाचित्र डेव्हिड वेझ्ली रिचर्डसन |
शेजारच्या खोलीतून लेओनीकाकू धीम्या आवाजात स्वतःशीच पुटपुटत असल्याचं ऐकू येई. ती नेहमीच दबक्या आवाजात बोलायची. 'आपल्या खोपडीत काहीतरी तुटलंय, ते तिथे आतल्या आत तरंगतंय' असं तिला निःशंकपणे वाटायचं. फार जोरात बोलल्याने त्याला धक्का बसून ते भलतीकडे सरकेल ही धास्ती असायची. परंतु एकटीच असली तरी लेओनीकाकू फार वेळ निःशब्द बसून रहायची नाही, कारण बोलणं घशासाठी बरं असतं; बोलल्याने घशातलं रक्ताभिसरण सुरळीत राहून श्वास कोंडण्यासारखे संभाव्य त्रास टळतील असं वाटायचं तिला. कमालीचं निष्क्रिय आयुष्य जगताना अधूनमधून जाणवणाऱ्या अतिसामान्य संवेदनादेखील तिच्यासाठी लाखमोलाच्या होत्या, व त्या व्यक्त करण्यासाठी जिवाभावाचं माणूस नसल्याने ती स्वतःशीच अखंड वटवट करत बसे. विचारांच्या तंद्रीत पुटपुटत राहण्याची सवय असल्याने शेजारच्या खोलीत कुणी नसल्याची खात्री करून घ्यावी याचं तिला भान राहत नसे. "मी एकदाही पापणीभरसुद्धा झोपले नाही, ध्यानात ठेवलंच पाहिजे मला." हे तिचे उद्गार मग माझ्य कानी पडत.
'पापणीभरसुद्धा झोप न घेणं' ही लेओनीकाकूची विशेषच कर्तबगारी होती. कुटुंबातील रोजच्या संभाषणात तिच्या ह्या कर्तृत्वाचा आब राखला जाई- सकाळीसकाळी फ्राँस्वाज काकूला 'हाक मारते' असं न म्हणता 'तिच्याकडे जाते' असं म्हणलं जाई; दिवसा काकूला आडवं व्हावंसं वाटलं तर ती 'जरा पडली आहे' असं न म्हणता 'ती जरावेळ शांत बसणार आहे' / 'विश्रांती घेत आहे' असं म्हणत. इतकंच काय, गप्पांच्या ओघात "कशाने बरं जाग आली मला.." किंवा "स्वप्नात मला दिसलं, की.." हे शब्द तोंडातून चुकून जरी बाहेर पडले, तर काकू चक्क खजील होऊन आपली चूक सावरत असे. गावात सगळेचजण तिला मान देत. म्हणूनच घरापासून तीन रस्ते सोडून पलीकडे असलेल्या दुकानाचा मालकदेखील मालाच्या पेट्यांना खिळे ठोकण्यापूर्वी "काकू 'विश्रांती घेत नाहीत' ना?" हे विचारण्यासाठी माणूस पाठवत असे.

...साधारण मिनिटभराने मी लेओनीकाकूच्या खोलीत जायचो, तिचा मुका घ्यायचो. फ्राँस्वाज त्यावेळी चहाची तयारी करत असायची. अगदीच गळून गेल्यासारखं वाटत असल्यास काकू चहाऐवजी तिझानं२ मागवायची. मी खोलीत येऊन पाच मिनिटं झाली असतील नसतील तोच काकू मला बाहेर पिटाळायची. का, तर माझ्या उपस्थितीमुळे तिला थकवा येऊ नये म्हणून. "चल, जा बघू बाळ आता. मास३ला जाण्यासाठी आवरून तयार व्हायचंय ना.. आणि खाली फ्राँस्वाज दिसली तर तिला म्हणांव, 'माझ्याशी गप्पाटप्पा करत बसू नकोस. काकूला काय हवं-नको ते पाहण्यासाठी लवकर वरती जा.'
गेली कित्येक वर्षं लेओनीकाकूच्या सेवेत असलेल्या फ्राँस्वाजला एके दिवशी तिची आमच्या घरी कायमसाठी रवानगी होणार आहे असं त्यावेळी चुकूनही वाटलं नसेल. आम्ही काकूच्या घरी रहायला यायचो तेव्हासुद्धा काकूला एकटं टाकण्यास ती उत्सुक नसे.
