त्र्यूफोची नजर पाहताना... ०२
*कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*
पालक व पाल्यांच्या दिसण्यातली साधर्म्यं-वैधर्म्यं मोठी करमणूक असते. आइस्क्रीमचे एकावर एक स्कूप केलेले फ्लेवर्स वेगळे दिसावेत तशी काही मुलांमध्ये आईबाबांची भिन्न रूपवैशिष्ट्यं दाखवता येतात. फिल्टर कॉफीतली कॉफी दुधात मिसळावी तसा काही मुलांमध्ये या वैशिष्ट्यांचा मेलाँज झालेला आढळतो. तर फुलावरून फळ ओळखता येऊ नये तशी कित्येक मुलं विशिष्ट जोडप्याची अपत्यं आहेत हे तोंडावळ्यावरून, शरीरयष्टीवरून ओळखता येत नाही.
आंत्वान दुआनेल (Antoine Doinel) फ्राँस्वा त्र्यूफोचा बाप आहे की त्र्यूफो आंत्वानचा? ते बाप-लेक आहेत की भाऊ-भाऊ? की केवळ दोस्त?
"...तो माझ्यासारखा आहे पण तो मी नव्हे, तो ज्याँ पिएर लेओ (-आंत्वानचं पात्र साकारणारा अभिनेता) सारखा आहे पण तो तो नव्हे." - त्र्यूफो
क्लासिक फिल्म्स पाहणाऱ्यांना 'कॅत्रं साँ कू ' (फोर हंड्रेड ब्लोज) ही 'लाद्री दि बिचिक्लेत्ते ' (बायसिकल थीव्ह्ज) च्या कुळीतली फिल्म वाटते. पण आंत्वानचं आयुष्य सांगत जाणाऱ्या उर्वरित चार फिल्म्स पाहिल्यात? त्या पाहताना लक्षात येतं, की 'कॅत्रं साँ कू ' व 'लाद्री दि बिचिक्लेत्ते ' मधे भासणारं साम्य हे मुख्यतः त्या काळातील बदलत्या चित्रपटीय (दिग्दर्शकीय) जाणीवांशी निगडीत आहे.
आंत्वानचं वागणं इतरांना उलगडत नाही, आंत्वानला इतरांचं वागणं उलगडत नाही. मित्र मैत्री निभावतो, अर्थ लावण्याच्या भानगडीत पडत नाही. अंथरुणात पडल्या पडल्या छोटा आंत्वान जेव्हा "शाळाबिळा माझ्याच्याने होत नाही. मला बुवा कामधंदा करायचा आहे" असं म्हणतो तेव्हा आई चक्रावते. 'शिक्षणाने प्रगतीच्या संधी वाढतात. आम्ही शिक्षणं सोडली, उच्चशिक्षणाचे फायदे आमच्या पदरात पडले नाहीत' असं तिचं म्हणणं. पण राहणीमानाचा दर्जा, भैतिक आयुष्याचा आलेख व आयुष्याचा आनंद घेणं या भिन्न गोष्टी आहेत. 'आनंदाकरता सुखं गरजेची असतात' या ठार गैरसमजातून माणूस राबतो, सुखांच्या ओंजळी भरून घेतो - बोटांतल्या फटींतून आयुष्य निसटून जातं. आंत्वानला शक्य तितक्या लवकर स्वतंत्र व्हायचंय कारण मला वाटतं ठाम समजुतींनी गजबजलेल्या जगात वावरतानाच त्यापासून काही इंच वर तरंगणारं स्वतःतलं काहीतरी त्याला टिकवायचं आहे.
आयुष्य कोणतेही वायदे करत नाही. जगण्याला कसं, कुठून भिडावं हा पेच आंत्वानला पडत नाही. कुमारवयात आपल्यापेक्षा पुष्कळ उंच मुलींमधे त्याला रस वाटतो. आयुष्याची अवघी लांबी-रुंदी-घनता कवेत घ्यायची! मग त्याला घरंदाज मुलींमधे रुची वाटू लागते. तो म्हणतो 'मला सभ्य, घरंदाज मुली आवडतात कारण मला घरंदाज पालक आवडतात - ते माझे पालक नसले म्हणजे झालं'. जिव्हाळ्याची आस आहे, पण सुरक्षित अंतर राखून.
माणसाच्या हाताला काहीतरी खेळ पाहिजे, बस्स. 'करिअर', 'कर्तृत्व', 'संसार' इत्यादी नावं देऊन आपण त्याची भलामण केली तरी खेळच तो. आंत्वान खेळ म्हणूनच काम करतो. त्याने निवडलेल्या नोकऱ्या पहा - सांगीतिक तबकड्या (रेकॉर्ड) तयार करणे, रात्रपाळीचा रिसेप्शनिस्ट, शिकाऊ गुप्तहेर, टी.व्ही दुरुस्त करणे, पांढऱ्या फुलांवर खोटे रंग चढवणे, छापखान्यातील काम, रिमोट कंट्रोलने बोटींची मॉडेल्स चालवणे... कामधंद्यात जगावेगळं काsही घडत नाही, निदान आपल्याबाबत तरी घडायचं नाही - आंत्वानला कळून चुकतं.
