जी.ए. वाचताना

मोठ्याने वाचताना माझ्या लक्षात येतंय की त्यांची कथा जाहीररित्या वाचण्याजोगी नाही.
तरीसुद्धा आज रात्री मी नेमकं तेच करणार आहे. मी ते का करणार आहे, मलाच ठावूक नाही. किंवा परवा-परवापर्यंत ठावूकही असेल पण आता ती आठवण गळून पडली आहे.
जी.एं.ची कथा सावकाश वाचण्याजोगी आहे - सावकाश आणि सावध. हे फार महत्त्वाचं. मैल अन् मैल निर्जन रान तुडवताना प्रवासी भवतालापासून सावध होता पण स्वतःपासून त्यानं सावध राहणं तितकंच गरजेचं होतं.
अभिवाचन वाईट होईल की बरं होईल, ते चांगलं व्हावं याकरता... काही करता येणार नाही.

घडवणारा मी नाही, खुद्द जी.ए.देखील नाहीत. घडू देण्याखेरीज माझ्या हातात काही नाही. एक एक ओळ लाटेसारखी येऊ द्यायची; आपण वाळूत रुतलेला शिंपला आहोत, ओलं-कोरडं होत रहायचं.
तरच जी.ए. वाचता येतील - मनात आणि जनांतही.


Comments

Post a Comment