शान्ता ज. शेळके यांनी सांगितलेला एक प्रसंग
बालपणीचा एक प्रसंग शान्ताबाईंनी आपल्या ललितलेखात वर्णिलेला आहे:
एकदा नात्यातल्या, की ओळखीतल्या एक बाई घरी आल्या. शान्तेची आई व त्या बाईंच्या गप्पा चालल्या. आईच्या गळ्यात नव्यानंच घडवलेली टपोऱ्या मण्यांची मोहनमाळ होती. बाईंचं लक्ष चटकन् माळेकडे गेलं.
"..नवीन घडवलीत वाटतं मोहनमाळ."
"हो. नवीच आहे."
"मणी टप्पोरे आहेत की. लाखेचे असतील. एवढे मोठे मणी शुद्ध सोन्याचे कसे असणार!"
आई काहीच बोलली नाही. नुसती हसली. यामुळे त्या बाईंना कसलंसं अगम्य समाधान वाटलं असावं. त्यांच्या मुद्रेवर ते स्पष्ट झळकत होतं. चहा-खाणं झाल्यानंतर बाई आपल्या घरी निघून गेल्या.
लहानग्या शान्तीनं प्रश्न केला: "आई, लाखेचे मणी म्हणजे काय गं?"
"अगं, लाख नावाचा एक पदार्थ असतो. सोनं परवडत नसेल तर या लाखेचे मणी बनवतात आणि वरून सोन्याचा पातळ पत्रा चढवतात फक्त."
"तुझ्या माळेचले मणी लाखेचे आहेत??" मोहनमाळेकडं संशयानं पहात शान्तेनं विचारलं. एखादी वस्तू आपल्याला वाटली तितक्या मोलाची नाही या भावनेनं तिचा हिरमोड झाला होता. शान्तेचा उतरू लागलेला चेहरा पाहून आईला हसू कोसळलं. "एवढा चेहरा पाडायला काय झालं? माळेचे मणी निखळ सोन्याचे आहेत हो."
"हो ना?" आईच्या उत्तरानं खूष होत चिमणी शान्ता म्हणाली, "मग तू त्या बाईंना तसं सांगितलं का नाहीस? त्यांनी माळेला लाखेची म्हटलेलं मुकाट्यानं ऐकून का घेतलंस?"
"अगं, काय करायचंय सांगून? आपल्याला शुद्ध सोनं परवडत नाही या कल्पनेनं त्यांना जो आनंद झाला तो - खोटा असला तरी - हिरावून कशाला घ्यायचा? त्यांनी हे मणी लाखेचे मानले तर त्यात काय मोठंसं बिघडलं? खरं काय ते आपल्याला ठावूक आहे ना? झालं तर मग."
"वा गं वा! उगाच कमीपणा का म्हणून घ्यायचा आपल्याकडे?" शान्तीनं तोऱ्यात विचारलं.
आई काहीवेळ गप्प राहिली. मग एकाएकी तिचा चेहरा वेगळाच दिसू लागला. ती समजुतीच्या स्वरात म्हणाली: "त्या बाईंच्या अंगावर तुला एखादातरी दागिना दिसला का?"
शान्तेनं मघाच्या त्या बाईंचं चित्र डोळ्यापुढं आणलं. खरंच की, त्यांच्या अंगावर काही म्हणता काही, एक फुटका मणीदेखील नव्हता. तिनं नकारार्थी मान हलवली.
"- मग झालं तर. जे आपल्यापाशी नाही ते दुसऱ्या कुणापाशी आहे, त्याला ते सहजप्राप्य आहे हे कित्येक लोकांना सहन होत नाही. ते मत्सर करू लागतात. दुसऱ्याजवळ जे आहे त्यात काहीतरी दोष, उणिवा काढल्या म्हणजे त्यांना आतल्या आत बरं वाटतं. ..."
आई क्षणभर गप्प बसली. पुढे म्हणाली, "गेली अनेक वर्षं मी या बाईंचा ओढघस्तीचा संसार पाहते आहे. अशा परिस्थितीत त्यांची दागिन्यांची हौस भागावी कशी? इतरांचे दागदागिने पाहून एखादीला हेवा वाटणं सहाजिक आहे. मला त्यांचा राग नाही आला, शप्पथ नाही आला. मला समजलं त्यांचं मन. खरं म्हणशील, तर मला त्यांची दया आली."
Comments
Post a Comment