प्रेम व जवळीक

तुम्हाला प्रेमाची गरज असते; प्रेयसीची, प्रियकराची गरज असते. प्रेमाच्या खळाळत्या प्रवाहात मुसंडी मारण्यासाठी तुमच्या अंगी धाडस असावं लागतं.
 
हे पाणी कापणं सोपं नसतं - भीतींचे पुष्कळ भोवरे लागतात. अन्य कशाहीपेक्षा तुम्ही प्रेमाला घाबरता कारण... कुणास ठावूक काय घडेल! समोरची व्यक्ती तुम्हाला स्वीकारेल की नाकारेल, कुणी सांगावं! मन भयभीत होतं, तुम्ही डगमगता, कचरता - मनातलं बोलू की नको? त्याच्या/तिच्यापाशी माझ्या भावना व्यक्त करू की नको?
 
यावर तोडगा म्हणून जगातील समस्त पेदरट मंडळी विवाहसंस्थेचा पक्ष घेत आली आहेत. त्यांनी विवाहबंधनाला प्रेमाहून श्रेष्ठ ठरवलं आहे, कारण याबाबतीत काय करावं हा निर्णय ज्या-त्या व्यक्तीवर सोडल्यास फारच थोड्या व्यक्ती प्रेम करण्यास सरसावतील. बहुतांश माणसं प्रेमाविना जगतील, प्रेमाविना मरून जातील.

प्रेम - मोठी खतरनाक चीज आहे.... कोणाही व्यक्तीच्या समीप जाणं म्हणजे एका सर्वथा निराळ्या विश्वाला जाऊन भिडणं, निराळ्या ग्रहाला धडक देणं. पुन्हा तेच - तुमची ती धडक, तुमचा प्रस्ताव स्वीकारला जाईल की झिडकारला जाईल, कुणास ठावूक! समोरची व्यक्ती तुमच्या गरजेला, तुमच्या इच्छेला संमती देईल अथवा नाही हे कळण्याचा अन्य कोणताही मार्ग नसतो. ...कदाचित तो/ती तुम्हाला 'नाही' म्हणेल. 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं तुम्ही म्हटलात, तरी त्याही व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम दाटेल याचा काय भरोसा? तुम्हाला जे वाटतं ते त्याला/तिलासुद्धा वाटलंच पाहिजे असं काही नाही.

नकाराची भीती एखाद्याचा घात करू शकते. तेव्हा धूर्त, व्यवहारी माणसं या भनगडीत पडत नाहीत. 'आपल्याशी आपण बरे - निदान कुणाचा नकार ऐकून घ्यायची वेळ यायला नको' असं म्हणून तुम्ही भले आपला अहंकार जपाल, पण तो पूर्णतः विफल असतो, निरर्थक असतो. अहंकार तुम्हाला तृप्त करू शकत नाही. तुम्हाला कोणीतरी हवं असतं - प्रेम करण्यासाठी कोणीतरी हवं असतं. जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करतं, तुम्हाला स्वीकारतं तेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारू लागता. जेव्हा कुणा अन्य व्यक्तीला तुमच्या सान्निध्यात आनंद होतो तेव्हा तुम्ही स्वतःच्या सान्निध्यात रमू लागता, त्याचा आस्वाद घेऊ लागता. कुठच्याही तऱ्हेचा नातेसंबंध हा एक आरसा असतो. त्यात तुम्ही खरोखर जसे आहात तसे दिसता; तुमचं वास्तविक रूप त्यात प्रतिबिंबित होतं. 
 
...आयुष्याच्या प्रारंभीपासूनच तुम्हाला नाकारण्यात आलंय, धुतकारण्यात आलंय. घाणेरड्या मानवी समाजव्यवस्थेचा भाग आहे हा. पालकांची मर्जी राखल्यास, त्यांच्या आवडीनुसार वागल्यास अपत्याचा स्वीकार होतो, त्याचे लाड केले जातात. पालकांना आवडणार नाही अशी कृती केल्यास त्याला रागे भरलं जातं, त्याचा धिक्कार केला जातो. ही गोष्ट त्या चिमुरड्या मनात खोलवर झिरपते. हळूहळू मुलाला कळून चुकतं, की ते जसं आहे, त्याची जी सहजप्रकृति आहे ती स्वीकारली जाणार नाही. इतरांकडून, मुख्यतः मोठ्यांकडून होणारा त्याचा स्वीकार हा त्याच्या वर्तणुकीवर अवलंबून आहे. या सबंध प्रकाराने त्या मुलाच्या मनात आत्म-निंदा रुजते. ते आतल्या आत स्वतःचा तिरस्कार करू लागतं.
 
