तुम्हाला नात्यामध्ये रस आहे, की नातं टिकवण्यामध्ये?
तुम्हाला नात्यामध्ये रस आहे, की नातं टिकवण्यामध्ये? - होय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कारण दोन्ही एकसाथ घडूच शकत नाही. जेव्हा तुम्ही कुठल्याही नातेसंबंधात पूर्णतः रममाण असता, खरोखर त्या नात्याचा भाग असता तेव्हा तुम्ही नातं टिकवण्याची धडपड करत नसता. तशी गरजच नसते! नातं टिकवण्याची धडपड करता तेव्हा तुम्ही नात्याशी समरस नसता, एकरूप नसता. नात्यापासून निराळं होऊन, पृथक् होऊन तुमचा तो उद्योग चालतो. ...ज्या क्षणी आपण वास्तवाकडे, जे आहे त्याकडे थेट पाहू शकत नाही किंवा पाहू इच्छित नसतो; ज्याक्षणी स्वतःचं वर्तमानातील वास्तव सर्वांशानं पाहण्यात आपल्याला रस नसतो / तितकं धैर्य नसतं / सबुरी नसते / ऊर्जा नसते / भान नसतं, त्याचक्षणी 'आदर्शा'ची चर्चा सुरु होते. त्याचक्षणी आपण जग 'आदर्श' व 'वास्तव' यांत विभागून टाकतो. हे सेकंदाच्याही एखाद्या तुकड्यात घडून जातं, पण ती मनानं शोधलेली पळवाट असते. मनाचा थकवा / आळस / भ्रम असतो. प्रत्यक्षात असतं ते केवळ वास्तव, बाकी काही नाही. नि ते समजून घेता येतं फक्त पाहण्यानं. प्रश्न सुटतात फक्त समजून घेण्यानं. हे लक्षात घेणं महत्त्वाचं. ...