मूळ इंग्रजी लेखक: लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो (१८५० - १९०४ ) मराठी संपादन व भाषांतर: मुक्ता असनीकर Lafcadio Hearn AKA Koizumi Yakumo हर्न यांच्याबद्दल: 'पाश्चात्त्य जगाला जपानची ओळख करून देणारा कथाकार' असा लेखक -पत्रकार लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो यांचा मुख्य लौकिक म्हणता येईल. १८९० पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१९०४) ते जपानमधे राहिले, जपानी भाषा, संस्कृती आत्मसात केली, विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधून जपानी लोकसाहित्याचा संग्रह व अनुवाद केला, जपानी स्त्रीशी विवाह केला, जपानी नागरिकत्व स्वीकारलं. यामागे व्यावहारिक कारणं असतीलही परंतु गूढ श्रद्धांनी, वैचित्र्यपूर्ण चालीरितींनी नटलेल्या, निसर्गाशी नातं सांगणाऱ्या तत्कालीन जपानी जीवनशैलीबद्दल त्यांना जिव्हाळा होता हे तितकंच खरं. आधुनिक पाश्चात्त्य औद्योगिकतेच्या प्रभावाखाली ही संस्कृती नष्ट होणार याची त्यांना खंत वाटे. कोणताही धूर्त राजकीय, धार्मिक वा व्यापारी हेतू न बाळगणारा, साम्राज्यवादाचा तिटकारा असलेला, वंशभेद न मानणारा 'गोरा' म्हणून जपान्यांनीही त्यांच्यावर माया केली....