साधू आणि देव

 सुखं-दुःखं, खुशाली-अखुशाली, आयुष्यातील उत्पातांमागे काही ठोस कारण नसतं, असं म्हणता येईल. किंवा जणू आपलं स्वतःचं एक अदृश्य गणित, अगम्य वेळापत्रक असल्याप्रमाणे यायचं तेव्हा ते बरोब्बर येतात, असंही म्हणता येईल. उधाण वारा झाडांशी खेळतो त्याप्रमाणं आयुष्य आपल्याला गदगदा हलवतं, आपल्या दारावर टकटक करतं, सुरक्षिततेचा आभासी कोश  भेदून आपल्याला गाठतं - गाठतंच. सारंकाही सर्वदा आपल्या मनासारखं होत राहिलं असतं तर आपण आनंदी ठरलो नसतो. आज आपण ज्या गुंगीत, बेशुद्धीत, धांदलीत  रोजचा दिवस ढकलतो ती गुंगी मग अत्यधिक गाढ असती. तरंगहीन, स्तब्ध डबक्याप्रमाणे बधिरतेने आपण जगलो असतो. मृतावस्थेत जे स्थैर्य असतं, जी निश्चिंतता, सुरक्षितता लाभते ती व तितकीच आपल्याला लाभली असती.

एक साधू होता. तो प्रवचनं देत असे, लोक ऐकावयास येत, काही शिधा-पत्र देत. लोक साधूपुढे आपली गाऱ्हाणी मांडायचे, आपलं दुःख सांगायचे. लोक सदानकदा इतके रंजले-गांजलेले असतात याचा त्याला विस्मय वाटे, वाईटही वाटे.
देवाकडे त्यानं कध्धीच काही मागितलं नव्हतं. एकदा देवाशी बोलता बोलता तो म्हणाला: "आजवर मी तुझ्याजवळ काही मागितलं नाही. आज मागतो: माझ्याकडे जे लोक येतात त्यांच्या समस्या दूर कर."
 
देव म्हणाला, "साधू महाराज, तुम्ही त्यात लक्ष घालू नका. मी करतो ते ठीक आहे."
 
साधूला हसू आलं. "तू करतोस ते ठीक असेल तर मी म्हणतो तेही ठीक असलं पाहिजे. करून टाक की तेवढं!"
 
देवही हसून म्हणाला: "तुमच्या आग्रहाखातर एकवेळ मी तसं करतो. पण तुम्हाला सांगतो, यात खरी मजा नाही.
 
 "बरं, ते आपण नंतर पाहून घेऊ," साधू म्हणाला, "माझ्यापाशी येणाऱ्या दुःखी जीवांच्या कष्टांचं, व्यथांचं फक्त एकदा निवारण कर तर खरं."
 
... अन तसंच घडलं. श्रोत्यांच्या समस्या, इडापिडा रातोरात दूर झाल्या. दुसऱ्या दिवशी साधू नेमानुसार प्रवचन  सांगण्यास बसला. पहातो तो काय, श्रोते गायब! एक दिवस झाला, दोन दिवस झाले, एक आठवडा झाला, एक महिना झाला. साधूकडे एक माणूसही फिरकलं नाही. 
 
देवाशी बोलता बोलता साधूने या गोष्टीचा उल्लेख केला. देवाला अगदी खदखदून हसू आलं. "काय साधू महाराज, श्रोत्यांविना करमत नाही की काय! असो. 'त्यांच्या समस्यांचं निवारण कर', असं तुम्हीच म्हणालात ना! मग काय, दुःखनिवारण झालं. थोडक्यात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. सुखच सुख मिळाल्याने ते सुखोपभोगात आकंठ बुडाले आहेत. पूर्वी त्यांना काहीबाही खटकत असे, प्रश्न पडत, अधूनमधून जाग येई. ते आत्मपरीक्षण करत, काहीवेळा तुमच्यापाशी येत. आता इकडे येण्याची गरजच उरली नाही. आपल्या सुख-दुःखं, क्षुल्लक इच्छा-आकांक्षांपलीकडे पहाण्याचा अवसरच राहिला नाही. आता ते मरेस्तोवर मौजमजा करत आहेत, मौजमजेने मरत आहेत."
 
साधू देवाचे बोल शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला, "होय देवा, माझं चुकलं. तू करत होतास तेच बरं होतं."

Comments