खरी मजा माणसा-माणसांतील संबंधांत आहे. तिथं सतत काहीतरी भन्नाट घडण्याची शक्यता असते, आव्हानं असतात, लपंडाव असतो. आंत्वान ते घडू देत राहतो, प्रेमात पडत राहतो. वयाच्या मानाने लवकर लग्न करतो, लवकरच पत्नीव्यतिरिक्त इतरजणींशी सुतं जुळवतो. नातेसंबंधांत तो चारचौघांप्रमाणे धुसफुसतो, भांडतो पण समोरच्याला धिक्कारू शकत नाही. त्रूफो म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या स्वभावात बालिश निखळता आहे. अनुभवाला नकार देण्याची, सामोपचाराने नात्याचा शेवट करण्याची त्याला गरज वाटत नाही. एका वेश्येला तो म्हणतो "...महिना संपला, रस्ता संपला, सिनेमा संपला - छे, संपणाऱ्या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत."
पण गोष्टी संपतात. कुणा न कुणाला संपवाव्याशा वाटतात. ...इथेसुद्धा मनाजोगतं सारं घडत नाही तर.
आंत्वान स्वतःची गोष्ट लिहू लागतो. पुस्तक छापतो.
'कॅत्रं साँ कू' (फोर हंड्रेड ब्लोज) १९५९
'आंत्वान ए कोलेत्' (आंत्वान अँड कोलेट) १९६२
'बेझे व्होले' (स्टोलन किसेस) १९६८
'दोमिसिल काँज्युगाल' (बेड अँड बोर्ड) १९७०
'लामूर आँ फ्वीत्' (लव्ह ऑन द रन) १९७९
पाच फिल्म्सच्या या मालिकेचा शेवट मुद्दामहून घडवून आणल्यासारखा वाटतो.
त्र्यूफो म्हणतो 'आंत्वान दुआनेल मालिका ही कदाचित विफलतेची, अपयशाची कहाणी वाटेल. मी या पात्राला महत्त्वाकांक्षा दिली नाही. मिकी माऊसप्रमाणे आंत्वानचं वय साकळतं.' - पण फ्राँस्वा, तू महत्त्वाकांक्षा देऊ केली असतीस तरी आंत्वाननं ती वागवली असती का?
अर्थात त्र्यूफोला याची जाणीव आहे.
"..वास्तवापुढे अमूर्ताचा, संकल्पिताचा बळी द्यावा लागतो हे ज्याँ रनुआकडून (Jean Renoir) आम्ही शिकलो होतो. पहिल्यापासून आमची फिल्म दिग्दर्शकाकडून आंत्वान दुआनेलकडे सरकत राहिली." - त्र्यूफो
परंतु एकसारखा शोकांगी आशय डव्हळत असल्यानं मालिकेचा ठळक सुखात्म शेवट आवर्जून व्हावा अशीही त्याची इच्छा होती. आपल्या चित्रपटांबद्दलची त्याची नोंदवही वाचताना 'लामूर आँ फ्वीत्' नं त्र्यूफोला किती कात्रीत धरलं होतं याचा अंदाज येतोः
'...आपण पुन्हा याठिकाणी येणार नाही, हा खरोखर शेवटला शेवट ' असं फिल्ममधून स्पष्ट सूचित होतं. मला पटकथा रुचत नव्हती. पूर्वदृष्यांचा (फ्लॅशबॅक्स) मिलाफ साधण्याकरता पटकथा विसविशीत ठेवावी लागली. सुधारणेला जरा म्हणून वाव नव्हता. दिग्दर्शन करत असताना ही भंपकगिरी असल्याचं मला जाणवत होतं. या फिल्ममुळे मी निराश झालो होतो, अनिच्छेनेच मी 'लामूर आँ फ्वीत्' प्रदर्शित केली. - त्र्यूफो
कॅमेऱ्याच्या कक्षेत येणाऱ्या जगाचं कॅमेरा चालवणाऱ्याच्या मर्जीपलीकडे एक वास्तव आकारत जातं. कॅमेऱ्याच्या क्षेत्राबाहेरच्या जगाशी त्याची अखंड देवाणघेवाण चालू असतो. साध्यासुध्या गोष्टी, जशी की: 'आंत्वान दुआनेल या नावाचा कर्ता मीच ' ही धारणा पक्की असताना एके दिवशी कुणीतरी लक्षात आणून दिलं की रनुआची सेक्रेटरी - तिच्या नावाशी ते खूपसं मिळतंजुळतं आहे. तिच्या नावारून मला हे नाव सुचलं असावं. - त्र्यूफो
तर आयुष्य / वास्तव / निसर्ग / दैव हे आपल्या अनुभवाने, अपेक्षांनी, विचारांनी तोललेल्या सुख-दुःखाच्या तराजूची फारशी पर्वा करत नाही. सिनेमातील पात्राचा नैसर्गिक प्रवास याला अपवाद नसावा. या प्रवासाशी संपर्क तुटल्यानं आंत्वान दुआनेल मालिकेवर शेवट लादल्याजोगा वाटतो. तरीही त्याला त्र्यूफोच्या प्रतिभेचा अनोखा स्पर्श आहेच.