तुम्ही जर प्रेमात पडला नाहीत; तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला खुल्या दिलाने स्वीकारणारे प्रेमिक, मित्रमंडळी जर तुमच्या आयुष्यात आली नाहीत तर बाल्यावस्थेतील नाकारलेपणाच्या जडणघडणीतच तुम्ही आजन्म खितपत पडाल. प्रेम घडलंच पाहिजे! प्रेम हवंच. तुम्ही या पाण्यात उडी घेतलीच पाहिजे, सूर मारलाच पाहिजे. कदाचित केव्हातरी तुम्ही या खेळातून बाहेर पडाल, 'निवृत्त' व्हाल. कदाचित केव्हातरी तुम्ही प्रेम-वासनांपलिकडे जाल पण पात्रात उतरलाच नाहीत तर पैलतिरी जाल कसे!
 
घाबरू नका. मनातील साऱ्या खुळचट कल्पना, बावळट विचार झटकून टाका. तुम्हाला भीती वाटते, ठावूक आहे मला. भीतीची भीती वाटून घेऊ नका. ही जोखीम पत्करलीत तरच तुम्हाला कोणीतरी सापडेल, कोणीतरी स्वीकारेल. तुम्ही शंभर दरवाजे ठोठावलेत, पैकी नव्याण्णव उघडले नाहीत, तरी हातपाय गाळू नका, दुःख करू नका - एखादा दरवाजा नक्की उघडेल. कोणीतरी तुमची वाट पहातंय. कोणीतरी तुमच्याद्वारे तृप्त होणार आहे, भरून पावणार आहे. कोणातरीद्वारे तुम्ही भरून पावणार आहात. कोणीतरी तुमचा आरसा बनण्यास उत्सुक आहे. कोणीतरी तुम्हाला स्वतःचा आरसा बनू देण्यास उत्सुक आहे. अन् ती व्यक्ती कोण हे जाणून घ्यायचं असेल, तर दरवाजे ठोठावत जाण्याखेरीज अन्य कुठलाही मार्ग नाही. यात धोका आहे खरा, पण अवघं जीवनच तसं आहे, धोक्यांनी भरलेलं. 
 
समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू शकली नाही, तर मनाला लावून घेऊ नका. त्यानं/तिनं तुम्हाला अनुकूल प्रतिसाद दिलाच पाहिजे असं काही नाही - कोणालाच तशी सक्ती नसते. तुम्हाला इच्छा होती, सवड होती. समोरच्या व्यक्तीची तशी इच्छा आहे अथवा नाही, हे तिचं तिला ठरवू देत. नकार मिळाल्यास अपमानित वाटून घेऊ नका. नकाराने दुखावले जाऊ नका, मनाला ठेच लावून घेऊ नका - ती ठेच नसते. 'त्या क्षणी तुम्हा दोघांच्या तारा जुळल्या नाहीत' इतकाच नकाराचा साधा-सोपा अर्थ असतो. नकार म्हणजे तुमच्यावर वा अन्य व्यक्तिवर मारला गेलेला शेरा नव्हे. तेव्हा नकार देऊन समोरची व्यक्ती चुकते आहे असं समजू नका. विचारून तुम्ही चुकलात असंदेखील समजू नका!

त्या वेळी तुम्हा दोघांचे धागे जुळू शकले नाहीत, सूर जुळू शकले नाहीत इतकंच. उलट नकार देणाऱ्या व्यक्तीचे आभार माना - तिनं प्रामाणिक उत्तर दिलं तुम्हाला. 'माफ कर, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही' असं ती म्हणाली, हे चांगलंच झालं. किमान ते मनःपूर्वक, खरंखुरं होतं. केवळ तुम्हाला खूष करण्यासाठी तिनं तुम्हाला होकार दिला असता तर?! तुमचं सबंध सहजीवन खोट्याच्या पायावर उभ राहिलं असतं. ती घोर फसवणूक ठरली असती. पुढे व्हायचा तो राडा झालाच असता.

जगा! उत्कटपणे, रसरसून जगा. प्रामाणिक, दिलखुलास रहा.
 
 
 * * *
 
प्रत्येकाला जवळिकीची भीती वाटते. जवळीक साधणं म्हणजे अनोळखी व्यक्तीपुढे स्वतःला उघड करणं. आपण सारेच एकमेकांना अनोळखी आहोत, अपरिचित आहोत. आपण स्वतःलादेखील अपरिचित आहोत. आपण कोण ते आपल्यालाच ठावूक नाही.
 
जवळिकीने अनोळखी व्यक्ती परस्परांजवळ येतात - स्वतःभवती बांधलेल्या संरक्षक भिंती कोसळू द्याल तरच हे शक्य होईल. 'पण मी जर सारे मुखवटे गळून पडू दिले, स्वतःभवतीचं संरक्षणकवच गळून पडू दिलं, तर ती अनोळखी व्यक्ती माझं काय करेल, माझ्याशी कशी वागेल?' - भीती वाटते, हो ना?
 
