शब्द
'शब्द' कमला दास ( Kamala Das / Kamala Surayya / Madhavikutty) शब्द, शब्द, शब्द! शब्दच शब्द माझ्याभवती... पानांसारखे फुटत राहतात मला! त्यांचं हे आतपासून सावकाश पालवणं कधी थांबेलसं वाटत नाही तरी मी बजावत रहाते स्वतःला, 'जरा जपून! नसती ब्याद आहे ही. अगं, कस-कसली रूपं धारण करतात ते! - सुसाट पायांनी जिथं कचकन् थांबावं अशी रस्ता चिरत गेलेली भेग काय! सुन्न, गुंग करून टाकणाऱ्या लाटांचा समुद्र काय! पेटलेल्या वाऱ्याचा झोत काय नि जिवश्च मित्राचा गळा कापायला शिवशिवणारा सुरा काय!!' शब्द…..वैताग मेला. तरी फुटतात ते मला, जणू पालवी फुटावी झाडाला. कुठल्याशा गाढ आंतरिक शांतीतून त्यांचं हे उगवत रहाणं कधी थांबेलसं वाटत नाही.