त्र्यूफोच्या सिनेमात नव्या पात्राचा प्रवेश, जुन्या पात्राचा पुनःप्रवेश आणि एखाद्या पात्रांचं निरोप घेणं अतिशय वास्तवधर्मी असतं. याकामी त्याला शकला लढवाव्या लागत नाहीत. तो कॉमन सेन्सचाच यथेष्ट वापर करतो.
रहस्यमयता, उत्कंठा खुलवण्यासाठी त्र्यूफोला कारण लागत नाही. कधीकधी काही व्यक्तींना पाहून, ठराविक प्रसंगी वा स्थानी मनात उगाच शंकाकुशंका येतात. पण वावगं काहीच घडत नाही. तर कधी आपण निर्धास्त, बेसावध असताना रहस्याच्या जाळ्यात गुरफटले जातो. त्र्यूफोला मानवी मनाची उत्तम समज आहे. काहीवेळा उत्कंठावर्धक साचेबद्ध संगीताद्वारे आपली फजिती करतो की काय असं वाटतं पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर होणार नाही, कुठेही साचेबद्धता येणार नाही याची तो काळजी घेतो.
...काही बाप कामधंद्यामुळे दुरावतात. पोराच्या झोपेत, क्वचित रात्री जेवताना, सुटीच्या दिवशी त्याला मोठा होताना पाहतात. साधर्म्य केवळ योगायोग असतो. क्वचित नजरानजर होते, काहीतरी उजळतं, उचंबळतं, धूसर होत जातं.. प्रवासातून प्रवास फुटत जातो.
...चित्रपटाच्या निर्मितीचा काळ झरझर संपून जातो. मालिकेतील पहिला चित्रपट बनवताना तुमची अभिनेत्याशी गाठ पडते इतकंच. एडिटिंग रूममधे तुमची जवळून ओळख होऊ लागते. मागे, पुढे जाऊन, विविध कोनांतून तुम्ही त्याला निरखता. त्याच्यासाठी आणखी (पटकथा) लिहीणं तुम्हाला आवडू लागतं. 'ला नुई आमेरिकेन ' (डे फॉर नाइट) दरम्यान आम्ही दोघे प्रथमच कॅमेऱ्यात आमने-सामने आलो. वेगळीच भावना होती ती, आणि क्षणिक नव्हती. - त्र्यूफो
रहस्यमयता, उत्कंठा खुलवण्यासाठी त्र्यूफोला कारण लागत नाही. कधीकधी काही व्यक्तींना पाहून, ठराविक प्रसंगी वा स्थानी मनात उगाच शंकाकुशंका येतात. पण वावगं काहीच घडत नाही. तर कधी आपण निर्धास्त, बेसावध असताना रहस्याच्या जाळ्यात गुरफटले जातो. त्र्यूफोला मानवी मनाची उत्तम समज आहे. काहीवेळा उत्कंठावर्धक साचेबद्ध संगीताद्वारे आपली फजिती करतो की काय असं वाटतं पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर होणार नाही, कुठेही साचेबद्धता येणार नाही याची तो काळजी घेतो.
...काही बाप कामधंद्यामुळे दुरावतात. पोराच्या झोपेत, क्वचित रात्री जेवताना, सुटीच्या दिवशी त्याला मोठा होताना पाहतात. साधर्म्य केवळ योगायोग असतो. क्वचित नजरानजर होते, काहीतरी उजळतं, उचंबळतं, धूसर होत जातं.. प्रवासातून प्रवास फुटत जातो.
...चित्रपटाच्या निर्मितीचा काळ झरझर संपून जातो. मालिकेतील पहिला चित्रपट बनवताना तुमची अभिनेत्याशी गाठ पडते इतकंच. एडिटिंग रूममधे तुमची जवळून ओळख होऊ लागते. मागे, पुढे जाऊन, विविध कोनांतून तुम्ही त्याला निरखता. त्याच्यासाठी आणखी (पटकथा) लिहीणं तुम्हाला आवडू लागतं. 'ला नुई आमेरिकेन ' (डे फॉर नाइट) दरम्यान आम्ही दोघे प्रथमच कॅमेऱ्यात आमने-सामने आलो. वेगळीच भावना होती ती, आणि क्षणिक नव्हती. - त्र्यूफो
Comments
Post a Comment