आपण आपल्या अंतरंगात सतराशे साठ गोष्टी दडवून ठेवल्या आहेत - इतरांपासून, स्वतःपासून. आतल्या आत दाबून ठेवलेल्या नानातऱ्हेच्या गोष्टी, स्वतःवर लादलेली बंधनं, विधिनिषेध इत्यादींनी ग्रासलेल्या मानवजातीत आपण वाढलोत. आपल्यावर तसे संस्कार झाले आहेत. जर आपण बचावात्मक पवित्र्यात राहिलो नाही, 'सुरक्षित अंतर' राखलं नाही तर ती अनोळखी व्यक्ती - त्याच्या/तिच्यासोबत दहा, वीस, चाळीस वर्षं घालवली असली तरी त्यानं फरक पडत नाही - ती अनोळखी व्यक्ती आपल्या असमर्थतांचा फायदा घेईल; आपल्या हळवेपणाचा, मनाच्या कोमलतेचा लाभ घेऊन आपल्याला इजा करेल याचं भय आपल्या अंतर्मनात घट्ट रुजलं आहे.

पण समस्या एवढ्यावर संपत नाही बरं. ती वाटते त्याहून अधिक गुंतागुंतीची आहे. बघा हं - प्रत्येकजण जवळिकीला घाबरतो, मात्र प्रत्येकालाच जवळीक हवी असते. जिव्हाळा, आपलेपणाची भावना ही एक मूलभूत गरज आहे. आपुलकीच्या ओलाव्यासाठी प्रत्येकजण तडफडतो. प्रत्येक अन् प्रत्येकाला त्याची आस असते कारण त्याखेरीज ज्यावर बिनधास्त विश्वास टाकावा; ज्यापुढे आपल्या अंतरीच्या जखमा, सल उघड करावेत असं कोणीच नसतं आपल्या आयुष्यात.

खुल्या केल्याशिवाय जखमा बऱ्या होत नाहीत. जखम जितकी झाकून ठेवाल तितकी चिघळत रहाते.

तेव्हा प्रत्येकाला जवळिकीची तहान असते, पण प्रत्येकाला वाटतं जवळीक समोरच्याने साधावी. त्याने/ तिने स्वतःभवतीच्या सावधगिरीच्या भिंती पाडाव्यात, त्याने/तिने आपलं मर्म खुलं करावं, आपली दिखाऊ व्यक्तित्वं टाकून द्यावीत. मी का म्हणून ते करू? आडपडदे दूर सारावेत, नागवं व्हावं ते दुसऱ्याने, असंच प्रत्येकाला वाटतं. परिणामी कुणीच त्या भिंती पाडत नाही, पडदे दूर सारत नाही; कुणीच आपलं मर्म उघड करत नाही. जवळीक प्रत्येकालाच हवी असली तरी विशुद्ध नग्नतेने, निष्कपटतेने स्वतःला इतरांपुढे ठेवण्याची कुणाचीच तयारी नसते.

जोवर तुम्ही स्वतःत दडपून ठेवलेल्या गोष्टींना मोकळा श्वास घेऊ देत नाही, स्वतःवर लादून घेतलेलं एकूणएक बंधन झुगारत नाही - तुमच्या धर्मांनी, संस्कृतींनी, समाजांनी, पालकांनी, शिक्षणव्यवस्थेने दिलेला 'अमूल्य ठेवा'! - तोवर तुम्ही कुणाहीसोबत जवळीक साधूच शकणार नाही. 
 
होय, पहिलं पाऊल तुम्हालाच टाकावं लागेल. 
 
पण ऱ्हदयावर दमनाचा, विधिनिषेधांचा बोजा नसतो तेव्हा भीती अजिबात वाटत नाही. तुम्ही जवळीक साधण्यास कचरत नाही. मग रंगतो विलक्षण आनंदोत्सव, एकमेकींना लपेटत प्राय एकरूप होऊन जाणाऱ्या दोन ज्वाळांचा! हे मीलन अपार संतोष देतं. परंतु या दिशेने एकही पाऊल टाकण्यापूर्वी तुम्ही आपल्या घराची व्यवस्थित साफसफाई करायला हवी. 

तुम्ही स्वतःला पूर्णत्वानं स्वीकारायला हवं - तुम्ही जर स्वतःचा निःशेष स्वीकार करणार नसाल, तर अन्य कोणाकडून तरी स्वीकारलं जाण्याची अपेक्षा कशाला ठेवता? ...तुम्ही साऱ्यांकडून धुतकारले गेले आहात. तुमच्या रोमा-रोमात फक्त नि फक्त आत्म-निर्भत्सना भरण्यात आली आहे.

