हेतूची शुद्धी
सत्याचा शोध घ्यायचा आहे? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत.
आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल.. कळतच नाही.
आपल्याला मार्गदर्शक, गुरु हवा असतो, तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवा आहे का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवा आहे? आशीर्वाद देणारा कुणी हवा आहे? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवा आहे का? जुन्या नातेसंबंधांना मन विटलं आहे, तर नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? ..पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर! आपल्या मनाला, अहं ला रुचलं नाही तर! तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणे वाकवून मग ते ग्रहण करायचे?
काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवं आहे का? आपण आहोत तसे स्वीकारणारा हवा आहे का कोणी?
...ही स्वतःची जी ओळख आहे, ती आधी साधली पाहिजे - माझ हेतू काय आहे? What is the content of this enquiry, the spiritual enquiry?
आपल्याला नवल वाटेल, पण मुक्ती कोणालाच नको असते. आपल्याला मुक्तीची भीती आहे. जीवनाची भीती आहे, मरणाची भीती आहे, स्वातंत्र्याची भीती आहे. कुणीतरी आपलं बोट धरून 'स्वातंत्र्य' नामक जे ठिकाण असेल तिथे आपल्याला घेऊन जावं; तिथेसुद्धा स्वातंत्र्याचा भणाणणारा असा जो प्रपाती वारा असेल त्याला तोंड देत त्यांनी आपल्याला पाठीशी घालावं, आपलं रक्षण करावं - आपल्याला हवा तितकाच वारा, तितकंच स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला 'द्यावं' अशी आपली इच्छा असते.
आपल्यात समूळ क्रांती, म्हणजेच अध्यात्मिक क्रांती का घडून येत नाही? कारण आपल्याला ती नकोच असते. जाणलेलं सत्य जगायची आपली तयारी नसते. समजलेलं सत्य जगण्याचं धैर्य नसेल तर काही उपयोग नाही.
तेव्हा हेतूची शुद्धी, हेतूची निश्चिती, सुरेखता ही आपण करून घ्यावी. जर आपल्याला केवळ संरक्षण, नवं वातावरण, नवे अनुबंध हवे असतील तर आपण त्या संबंधांत शिरावं, त्याकरता सत्संगात बसावं, मात्र चित्तात भ्रम असू नये, की 'मी स्वतःचा ठाव वगैरे घेतो आहे', 'सत्याच्या, मुक्तीच्या शोधात वगैरे आहे' म्हणून.
चित्ताचं निभ्रांत होणं, बुद्धीचं निःसंदेह होणं या फार मोठ्या घटना आहेत. त्यानं कमालीची स्पष्टता येते, निरामयता येते जीवनात!
- विमला ठकार
Comments
Post a Comment