ऐकणारा व गाणारा

 ऐकणारा व गाणारा एकच असतात. ऐकणारा हा गाणाऱ्याच्या मनात, कल्पनेत, विचारांत असतो. गाणारा हा ऐकणाऱ्याच्या मनात, कल्पनेत, विचारांत असतो. प्रत्यक्षात कुणी नसतं, केवळ वास्तव असतं. 'कुणासाठी' तरी गाणं म्हणजे काय? हा कुणीतरी, 'अन्य कुणी' म्हणजे नेमकं कोण? कुठला श्रोता? कोण प्रेक्षक? - ती समोर/भवताली बसलेली माणसं? आपण त्यांना प्रत्यक्ष जाणतो का? प्रत्यक्षात पहातो का? की डोळ्यांपुढे मनातल्याच प्रतिमांचा, इच्छांचा, अभिलाषांचा खेळ सुरू असतो?
 
तेव्हा 'ज्याच्यासाठी' कला सादर केली जाते तो 'अन्य', ती 'दुसरी' व्यक्ती - ‘the other’ हा मुळी गायकाच्या, नटाच्या, चित्रकाराच्या, दिग्दर्शक वगैरेंच्या डोक्यात असते. आपल्याला ती खऱ्या अर्थाने गाऊ, चित्र काढू देत नाही, अभिनय करू, दिग्दर्शन करू देत नाही. हे जाणलं, तर आपण  'अन्य'च्या भ्रमातून मुक्त होऊ, व तत्क्षणी 'मी'च्याही भ्रमातून मुक्त होऊ. 'मी' म्हणजेदेखील तेच - प्रतिमा, आठवणी, कल्पना, विचार इत्यादी.
 
..मग गाणारा वास्तवात गाऊ लागेल. खरंखुरं चित्र, खराखुरा चित्रपट काढेल. मग आपण खऱ्या अर्थानं जगू.

Comments