प्रेम म्हणजे स्वातंत्र्य

प्रश्न: मी माझ्या प्रेयसीला शक्य तेवढं स्वातंत्र्य देतो - त्यामुळे मी स्वतः अडचणीत सापडलो, मला दुःख झालं तरी. माझं स्वत:वर पुरेसं प्रेम नाही  म्हणून मी स्वत:ला दुय्यम स्थान देतोय असा याचा अर्थ होतो का? 
 
रजनीश (ओशो):  हे तुला वाटतं त्याहून फार गुंतागुंतीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तू तुझ्या प्रेयसीला स्वातंत्र्य ‘देतोस’ ही कल्पनाच चुकीची आहे. तू कोण तिला स्वातंत्र्य देणारा? तू केवळ प्रेम करू शकतोस आणि तुझ्या प्रेमातच स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. ती देण्याची गोष्टच नव्हे. ते द्यावं लागत असेल, तर तुला जाणवणाऱ्या सर्व समस्या जाणवणं सहाजिक आहे. तेव्हा तू चूक करतो आहेस. तुला या नात्यात खरंखुरं स्वातंत्र्य नकोय; स्वातंत्र्य ‘द्यावं’ लागेल अशी परिस्थिती आलीच नाही तर तुला जास्त आवडेल. पण ‘प्रेम स्वातंत्र्य देतं’ असं मला पुन्हापुन्हा सांगताना तू ऐकलं आहेस, ते तू अजाणतेपणी स्वत:वर लादतो आहेस, कारण स्वातंत्र्य दिलं नाहीस तर तुझं प्रेम ‘प्रेम’च नाही असं होईल ना!
 
 तू कात्रीत सापडला आहेस: स्वातंत्र्य दिलं नाहीस तर तुझ्या प्रेमावर प्रश्नचिह्न उभं राहील. स्वातंत्र्य दिलंस तर तुझा अहंकार मत्सरग्रस्त होईल, चरफडेल. तो विचारेल : ‘‘प्रेयसीला तू पुरा पडत नाहीस  म्हणून इतरांसोबत असण्याचं स्वातंत्र्य हवंय का –?’’ या उलटपुलट विचारांचा त्रास होतो आणि मग तुला वाटतं की ‘मी स्वत:ला दुय्यम स्थानावर ठेवतो आहे’.

दुसऱ्या इसमावर प्रेम करण्याचं स्वातंत्र्य तिला ‘देताना’ तू स्वत:ला दुय्यम स्थानावर ठेवलंस. परंतु याने काहीच साधणार नाही. त्या ‘देऊ केलेल्या’ स्वातंत्र्याचा तू सूड घेशील. हेच स्वातंत्र्य तुला दिलं जावं असा हट्ट धरशील - तुला त्याची गरज असली-नसली तरी. तू आक्रस्ताळेपणा करशील, केवळ आपली फसवणूक होत नाहीय हे सिद्ध करण्यासाठी.
 
दुसरी गोष्ट म्हणजे, तुझी प्रेयसी कोणा दुसऱ्यासोबत राहून आल्यावर तिच्या सहवासात तुला काहीसं विचित्र वाटेल. ‘काही काळाकरता का होईना, तिने दुसऱ्या कोणाचीतरी निवड केली, तिने आपल्याला डच्चू दिला; आपला अपमान केला. आणि आपण तर किती केलं तिच्यासाठी, आपण इतके उदार झालो, तिला स्वातंत्र्य दिलं...’ असं तुला वाटेल. तुला दुखावल्यासारखं वाटलं की तू तिला या ना त्या मार्गाने दुखावणार.
 
पण या साऱ्याच्या मुळाशी एक गैरसमज आहे. ‘प्रेमात स्वातंत्र्य दिलं पाहिजे’ असं मी कधी म्हटलोच नाही. मी म्हणालो ‘प्रेम म्हणजे स्वातंत्र्य’. देण्याचा प्रश्न येतच नाही. ते जर द्यावं लागत असेल, तर ते न देणं चांगलं. चारचौघांसारखा राहा. कशाला नसते गुंते वाढवतोस? आहेत तेवढे गुंते पुष्कळ झाले.

प्रेम म्हणजेच स्वातंत्र्य. प्रेम करणं म्हणजे दारं-खिडक्या लावून घेणं नव्हे; जेणेकरून ती अन्य कोणासोबत हसू शकणार नाही, नाचू शकणार नाही, प्रणय करू शकणार नाही. आपण आहोत कोण एकमेकांना कोंडणारे??
हा प्रश्न प्रत्येकाने विचारावा: आपण कोण लागून गेलोत? कोणत्या बळावर आपण इतके अधिकारवाणीने म्हणतो, की ‘मी तुला स्वातंत्र्य देईन’ वा ‘मी स्वातंत्र्य देणार नाही’ वा ‘जर तू माझ्यावर प्रेम करतेस, तर तू अन्य कोणावर प्रेम करू शकत नाहीस?’ - हा शुद्ध मूर्खपणा आहे. पण ही मूर्ख गृहितकं मानवजातीवर अगदी प्रारंभीपासून वर्चस्व गाजवत आली आहेत. प्रेम म्हणजे काय हे अद्याप आपल्याला समजलेलंच नाही.

मी जर कोणावर प्रेम करत असेन, तर त्या व्यक्तीने तसं करण्याची मुभा मला दिली, मला नाकारलं नाही, याबद्दल मी कृतज्ञ असतो. एवढं पुरे असतं. पण ते नातं तिच्याकरता तुरुंगवास ठरायला नको : तिने माझ्यावर प्रेम केलं की त्याबदल्यात मी तिच्याभोवती एक तुरुंग निर्माण करतो; मी तिच्यावर प्रेम केलं म्हणून ती माझ्याभोवती एक तुरुंग वसवते. काय महान पुरस्कार देतोय आपण एकमेकांना!
स्वातंत्र्य म्हणजेच प्रेम, हे ध्यानात आलं तर प्रेमच परस्परांतील तणाव कमी करण्यात, चिंता कमी करण्यात तुम्हाला मदत करेल, वेदनांवर फुंकर घालेल, प्रेम अपार आनंद देईल.
 
 पण जगात भलतंच घडतं. प्रेम अतोनात दु:ख निर्माण करतं, जखमा देतं. अखेरीस काही लोक म्हणतात ‘कोणावर प्रेम न केलेलंच बरं’! असे लोक त्यांच्या हृदयाची कवाडं बंद करतात, कारण प्रेम म्हणजे त्यांच्याकरता एक यातनाघर होऊन गेलेलं असतं.
 
मात्र प्रेमाला प्रवेश नाकारणं म्हणजे सत्याला प्रवेश नाकारणं, अस्तित्वाला प्रवेश नाकारणं; म्हणून मला हे मान्य नाही. मी म्हणेन : प्रेम करण्याची रीत बदला, पूर्णत: बदलून टाका! प्रेमाला तुम्ही एका ओंगळ परिस्थितीत ढकललं आहे, ती परिस्थिती बदला. 
 
प्रेमाला तुमच्या अंतःकरणाचं, तुमच्या धैर्याचं पोषण करू दे, म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडू शकाल: कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर अवघ्या जगासाठी.
 
 
                     प्रेमाची झुळूक



Comments