तुमच्या अंतर्मनात अचकट-विचकट, भीषण गोष्टी दडलेल्या आहेत, तुम्हाला पक्कं ठावूक आहे ते. आपल्या पशुत्वाची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. जोवर तुम्ही स्वतःची पशुता मान्य करत नाही... मी म्हणतो, त्यात चूक काय आहे?? ‘animal’ हा शब्द anima, animale या लॅटिन शब्दांपासून व्युत्पन्न झाला आहे. 'जीवितवस्तु' हा त्याचा सरळ अर्थ. जो जो जिवंत आहे तो जीव आहे, पशू आहे, प्राणी आहे. परंतु 'आपण सर्वश्रेष्ठ आहोत, पशुपक्षी आपल्याहून नीच कोटीचे आहेत' असं मानवानं आपल्या डोसक्यात भरवून घेतलं आहे. शतकानुशतकं मानवजात आपल्या श्रेष्ठत्वाचा भ्रामक, मूर्ख अभिमान बाळगत जगते आहे. पण निखिल अस्तित्वात ना कुणी श्रेष्ठ नसतं ना कनिष्ठ. इथे कसल्याही तऱ्हेची उच्चनीचता नसते, हे सत्य आहे. अस्तित्वाच्या लेखी सारं समान असतं. इथे साऱ्याचा असीम, अशेष स्वीकार असतो.

एकदाची तुम्ही आपली लैंगिकता विनाअट, जशी आहे तशी स्वीकारलीत तर...! मानवासह जगातील सगळे जीवजंतु नाजुक, संवेदनशील असतात, हे वास्तव एकदाचं स्वीकारलंत तर...! जीवनधागा कच्चा आहे हो, केव्हा तुटेल कुणी सांगावं! ...प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट आपल्या सहजस्वरूपात शोभते, आपल्या सामान्यत्वात सुंदर दिसते इतकी साधी गोष्ट तुम्हाला उमगली तर....! तुमचा तो फडतूस अभिमान तुम्ही सोडून दिलात तर...!
 
...ज्याक्षणी स्वतःला आहात तसे स्वीकाराल तत्क्षणी जवळिकीची भीती गायब होईल. आपल्या भावना सच्चेपणे, निस्पृहतेने व्यक्त करण्याचं बळ तुमच्या अंगी आपोआप येईल. तुम्ही जवळीक साधण्याच्या दृष्टीने खरोखर पात्र असाल, पक्व असाल तर अन्य व्यक्तीलाही जवळीक साधण्यास प्रोत्साहित कराल. तुमच्या निर्व्याज साधेपणाच्या संपर्कात येताच समोरची व्यक्तीदेखील स्वतःच्या साधेपणाचा, निरागसतेचा, दृढविश्वासाचा, प्रेमाचा, मोकळ्या वृत्तीचा मनोमन आस्वाद घेऊ लागेल.
 
…कुठल्याही गोष्टीचा परमाविष्कार हा कोमल, मृदु असतो. मुळं राठ असतात, फूल अळुमाळु असतं. कुठचीही उत्कटसुंदर गोष्ट ही भंगुर असते, नश्वर असते. पण तुम्हाला शाश्वती हवी असते. स्थैर्यात, शाश्वतीमधे सुरक्षा शोधता तुम्ही. जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडता तेव्हा कसल्या आणाभाका घेता? तर "मी जन्मभर तुझ्यावर प्रेम करेन." अरे जन्म राहू दे बाजूला, उद्याचादेखील भरोसा नाही, हे तुम्हाला पुरतं माहित असतं. तुम्ही खोट्या शपथा घेता, परस्परांना खोटी वचनं देता. प्रेमी जोडपी एकमेकांना कसली कसली अशक्य वचनं देत बसतात! मग नात्यात वैफल्य शिरतं, परस्परांतील दरी वाढत जाते... सततची भांडणं, कलह... जिथे पावलोपावली सुख बहरावं असं जगणं मग पाय ओढत चालण्याची, अंतहीन दुःखाची वाट होऊन जाते.

स्वच्छंदीपणे जगा, परिणामांची बिलकुल तमा न बाळगता. जीवन क्षणिक आहे, ते परिणामांची काळजी करण्यात वाया घालवणं ही घोडचूक आहे! या जगात तुम्ही औट घटकेचे पाहुणे आहात - एके दिवशी निरवानिरव करायची आहे, जगाचा निरोप घ्यायचा आहे, हे सत्य निखालसपणे स्वीकारा. जिवंतपणाच्या दुर्लभ घटका डरपोक राहून, खोटारडेपणा करत नासवू नका! या घटका साजरा करायच्या असतात!
 
 - रजनीश (ओशो)

Comments