नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं:
....साहस, धडाडी, बुद्धिमत्ता आदी प्रभावी गुणांनी युक्त मनुष्य त्या गुणांचा वापर केवळ स्वार्थसाधनेसाठी करत असेल; त्याच्या वर्तनात जर इतरांच्या हक्कांप्रती निर्मम अनास्था झळकत असेल, तर याची परिणती तो मनुष्य अधिकाधिक नीच, पापी होण्यात झाल्याखेरीज रहात नाही. एखादा समाज या गुणांची पूजा करत असेल; गुणांचा वापर योग्यरित्या केला जातो अथवा नाही हे न लक्षात घेताच गुणीजनांचा उदोउदो करत असेल, तर त्यातून त्या समाजाची कृपणबुद्धी, अविवेक दिसून येतो.
....निव्वळ कर्तृत्वावरून, संपादित केलेल्या यशावरून एखाद्या व्यक्तीची पारख करण्यासारखी भीषण चूक दुसरी नाही. जर लोक माणसांचं मूल्यमापन सर्रास यापद्धतीने करत असतील; दुष्ट मनुष्याची सरशी होतेय म्हणून दुष्टवृत्तीला मोकळीक देत असतील, तर 'स्वायत्त संस्थांची भिस्त ही अखेर नागरिकत्वाच्या निष्कलंतेवर असते' हे सत्य समजावून घेण्यास सदर लोक अक्षम असल्याचं स्पष्ट दिसून येतं. दुष्टाईची खुशामत करणारे लोक हे 'आपण स्वातंत्र्याकरता ना-लायक असल्याचं' सिद्ध करतात.
....प्रजासत्ताकातील नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं: 'प्रजासत्ताकातील काही नागरिकांचा / अमुक एका समुदायाचा मी विरोध करतो म्हणून मला पाठिंबा द्या', असं आवाहन करणारी व्यक्ती. 'मला निवडून दिलंत तर येनकेणप्रकारे (- काही अन्य नागरिकांच्या स्वातंत्र्याचा, अधिकारांचा बळी देऊन) मी तुमचं कल्याण करेन', असं आश्वासन देणारी व्यक्ती.
लोकशाहीय समाजाच्या कोणाही सुजाण, आत्मनिष्ठ सदस्याने खाजगी जीवनात ज्यावर आपला रास्त अधिकार नाही, ती गोष्ट मिळवून देण्याचा वायदा करणाऱ्या सार्वजनिक व्यक्तित्वाला गौरवू नये, मोठेपणा देऊ नये. खाजगी जीवनात आपण जो वैरभाव, द्वेषभाव बाळगणं गैर आहे, अशा भावना सुखावू पाहणाऱ्या, त्यांना चाळवणाऱ्या सार्वजनिक व्यक्तित्वाला नेतृत्व बहाल करू नये. जर तुमचं मत मागणारा कुणी उमेदवार तुमच्या भल्याकरता दुष्कृत्यं करण्यास राजी असेल, तर वेळप्रसंगी तो स्वतःच्या भल्याकरता तुमच्याविरुद्ध दुष्कृत्यं करण्यास मागेपुढे पाहणार नाही, याची खात्री बाळगावी.
- थिओडोर रुझवेल्ट धाकटे (२७ ऑक्टोबर १८५८ - ०६ जानेवारी १९१९)
Comments
Post a Comment