एका प्रस्तावनेतून..
ल्येव तॉलस्तोय लिखित 'इवान द फूल' (Ivan the fool) या कथेचा वामन जनार्दन कुंटे यांनी "भोळ्या रामजीचें रामराज्य" नावाने केलेला (प्रथमावृत्ती १९५२, परंधाम प्रकाशन) स्वैर मराठी अनुवाद नुकताच वाचनात आला. कथेला भारतीय ढंग देण्यात आल्याने खरंतर या अनुवादाला रूपांतर म्हटलं पाहिजे. श्री. कुंट्यांच्या प्रस्तावनेतील काही परिच्छेद इथे उद्धृत करण्यास मला आवडेल:
(गोष्टीतील )... तीन भाऊ समाजातील तीन प्रकारच्या लोकांचे प्रतीक आहेत - नेताजी - थोरला भाऊ - लष्करातील मोठा हुद्देदार. धनाजी श्रीमंत व्यापारी आणि रामजी कष्टाळू शेतकरी. यांतील पहिले दोघे प्रतिष्ठित मानले जातात आणि तिसरा हीन समजला जातो. पण वस्तुस्थिति काय आहे? पहिले दोघे ही बांडगुळे आहेत. त्यांचें जीवन रामजीच्या कष्टांवरच अवलंबून आहे. पहिल्या दोघांचें जीवन बाह्यता भपकेदार, बिनकष्टाचे, मान-मान्यतेचें आहे. पण त्या दोघांच्याहि जीवनात भयंकर चढउतार होण्याचा केवढा धोका आहे! रामजीच्या जीवनात भपका नाही, पण चढउतारहि नाही. नदीच्या प्रवाहाप्रमाणे तें संथपणें चाललें आहे. त्यात सुखदुःखाचे मोठे प्रसंग नाहीत पण शांति व समाधान आहे.
पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, रामजीचे जीवन हीन, कष्टाचे असें ठरवून सर्व जण आपल्याला (स्वतःला) बांडगुळाच्या सदरात घालण्याच्या खटपटीत आहेत. शिकायचें कशाकरता? तर शेतकरी जीवनातून मुक्त होऊन ऐषआरामी जीवन घालवता यावें याकरिता! जोपर्यंत हे शिकलेले ऐदी लोक थोडे होते तोपर्यंत त्यांच्या चैनी चालल्या. पण जो उठला तो तिकडे धावू लागल्यावर हें कसें चालणार? मग शिकूनही हे लोक बेरोजगार राहू लागतात आणि सुशिक्षितांची बेकारी हा प्रश्न भोडसावू लागतो.
सध्याची शिक्षणपद्धति इतकी भयंकर आहे की तिच्यापायीं समाज स्वतःचा पैसा खर्च करून निष्क्रिय, ऐदी वर्ग बनवित आहे. आणि पुन्हा यांचें काय करावें या विवंचनेत पडत आहे. शाळेमध्ये व्याख्यान देण्याच्या एका प्रसंगीं मी विद्यार्थ्यांना असा प्रश्न टाकला होता की, आता तुम्ही शिकत आहा व शिकल्यानंतर तुम्ही काही उद्योग करणार आहा. शिकताना आणि नंतरहि तुम्ही जें अन्न आणि वस्त्रें वापरीत आहा त्यांच्या निर्मितीमध्ये तुमच्या शिक्षणाचा किंवा श्रमाचा काही अंश आहे का? नसेल तर तुम्हाला या वस्तु वापरण्यास कसा हक्क पोंचतो? याचा तुम्ही विचार करा. ... यावर नंतर आभार मानणाऱ्या गृहस्थांनी माझें म्हणणें खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलें, "प्रत्येकाने शरीरश्रमांनी आपलें अन्नवस्त्र मिळवणें योग्य खरें, पण वाल्मीकीसारख्या कविचीहि समाजाला आवश्यकता आहे. ..तेव्हा बौद्धिक श्रमाला कमी लेखू नका." मी बौद्धिक श्रमाला कमी लेखीत नाही. वाल्मीकीने जे रामायण लिहिलें तें लिहिण्याकरता त्याने काही कोणी वेतन देऊन भाडोत्री ठेवला नव्हता. तो आपल्या आश्रमात स्वावलंबी जीवन जगत होता. रामाने टाकून दिलेल्या सीतेला आश्रय देण्याइतका सो समर्थ होता. त्याने आपली प्रतिभा कोणा राजाला विकली नव्हती. कालिदासाची प्रतिभा विशाल होती पण त्याने ती राजाच्या दरबारात त्याच्या सेवेला लावल्यामुळे ती किती तरी कुंठित झालेली दिसते.
