दीक्षा

* हे भाषांतर माझं नाही.*
 
 
...आपला भूतकाळ सोडून देण्याची तयारी म्हणजे दीक्षा. माझं अस्तित्व म्हणजे माझा भूतकाळ नव्हे, भविष्यकाळदेखील नव्हे, अस्तित्व म्हणजे केवळ वर्तमान हे पूर्णतः उमजून घेण्याची तयारी म्हणजे दीक्षा. 
 
यजुर्वेदातील एका सूत्राची सुरुवात 'व्रतेनं दीक्षां आप्नोति...' अशी होते. म्हणजे व्रतातून म्हणे दीक्षा येते. छे! व्रताचा दीक्षेशी कसलाही संबध नाही. 
व्रत म्हणजे खरंतर आत्म-अनुशासित जीवन. व्रतातून दीक्षा कशी येईल? दीक्षेविना व्रत येईल कसं? 
 
व्रत म्हणजे शपथा वगैरे नव्हेत. उदा. जो माणूस खरं बोलण्याचं व्रत घेतो, तो आपल्या अंगी खोटं बोलण्याची प्रबळ ऊर्मी असल्याचीच घोषणा करत असतो. अंतरंगी असलेल्या खोट्याच्या आकर्षणानं तो घाबरून गेलेला असतो. खोटं बोलण्याची प्रवृत्ती दाबून टाकण्याचे आडदांड प्रयत्न करून पाहतो - ते असफल ठरतात. मग तो गर्दीसमोर, धर्मोपदेशकांसमोर, जाहीररित्या शपथ घेतो, व्रत घेतो: 'मी खरं बोलेन'. 
लोकांसमोर व्रत घेतलं आहे, तेव्हा व्रताचा भंग करणं म्हणजे समाजाला आपल्याप्रती असलेला आदर गमावून बसणं. असली व्रतं ही अहंकाराची अभिव्यक्ती आहे. आदरातून अहंकारच पोसला जातो. व्रती माणसाला समाजाद्वारे मिळणारा आदर ही समाजानं दिलेली लाच असते.

जी व्रतं घेतली जातात ती उथळ असतात, ते ढोंग असतं. अंतर्यामी कामवासना असताना तु्म्ही ब्रह्मचर्याचं व्रत घेता, याचाच अर्थ तुम्ही स्वतःविरुद्ध व्रत घेता, सवतःची दोन शकलं करता. तुमचे दोन चेहरे होऊन जातात: एक व्रती माणसाचा, नि एक तुमच्या अंतरंगात जे खरोखर आहे त्याचा. मग तुमचं अंतःकरण अपराधभावनेनं भरून जातं. योग्य काय - अयोग्य काय हे तुमच्यावर बाहेरून लादण्यात येतं, किंवा तुम्ही स्वतःवर लादून घेता, तेव्हा तुम्ही अपराधभावानं ग्रस्त असता. ...तर व्रत 'येतं', आत्म-अनुशासन 'येतं', ते 'घेतलं' जाऊ शकत नाही.

मग दीक्षा कशातून येते? -  मी म्हणेन, दीक्षा बोधातून येते.

कुणी व्यक्ती जेव्हा आपली जीवनाची अत्यंत चुकलेली, फसलेली रीत पाहू शकतो... 
आपलं जीवन म्हणजे साक्षात् दुःख आहे. ते व्यर्थ आहे; आपल्या जीवनात कसलंही काव्य नाही, नृत्य नाही, कुठलीही फुलं फुललेली नाहीत, कसलाही गंध नाही, संगीत नाही, संगति नाही.. ती एक अर्थहीन धावपळ आहे, एक विक्षिप्त कथा आहे. आपले हात नि आपले प्राणही रिकामेच आहेत... यात काय सार आहे?? यात कुठला गौरव आहे, कसलं सौंदर्य आहे?
 
हे  पाहून, हे जाणून - आणि ते पाहणं मुळीच अवघड नाही. ते तुमचं सत्य आहे. क्षणोक्षणी ते तुमच्या दृष्टीसमोर आहे, तुम्हीच ते घडवताहात. या बोधातून दीक्षा जन्माला येते.

- रजनीश (ओशो)
 
 

Comments