एका प्रस्तावनेतून..
ल्येव तॉलस्तोय लिखित 'इवान द फूल' (Ivan the fool) या कथेचा वामन जनार्दन कुंटे यांनी "भोळ्या रामजीचें रामराज्य" नावाने केलेला (प्रथमावृत्ती १९५२, परंधाम प्रकाशन) स्वैर मराठी अनुवाद नुकताच वाचनात आला. कथेला भारतीय ढंग देण्यात आल्याने खरंतर या अनुवादाला रूपांतर म्हटलं पाहिजे. श्री. कुंट्यांच्या प्रस्तावनेतील काही परिच्छेद इथे उद्धृत करण्यास मला आवडेल: (गोष्टीतील ) ... तीन भाऊ समाजातील तीन प्रकारच्या लोकांचे प्रतीक आहेत - नेताजी - थोरला भाऊ - लष्करातील मोठा हुद्देदार. धनाजी श्रीमंत व्यापारी आणि रामजी कष्टाळू शेतकरी. यांतील पहिले दोघे प्रतिष्ठित मानले जातात आणि तिसरा हीन समजला जातो. पण वस्तुस्थिति काय आहे? पहिले दोघे ही बांडगुळे आहेत. त्यांचें जीवन रामजीच्या कष्टांवरच अवलंबून आहे. पहिल्या दोघांचें जीवन बाह्यता भपकेदार, बिनकष्टाचे, मान-मान्यतेचें आहे. पण त्या दोघांच्याहि जीवनात भयंकर चढउतार होण्याचा केवढा धोका आहे! रामजीच्या जीवनात भपका नाही, पण चढउतारहि नाही. नदीच्या प्रवाहाप्रमाणे तें संथपणें चाललें आहे. त्यात सुखदुःखाचे मोठे प्रसंग नाहीत पण शांति व समाधान आहे. पण दु