आताचे शेतकरी वाईट जीवनाकडे नजर लावून आपलें काम लाचारीने करीत आहेत ही स्थिति भयानक आहे, आणि ती शतक्य तितक्या लौकर बदललीच पाहिजे. ...सुशिक्षित शहाणे म्हणवणारे लोक काही थोडे उद्योग करतात पण ते उद्योग निकृष्ट प्रतीचे असतात. बिड्या, सिगारेट, पावडर, स्नो (जुन्याकाळचं फेअरनेस क्रीम), वनस्पती तूप असले कारखाने काढून देशाचें औद्योगिकरण होत आहे! यात समाधान मानणारे लोक व काही पाश्चात्त्य लोक खेडेगावचे जीवनमास वाढवण्याच्या बाता करीत आहेत. पण प्रथम उच्च जीवनमान म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट केली पाहिजे. मडक्यातून दूध पिणाऱ्याचें जीवनमान उच्च कीं टेबलावर कपबशांतून चहा पिणाऱ्याचें उच्च? उन्हातान्हात, पाऊसपाण्यात उघडेंवाघडें फिरून ज्यांच्या प्रकृतीला ढीम्महि होत नाही त्यांचे जीवन उच्च कीं जरा हवा बदलली की गळ्यात मफलर, अंगात गरम कपडे घालूनहि ज्यांची प्रकृति बिघडते व ज्यांना डॉक्टरचे पाय धरावे लागतात त्यांचे जीवनमान उच्च? आज सारे उलटें झालें आहे. शेतकरी दूध विकून आपण चहाचा काढा पीत आहे आणि लोणी विकून रबराचे फुगे आणत आहे. खेड्यांचें खरें जीवनमान वाढवायचें असेल तर शेतकऱ्याला या कांचनमोहातून मुक्त केलें पाहिजे.
..एवढेंच करून भागणार नाही. आपण निर्माण केलेल्या संपत्तीचा कोणी दुरुपयोग करील तर त्यालाहि तसा करू देता उपयोगी नाही. ...शेतकऱ्याने, कामकऱ्याने आपण राबून भांडवलदारांची लुटण्याची शक्ति वाढवण्याला मदत करता उपयोगी नाही. ..प्रत्येकजण शरीरश्रमातून सुटका होण्याकरिता धडपडत आहे, यंत्रे निर्माण होत आहेत, तीहि याचकरिता. ..शरीरश्रमाला योग्य मानाचें स्थान प्राप्त झालें पाहिजे.
...(गोष्टीतील तिन्ही भाऊ राजे झाल्यानंतर) नेताजी व धनाजी यांच्या राज्याची काही काळ भरभराट झालेली दिसते. पण तेथे एकीकडे जेवढा ऐषआराम व टोलेंजगी वाडे आहेत तितकेंच दुसरीकडे दैन्य आणि दारिद्र्य आहे. रामजीच्या राज्यात भपकाहि नाही आणि दैन्यहि नाही.
.... नेताजी व धनाजी यांची राज्ये हिंसेवर आधारलेली होतीं. त्यांची सैतान वासलात लावू शकला, रामजीच्या राज्याची लावू शकला नाही. हिंसेचे किती भयंकर परिणाम होतात याचें प्रत्यक्ष दृश्य दोन महायुद्धांनी आपल्यापुढे ठेवलेलें आहे. ... सैन्याशिवाय, हिंसेशिवाय परचक्रापासून कसें संरक्षण होईल हें बहुतेकांना कोडें पडलें आहे. ...हिटलरने ज्यूंवर हत्यार धरलें तेव्हा गांधीजींनी हिटलरला अहिंसेने तोंड देण्याचा ज्यूंना सल्ला दिला होता. तो पुष्कळ लोकांना विचित्र वाटला. तो त्यांनी मानला असता तर...?
हिंदुस्थानची फाळणी झाल्यामुळे निर्वासितांचा भयंकर प्रश्न निर्माण झाला आहे. हे निर्वासित आपलीं घरेंदारें न सोडता घरामध्येच प्रतिकार न करता मरायला तयार झाले असते तर काय झालें असतें हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. फारच थोडी हत्या झाल्याबरोबर ती हिंसा बंद पडली असती. पण त्यांनी हिंसा केली म्हणून यांनी केली. नंतर यांनी हिंसा केली म्हणून त्यांनी केली असें दुष्टचक्र सुरू झालें आणि लक्षावधी लोकांचे हालहाल झाले. पकिस्थानातून ७५ लाख निर्वासित हिंदुस्थानात आले. ..हिंदुस्थानातून ७१ लक्ष लोक पाकिस्थानात गेले. तीन-चार लाखांनी हा आकडा कमी आहे. एवढ्यापुरती भारताने आपली पाठ थोपटून घ्यावी.
... हिंसेने आपली नालायकी अशी किती तरी वेळा सिद्ध करून दाखवली आहे. तरी पण तिच्या मोहातून मात्र मनुष्याची सुटका होत नाही. ...पण इतिहासात असें कधी घडलें आहे काय? असें सुशिक्षित म्हणविणारे लोक विचारणारच. उत्तर एवढेंच, की सूक्ष्म दृष्टीतून विचार केला म्हणजे मानवाची प्रगति अहिंसेनेच झाली आहे व होत आहे असें दिसून येईल. पण इतिहासाला अशी एक वाईट खोड आहे की, तो जें काही लोकविलक्षण आहे तेवढेंच नमूद करून ठेवतो. अनेक लोक व अनेक राज्यें अनेक वर्षेंपर्यंत एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहिलीं तर ही गोष्ट तो नमूद करणार नाही. त्यांच्यामध्ये तंटा उपस्थित झाला, लढाई झाली की त्याची अगदी तपशीलवार माहिती टिपून ठेवायला सरसावलाच. त्यामुळे या लिखित इतिहासापासून अहिंसक प्रतिकाराला आधार मिळणें कठिण आहे.
