सहजता, संघर्षमुक्तता

सहजता ही मनोवैचारिक गोष्ट नव्हे. मुद्दामहून अंगी बाणवलेली सहजता, साधेपणा म्हणजे निव्वळ धूर्तपणे केलेली तडजोड असते, सुख-दुःखाच्या भोगापासून बचाव व्हावा यासाठी ती केली जाते. 
ही स्वतःला स्वतःतच कोंडून घेण्याची क्रिया असते, आणि हीतून नानातऱ्हेचे संघर्ष, संभ्रम उद्भवतात.
 
संघर्षमुक्त होण्यातून सहजता येते, संघर्षावर मात करण्यातून नव्हे. एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवावा लागतोय याचाच अर्थ ती पुन्हा पुन्हा नियंत्रणाखाली आणावी लागतेय. मग संघर्ष निरंतर चालूच राहणार. संघर्षाचं आकलन करून घेणं म्हणजे इच्छा, वासनेचं आकलन करून घेणं.  
 
निरीक्षणकर्ता व निरीक्षित केली जाणारी एखादी गोष्ट, यांची जी प्रक्रिया असते तीत द्वैत नसतं, ती अखंड प्रक्रिया असते. या प्रक्रियेच्या एकात्म वास्तवाची अनुभूती आली तरच वासना, कलहांतून मुक्तता होते. 'हे वास्तव कसं बरं अनुभवता येईल?' असा प्रश्न विचारून उपयोग नाही. ते स्वाभाविकपणे घडून यायला हवं. दक्षता, अक्रिय, ग्रहणशील सजगता असेल तेव्हाच ते घडून येईल. ...खोलीत बसल्या बसल्या, कल्पनारंजन करून विषारी सापाला सामोरं जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही. खरोखर साप पहायचा असल्यास बाहेर पडावं  लागेल; पक्के रस्ते, दिव्यांचा कृत्रिम प्रकाश यांपलीकडे जाण्यातील धोके पत्करावे लागतील.
 
संघर्षापासून होणाऱ्या मुक्ततेची विचारांच्या पातळीवर नोंद घेतली जाऊ शकते, मात्र विचारांतून ही मुक्तता अनुभवता येत नाही. कारण सहजता, नितळ स्पष्टता या वैचारिक अवस्था नव्हेत. 

- जे. कृष्णमूर्ती
 
 

Comments