फ्राँस्वाज अशा नोकर-चाकरांपैकी होती जे अपरिचिताला प्रथमदर्शनी नक्कीच चुकार वाटतात. असे चाकर नवख्या पाहुण्याची कोणतीही खास सरबराई करत नाहीत कारण वस्तुतः आपल्याला या माणसाची काही गरज नाही; या घरातून आपली उचलबांगडी होण्यापूर्वी त्याला आमंत्रित केलं जाणं बंद होईल हे त्यांना नीटच ठाऊक असतं. ज्याने त्यांची खरी लायकी पारखलेली असते, ज्याला त्यांच्याकडून नाटकी तत्परतेची, लाळघोट्या सौजन्याची अपेक्षा नसते अशा आपल्या मालक / मालकीणीला हे चाकर निष्ठेने चिकटून राहतात.

फ्राँस्वाज - कल्पनाचित्र डेव्हिड वेझ्ली रिचर्डसन |
सकाळी जेव्हा फ्राँस्वाज लेओनीकाकूला पेप्सिनचा डोस देण्यासाठी पहिल्यांदा वरच्या मजल्यावर जायची तेव्हा एखाद्या 'महत्त्वपूर्ण' गोष्टीबद्दल तिचा खुलासा / मत जाणून घेण्यासाठी तिला हमखास थांबवून घेतलं जायचं. उदाहरणार्थ -
लेओनीकाकू: "तू पाच मिनिटांपूर्वी आली असतीस ना, तर ती मॅदाम आंबेर आपल्या मदर कॅलोकडे मिळतो त्याहून दुप्पट मोठा शतावरीचा गड्डा घेऊन जाताना दिसली असती! तिच्या आचाऱ्याला विचारून घे कुठून मिळाला ते."
फ्राँस्वाज: "त्या क्युरेकडे मिळतो असं कळलं तर आश्चर्य वाटणार नाही मला."
किंवा " फ्राँस्वाज, अगं घंटेचा ठणठणाट कानात शिरला नाही का तुझ्या? डोक्याची शकलं झाली माझ्या!"
- "घंटा वाजलीच नाही, मॅदाम ओक्ताव्ह."
"माझी बाय गं ती! याचा अर्थ तुझी कवटी चांगली दणकट असणार. आभार मान देवाचे."
किंवा "आत्ताच मॅदाम गुपील एका छोट्या मुलीसोबत जाताना दिसली. तुझा विश्वास बसणार नाही, पण त्या लहान मुलीला मी यापूर्वी कध्धीच पाहिलं नव्हतं! अशी स्पष्ट दिसली मला ती तिथे!"
- "अहो, ती माँसिअर प्युपांची मुलगी असेल."
- "वा गं वा! प्युपाची मुलगी असती तर मला ओळखू आली नसती की काय!"
काँब्रे गावात 'पूर्वी कधीच पाहण्यात न आलेली', पूर्णतः अनोळखी व्यक्ती ही जणू पौराणिक पात्रांप्रमाणे अविश्वसनीय, अद्भुत चीज समजली जाई. साँतेस्फी रस्त्यावर किंवा मुख्य चौकात अशी विलक्षण असामी कधी अवतरलीच, तर सूक्ष्म, सविस्तर संशोधनं चालवली जात. आणि शेवटी दंतकथेतील त्या प्रचंड मायावी राक्षसाला जवळच्या अथवा लांबच्या ओळखीतल्या कुण्या व्यक्तीमधे रुपांतरित केलं जाई.
फक्त माणसंच नव्हे तर प्राणीसुद्धा साऱ्यांच्या दाट परिचयातले. त्यामुळे गावात 'पूर्वी कधीच न पाहिलेलं' कुत्रं जरी दिसलं असतं तरी काकू त्या गोष्टीचा कीस पाडत राहिली असती, ते 'गहन रहस्य' उकलण्याकरता आपला रिकामा वेळ व तिखट तर्कशक्ती तिने खर्ची घातली असती.
