पवित्र सावली

सूफी कथा आहे:

कोण्या एके काळी एक अत्यंत सदाचारी व्यक्ती होती. आपण तिला 'साधू' म्हणू. हा साधू इतका निर्मळ होता, की एखादा मानव इतका नितळ, इतका सच्चा कसा असू शकतो यावर आश्चर्य करीत आकाशातील देवदूत त्याला कौतुकाने न्याहाळत असत.

ताऱ्यांचा प्रकाश सांडावा, फुलांचा गंध पसरावा तितक्या स्वाभाविकपणे साधूच्या दैनंदिन जगण्यातून सदाचार पाझरत असे. त्याला याची किंचितही जाणीव नव्हती. त्याच्या रोजच्या व्यवहाराचं वर्णन दोनच शब्दांत करता येईल - दया व क्षमा. पण त्याच्या तोंडून या शब्दांचा उच्चारदेखील झाला नसेल. त्याच्या सहज हास्यातून, करुणामय, सहनशील, उदार वर्तनातूनच ते शब्द प्रतीत होत असत.

देवदूतांनी देवाला गळ घातली, "देवा, या माणसाला चमत्काराचं वरदान द्या ना."

देव हसून म्हणाला, "असं कसं! त्याला काय पाहिजे, ते आधी त्याला विचारायला नको?"
 
देवदूत साधूच्या स्वप्नात प्रकटले. "आपण फार फार सज्जन आहात. केवळ स्पर्शाने रोगी-आजारी मंडळींच्या व्याधी दूर करण्याची किमया आपल्याला साधली, तर आपणास ते आवडेल का?"
 
"कशाला? ते देवाच्या हातांत आहे. ती त्याची कृपा आहे."
 
"आपली एक नजर पडताच अधम, दुर्जन व्यक्तीला पश्चात्ताप होऊन तो सन्मार्गाला लागला तर-?"

"छे छे. ते देवदूतांच्या हातांत आहे. ऱ्हदयपरिवर्तन घडवून आणणं हे माझं काम नव्हे." 

"तुम्हाला शांतिचा, सहिष्णुतेचा आदर्श होणं आवडेल का? तुमच्या सद्गुणांच्या तेजाने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तो जणू देवाचाच गौरव ठरेल."

"नाही बुवा. लोक माझ्याकडे आकर्षित झाले, तर ते देवापासून दुरावतील."

"...बरं मग तुमची काय इच्छा आहे?"

"माझी काय इच्छा असणार! देवाची माझ्यावर दृष्टी आहे, असं असताना आणखी काय हवं!"

"तुम्ही एक तरी वर मागितलाच पाहिजे, नाहीतर तुम्हाला बळेच वरदान दिलं जाईल," दूत इरेस पेटले होते.

"तसं असेल तर... माझ्या हातून माझ्या नकळत भरपूर सत्कर्म घडावं हे माझं मागणं आहे," साधू म्हणाला.
 
 
देवदूत कोड्यात पडले. त्यांनी मसलत करून तोडगा काढला: जिथे जिथे साधूच्या नकळत त्याची सावली पडेल, तिथे तिथे सावलीच्या प्रभावाने लोकांच्या व्याधी सरतील, वेदना शमतील, दुःखनिवारण होईल.

घडलंही तसंच.

जेव्हा साधूच्या नकळत एखाद्या स्थळी त्याची सावली पडे, तेव्हा ओसाड जागी हिरवे-कवळे तृण उगवून येत, वठलेल्या वृक्षाला पालवी फुटे, आटलेल्या झऱ्यातून झुळझुळ पाणी वाहू लागे, बालकांच्या निस्तेज गालांवर आनंदाची लाली चढे, दुःखीकष्टी स्त्री-पुरुषांच्या मनी अकस्मात् सुख-समाधान दाटे.

ताऱ्यांचा प्रकाश सांडावा, फुलांचा गंध पसरावा तितक्या स्वाभाविकपणे  साधूच्या दैनंदिन जगण्यातून  सदाचार प्रसृत होत राहिला, ज्याची त्याला यत्किंचित जाणीव नव्हती. त्याच्या विनयी स्वभावाचा आदर राखून पुष्कळ लोक त्याच्यामागून जात - घडलेल्या चमत्काराबद्दल त्याच्यापाशी अवाक्षरही काढता. 
 
यथावकाश लोक त्या साधूचं नावही विसरले, व त्याला 'पवित्र सावली' म्हणू लागले.

Comments