संभ्रम व खात्री

 संभ्रम (confusion) ही एक मोठी संधी आहे.

कधीच संभ्रमात न पडणारे लोक मोठ्याच समस्येत असतात - 'आपल्याला सारंकाही माहित आहे' असं ज्यांना वाटतं त्यांना खरं पाहता काहीच माहित नसतं.
'आपल्याला सारंकाही स्पष्ट आहे' असं ज्यांना वाटतंं, ते खरं म्हणजे संकटात असतात. त्यांची स्पष्टता उथळ असते. ते जिला 'स्पष्टता' म्हणतात तो निव्वळ मूर्खपणा असतो. मूर्ख माणसं फारच ठाम असतात. याचाच अर्थ संभ्रम निर्माण होण्यासाठी आवश्यक तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्यापाशी नसते.
 होय, संभ्रमात पडण्यासाठीही बुद्धिमत्ता लागते. बुद्धिमान माणूसच घोर संभ्रमावस्था अनुभवू शकताे.
इतर लोक पुढे-पुढे जात रहातात, हसतात-खिदळतात, पैसा जमवतात, सत्ता व प्रसिद्धीसाठी ओढाताण करत राहतात... केवढा आत्मविश्वास असतो ना त्यांच्या अंगी! ती आनंदीसुद्धा भासतात. 
तुम्ही संभ्रमात, गोंधळात पडलेले असाल, तर त्यांच्याकडे पाहून तुम्हाला नाही म्हटलं तरी थोडा मत्सर वाटतो: 'आयुष्याबद्दल या लोकांना किती स्पष्टता आहे! त्यांच्यापुढे दिशा आहे, उद्दिष्ट आहे, लक्ष्य कसं गाठायचं ते त्यांना ठावूक आहे, जमतंही आहे! जणू ते एकेक पायरी चढत वर चालले आहेत. आणि आपण बावचळल्यागत उभे आहोत: काय करावं-काय करू नये याबाबत संभ्रमात पडलेले, योग्य काय-अयोग्य काय याबाबत गोंधळलेले.' 

पण तुम्ही खरोखर गोंधळलेले असाल तर तुम्हाला मोठंच वरदान लाभलं आहे. कसलीशी शक्यता उगवू पहातेय; काहीतरी लाखमोलाचं संभवतंय. तुम्ही काठावर आहात. तुम्ही पूर्णपणे संभ्रमात आहात याचा अर्थ तुमचं मन अपयशी ठरलंय; मन तुम्हाला कोणत्याही प्रकारची निश्चिती पुरवू शकणार नाही.

आता मनाचा मृत्यू अधिकाधिक जवळ येतो आहे. आणि हे सर्वात मोठं वरदान आहे, कारण मन म्हणजेच गोंधळ.
संभ्रम जितका जास्त, जितका गहिरा, त्याचं ओझं जितकं अधिक, तसतसं त्याच्या भाराने मन गळून पडतं. आणि मन गळून पडताच संभ्रम नाहीसा होतो.
मग तुम्हाला निश्चिती, खात्री वा शाश्वती (certainty) येईल असं मी म्हणणार नाही. कारण हे शब्दसुद्धा केवळ मनाच्या जगात लागू पडतात. 'निश्चिती' म्हणजे संभ्रमित अवस्थेला ठिगळं लावणं,  दुसरंतिसरं काही नाही. तुम्ही संभ्रमात पडता. कुणीतरी म्हणतं, 'काळजी करू नका'. खूप अधिकारवाणीने तुम्हाला काहीतरी सांगितलं जातं, युक्तिवादातून, ग्रंथांचा आधार घेऊन पटवून दिलं जातं. उंची, तलम वस्त्राने तुमचा संभ्रम  झाकला जातो. यामुळे तात्पुरतं बरं वाटलं तरी गोंधळापासून तुमची सुटका झालेली नसते. तो तुमच्या अंतरंगात उकळतच असतो.
 जोवर संभ्रम असतो, तोवर निश्चिती असते. संभ्रम नाहीसा होतो, तेव्हा निश्चितीदेखील नाहीशी होते.

संभ्रम नाही व निश्चितीही नाही, हा माणसाच्या आयुष्यातला परमसुंदर क्षण असतो. या क्षणात माणूस एक आरसा होऊन जातो. त्यात उमटणाऱ्या प्रतिबिंबांना कुठलीही दिशा नसते - कुठे जाणं नाही, काहीही करण्याचे बेत नाहीत, भविष्यकाळ नाही. 
संभ्रमही नाही, खात्रीही नाही - केवळ स्पष्टता, पारदर्शकता. 
 
- रजनीश (ओशो)
 

Comments