...असो, एक गोष्ट त्याबरोबरच खरी आहे, की अहिंसेने प्रतिकार करायला मनोधैर्य जास्त लागतें आणि सत्य व न्याय आपल्या बाजूने असावा लागतो - तेव्हा आपलें जीवन तपासून सत्य आणि न्याय यापासून आपण किती दूर आहों हें जाणून घेऊन तें सतत दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणें हा अहिंसेला लागणारें मनोधैर्य मिळवण्याचा मार्ग आहे.
...भाषांतर अगदी शब्दशः केलेले नाही. मूळ नावेंहि बदललेलीं आहेत. माझ्या विचारांची छायाहि काही ठिकाणीं पडली आहे. ते जमेस धरून वाचकांनी पुस्तक वाचावें अशी विनंती आहे.
२८ - ८ - १९५२
वा. ज. कुंटे
वामन जनार्दन कुंट्यांबद्दल:
(? नोव्हेंबर १८९२ - २० सप्टेंबर १९७७)
(? नोव्हेंबर १८९२ - २० सप्टेंबर १९७७)
आर्किटेक्ट व इंजिनिअर. कवी आणि अनुवादक म्हणून ओळखले जातात.
१९११ साली प्रसिद्ध झालेले ‘सरला’ खंडकाव्य ही त्यांची पहिली साहित्यकृती.
कुंटे ह्यांची वाङ्मयविषयक महत्त्वाची कामगिरी म्हणजे; काव्यविषयक नवे प्रयोग करूनही काहीसे उपेक्षित राहिलेले कवी रेंदाळकर यांच्या कवितांचे दोन खंडात संकलन करून क्रमशः १९२४ व १९२८ मध्ये त्यांनी ते स्वखर्चाने प्रसिद्ध केले.
मूळ बंगालीवरून त्यांनी मराठीत ‘सुशीला की विमला आणि इतर गोष्टी’ (१९३१) लिहिल्या. टॉलस्टॉयच्या ‘इवान द फूल’ या दीर्घकथेचे ‘भोळ्या रामजींचे रामराज्य’ या नावाने स्वैर रूपांतर केले. ‘थोरोचे श्रमजीवन’ (१९५१) आणि ‘मालकीची मीमांसा’ (१९५५) हे त्यांचे दोन अनुवाद उल्लेखनीय आहेत.
विनोबाजींचा ‘गुरुबोध’ (श्रीशंकराचार्यांच्या निवडक वेच्यांचा संग्रह), ‘अपरोक्षानुभूति’ (१९५४), ‘प्रबोध सुधाकर’ (१९६१), ‘ओडिसाच्या जगन्नाथदासाचा भागवत एकादश स्कंध’, ‘भागवत सार‘, ‘कबिराचे बोल’ (१९६२) ही त्यांची अध्यात्मविषयक भाषांतरे होत.
१९११ साली प्रसिद्ध झालेले ‘सरला’ खंडकाव्य ही त्यांची पहिली साहित्यकृती.
कुंटे ह्यांची वाङ्मयविषयक महत्त्वाची कामगिरी म्हणजे; काव्यविषयक नवे प्रयोग करूनही काहीसे उपेक्षित राहिलेले कवी रेंदाळकर यांच्या कवितांचे दोन खंडात संकलन करून क्रमशः १९२४ व १९२८ मध्ये त्यांनी ते स्वखर्चाने प्रसिद्ध केले.
मूळ बंगालीवरून त्यांनी मराठीत ‘सुशीला की विमला आणि इतर गोष्टी’ (१९३१) लिहिल्या. टॉलस्टॉयच्या ‘इवान द फूल’ या दीर्घकथेचे ‘भोळ्या रामजींचे रामराज्य’ या नावाने स्वैर रूपांतर केले. ‘थोरोचे श्रमजीवन’ (१९५१) आणि ‘मालकीची मीमांसा’ (१९५५) हे त्यांचे दोन अनुवाद उल्लेखनीय आहेत.
विनोबाजींचा ‘गुरुबोध’ (श्रीशंकराचार्यांच्या निवडक वेच्यांचा संग्रह), ‘अपरोक्षानुभूति’ (१९५४), ‘प्रबोध सुधाकर’ (१९६१), ‘ओडिसाच्या जगन्नाथदासाचा भागवत एकादश स्कंध’, ‘भागवत सार‘, ‘कबिराचे बोल’ (१९६२) ही त्यांची अध्यात्मविषयक भाषांतरे होत.
Comments
Post a Comment