जगज्जेत्याचे आश्चर्य

 वास्तविक घटना आहे की दंतकथा ते ठावूक नाही.
 
दिग्विजयाची पताका फडकवत सिकंदर आफ्रिकेत पहोचला. ग्रीकांच्या दृष्टीने रानटी असलेले आफ्रिकन लोक गुण्यागोविंदाने आपापल्या टोळ्यांत रहात होते. त्यांना 'दिग्विजय' म्हणजे काय ते कळणे शक्य नव्हते. सिकंदराचे स्वागत झाले, टोळीतील माणसांनी त्याला आपल्या नायकाकडे नेले.
नायकाने 'या पाहुण्याला थैल्या भरून अन्नधान्य, खाद्यपदार्थ देण्यात यावेत' असा आदेश दिला. सिकंदर बुचकळ्यात पडला.
 नायक म्हणाला, "आपण इतक्या दूरवर आलात त्या अर्थी आपल्याकडे दुष्काळ पडला असावा, अन्नटंचाई निर्माण झाली असावी, आपल्याला मदतीची गरज असावी असे आम्हाला वाटले. अन्यथा आपला देश सोडून, माणसांचा जथा घेऊन दूर-दूरवर भटकण्याचे कारण काय!"

इतका भाबडा, सरळसोट प्रश्न ऐकून सिकंदर मनातल्या मनात वरमला. तरी आपली बाजू सावरून घेण्याकरता चटकन् म्हणाला, "नाही, अन्नासाठी मी तुमच्या प्रांतात आलो नाही. मला तुमच्या चालीरितींची माहिती करून घ्यायची आहे, तुमच्याशी स्नेह करायचा आहे."

या उत्तराने नायकाचे समाधान झाले.
 
काही वेळाने परिपाठानुसार न्यायदानाचे सत्र आरंभले. दोन माणसे टोळीप्रमुखापुढे आपले म्हणणे मांडू लागली. पहिला म्हणाला, "मी या माणसाकडून जमीन खरेदी केली. ती खणताना मला एक सोन्याने भरलेला घडा सापडला. मी केवळ जमीन विकत घेतली होती, तीत पुरलेल्या गोष्टींबद्दल काहीच बोलणे झाले नव्हते. तेव्हा तो घडा जमिनीच्या पूर्वीच्या मालकाने घ्यावा."
दुसरा माणूस म्हणाला, "मी ती जमीन याला विकली त्याअर्थी तिच्यापासून होणारा सर्व नफा याचाच झाला. आता सोनेही त्याचेच आहे, ते त्यानेच घ्यावे."
 नायक काहीवेळ शांत राहिला. मग पहिल्या माणसास उद्देशून म्हणाला, "तुला एक मुलगी आहे?"
"हो."
दुसऱ्या माणसाकडे वळून म्हणाला, "आणि तुला मुलगा आहे, हो ना?"
"हो."
"ठीक. वेळ येताच दोघांचे लग्न लावून द्या आणि त्या जोडप्याला ते सोने द्या."

नायकाजवळ बसलेल्या शिकंदराला आपल्या मुद्रेवरचे आश्चर्य लपवता आले नाही. नायकाने विचारले, "काय हो? तुम्हाला काही अन्याय झाला असे वाटते का?"

"नाही, नाही. हा अपूर्व प्रकार पाहून मी चकित झालो इतकेच."

Comments