अलीकडे लेओनीकाकू फारशी कुणालाच भेटत नसे. तिला भेटायला येणाऱ्यांच्या यादीतील जवळपास सगळ्यांवर तिने एकेक करून काट मारली होती, कारण तिच्या मते त्यांनी घोर अपराध केला होता - ज्यांचा तिला अत्यंत तिटकारा वाटे अशा दोन प्रकारच्या लोकांच्या वळणावर जाण्याचा अपराध. यापैकी पहिला गट अशा माणसांचा होता ज्यांनी तिला स्वतःची अतिकाळजी न घेण्याचा सल्ला दिला होता. "शंभरशे साठ औषधं घेत अंथरूणात रुतून बसण्यापेक्षा जरा सूर्यप्रकाशात तरातरा हिंड, लाल बीफस्टिक खा, जास्त बरं वाटेल.." वगैरे उपदेश पाजले होते. ह्या लोकांना तिने सर्वात आधी दूर सारलं. ह्याउलट काकूची प्रकृती तिला वाटतं त्याहून अधिक गंभीर आहे, किंबहुना खरोखर तिच्या सांगण्याइतकीच गंभीर आहे असं मानणाऱ्यांची गणना दुसऱ्या गटात होतसे.
तेव्हा 'लेओनीकाकूची व्यक्तिशः भेट घेण्याचा सन्मान प्राप्त होण्यास आपण ना-लायक असल्याचं' ज्यांनी ज्यांनी दाखवून दिलं होतं त्या सर्वांना तिने वरच्या मजल्यावर येण्यास मनाई करून टाकली. "तुला नाही वाटत, निदान प्रसन्न दिवसांत जsरा बाहेर पडलीस तर..." असं सुचवणारे लोक; किंवा "हम्म. जगण्याची रगच विझली असेल तर त्याला कोण काय करणार! तरी तू आणखी काही काळ जगशील बघ." असं म्हणणारे.

लेओनीकाकूला आरोग्यकारक जगण्याबद्दल काहीही सुचवणं व्यर्थ आहे हे कळून चुकल्यावर आम्ही हळूहळू तो नाद सोडून दिला.
लेओनीकाकूचं आयुष्य हे असं सरलं. इथून-तिथून सारखंच. तोच संथ एकसुरीपणा. अखेरीस ती वारली तेव्हा आप्तस्वकीयांचे दोन्ही गट विजयी ठरल्यागत झालं. "हिची रोगट जीवनशैली हिचा घात करणार" असा दावा करणारे जिंकले आणि 'ती ज्या आजाराने ग्रस्त आहे तो कल्पित नसून स्वाभाविक' असल्याचं मानणारेही जिंकले. तिच्या जाण्याने कोणाला अतीव दुःखबिःख झालं नाही. अपवाद एकच - फ्राँस्वाज. काकूच्या शेवटच्या आजारपणाच्या त्या दीर्घ आठवड्यांत फ्राँस्वाजनं काकूचं सगळं स्वतः केलं, अन्य कोणालाच काही करू दिलं नाही. काकूचा देह प्रत्यक्ष दफन होईपर्यंत फ्राँस्वाज त्याजवळून हालली नाही. तेव्हा कुठे आम्हाला उमजलं, की इतकी वर्षं लेओनीकाकूचे बोचरे शब्द, संताप, संशयाच्या दहशतीखाली वावरल्याने फ्राँस्वाजच्या मनात तिरस्कार साठला असेल ही आमची समजूत साफ चुकीची होती. वास्तविक फ्राँस्वाजच्या मनात काकूबद्दल निखळ आदर होता, माया होती. जिचे निर्णय अतर्क्य असत, जिच्या कारस्थानांतून सहीसलामत सुटणं भारी मुश्किल होतं, जिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणं सोपं होतं अशी लेओनीकाकू; फ्राँस्वाजची घरधनीण; फ्राँस्वाजची एककल्ली, अगम्य, बेबंद साम्राज्ञी तिला सोडून गेली होती.

तळटीपा:
१. पेस्ट्रीसारखं, परंतु आत सारण भरून शिजवलं जाणारं पक्वान्न
२ . गरम पाण्यात औषधी वनस्पती, फळं वा मसाले भिजवून केलेला एकप्रकारचा कोरा चहा.
३. चर्चमधे जाऊन केली जाणारी सामुदायिक उपासना
Comments
Post a Comment