मृत्यूशय्येवर... (नाटुकले)
* * हे भाषांतर माझे नाही * *
मृत्यूशय्येवर...
मूळ जर्मन लेखिका: मार्टिना बेरानेक
(एक म्हातारा, मरणासन्न शेतकरी. कुटुंबातील सारेजण त्याच्या शय्येभवती जमलेत. त्याच्या पायांच्या दिशेला प्रार्थनेनंतर लावून ठेवलेली मेणबत्ती जळते आहे.)
शेतकरी (आवाजात घरघर): मेरी! मेरी, कुठे आहेस तू?
मेरी: मी इथेच आहे तुझ्यापाशी.
शेतकरी: एलिसा, पोरी, तूसुद्धा आहेस का गं?
एलिसा: होय पपा, ही मी इथे आहे.
(अशातऱ्हेनं शेतकरी घरातल्या सगळ्या माणसांना - सात मुलं, मोलकरीण, घरगडी - हाका मारून तोच-तो प्रश्न विचारतो. सगळ्यांची उत्तरं आल्यावर ताडकन् उठून बसतो.)
शेतकरी: सगळे इथे आहेत?? मग कामाचं कोण बघतंय?!
मेरी (त्याला झोपवत): असं काय करतोस! या घडीला आम्ही तुझ्याचजवळ असायला हवं की नाही?
शेतकरी: छे ,छे. काही गरज नाही. तुमची गरज आहे तिथे शेतावर.
मेरी: ठीक आहे. चला, सगळे आपापल्या कामाला जा.
(सगळे निघून जातात. फक्त मेरी उरते.)
शेतकरी: आता मी अतिशय थोड्या वेळेचा सोबती आहे. मेरी, आता तरी खरं खरं सांग. आपल्या मुलांपैकी तो लाल केसांचा बेपेर्ल, तो काही तुला माझ्यापासून झालेला नाही... हो ना? इतर सर्वांचे केस काळे नाहीतर राखाडी आहेत, बेपेर्लचेच तेवढे लाल आहेत. खरं सांग, तो माझा मुलगा नाही ना?
मेरी: शांत हो. मनाला कसलातरी घोर लावून घेऊ नकोस. ...खरं सांगायचं तर बेपेर्लच तेवढा 'तुझा' आहे.
शेतकरी: फक्त तोच?!! आणि बाकीचे??
मेरी: या घटकेला असल्या गोष्टी जाणून घेऊन काय करणारेस!
शेतकरी: अरेरे! बेपेर्ल....माझा बेपेर्ल! मी त्याच्यावर नेहेमी अन्याय केला कारण मला वाटायचं की... बोलाव, बोलाव माझ्या बेपेर्लला.
मेरी: (दाराशी जाऊन हाक मारते) बेपेर्ल गोठ्यात असेल. त्याला इकडे पाठवून द्या!
(घराबाहेरून) आवाज: पाठवतो, लगेच पाठवतो.
शेतकरी: मेरी, मी गेल्यावर निदान वर्षभरतरी थांब बरं का. लगीनघाई करू नकोस!
मेरी: हो, हो. थांबणारे मी.
शेतकरी: तो विमर एरीष, त्याच्याशी अजिबात लग्न करू नको. रानटी आहे तो.
मेरी: बरं. नाही करणार त्याच्याशी-
शेतकरी: -आणि त्या ब्रांडाउरशीसुद्धा नको.
मेरी: पुरे आता. आमचं आम्ही बघून घेऊ नंतर. तुला काय करायचं ते कर तू एकदाचा.
(बेपेर्ल आत येतो)
शेतकरी: बेपेर्ल, माझ्या पोरा, माझ्या छोकऱ्या.. मी तुला नीट वागवलं नाही रे.
बेपेर्ल: ठीक आहे पपा.
शेतकरी: एवढ्यातेवढ्या गोष्टींवरून तुला सारखा माझ्या हातचा मार पडला..
बेपेर्ल: ठीक आहे पपा.
शेतकरी: पण आता मी या चुकीची भरपाई करतो. सगळं बदलून टाकतो.
बेपेर्ल: ठीक आहे पपा.
शेतकरी: मी माझी सारी इस्टेट तुझ्या नावे करून टाकतो.
बेपेर्ल: ठीक आहे पपा.
शेतकरी: मेरी, लिहीण्यासाठी कागद वगैरे आण. मी नवं मृत्यूपत्र बनवणार आहे.
मेरी: आणते हं. (बेपेर्लला-) जा, तू कामाला लाग. पपा लिहील त्याला काय लिहायचं ते.
बेपेर्ल: ठीक आहे ममा (जातो).
मेरी: (कागद व लेखणी घेऊन येते. पलंगाच्या कडेशी घोटाळत-) ...समज मी तुला सत्य सांगितलं नसेल तर? ...बेपेर्ल तुझा मुलगा नाही, हे खरं असेल तर?
शेतकरी: बघ! असं काय बोलतेस तू? मला तर काही कळेनासं झालंय. माझी घटका भरत आली आहे आणि तू मला अशी गोंधळात टाकतेस? काय करावं मी?
मेरी: तू आपला सारंकाही माझ्या नावानं करून दे. ज्याच्या-त्याच्या पात्रतेप्रमाणे मी वाटून देईन सगळ्यांना. हेच उत्तम, काय?
शेतकरी: असं का? खरंय म्हणा. तेच उत्तम. ...पण मला सत्य कळणार तरी कधी?? खरं काय ते जाणून घ्यायची फार इच्छा आहे मला!
मेरी: कळेलच तुला. मी मरून स्वर्गात आले नं, की सांगेन तुला.
शेतकरी: हं... म्हणजे मला ते कधीच कळणार नाही तर!
Comments
Post a Comment